पंच भूत स्थळांपैकी हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यातल्या चित्तूर जिल्ह्यामध्ये वसलेलं आहे. पंच महाभुतांमध्ये हे वायू तत्वाचं प्रतीक आहे. तसेच हे मंदिर आथार स्थळांपैकी पण एक आहे ज्यामध्ये हे विशुद्धी चक्राचे प्रतीक आहे. तसेच हे मंदिर नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण एक आहे. हे मंदिर राहू-केतू परिहार स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी सर्पदोष शांती विधी केले जातात. प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरापासून हे मंदिर ४० किलोमीटर्स वर आहे. हे साधारण २००० वर्ष जुनं मंदिर आहे. इथून जवळच स्वर्णमुखी नदी वाहते.
मुलवर: श्री काळहस्तीश्वरर
देवी: श्री प्रसूती देवी, श्री ज्ञान प्रसुनाम्बिका
हे स्वयंभू शिवलिंग आहे ज्याची आराधना वायूलिंग म्हणून केली जाते. हे एकच शिव मंदिर आहे जे सूर्य आणि चंद्र ग्रहणांमध्ये दर्शनासाठी खुलं असतं.
पुराणांनुसार श्री ब्रह्मदेवांनी ह्या ठिकाणी चारी युंगांमध्ये भगवान शिवांची आराधना केली आहे. महाभारतामध्ये अर्जुनाने येथे आराधना केली. श्री वायुदेवाने इथे १००० वर्षेपर्यंत शिव लिंगाची आराधना केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला ३ वरदाने दिली. श्री वायुदेवाच्या इच्छेनुसार ह्या लिंगाला कर्पूरलिंग असं नाव प्राप्त झालं तसेच ह्या लिंगाची पूजा सर्व मुनी, देव, किन्नर आणि असुरांनी पण केली आहे.
भगवान शिवांनी श्री पार्वती देवींना मानवी अवतार घेण्याचा शाप दिला. त्याचबरोबर ह्या शापाचं विमोचन करण्यासाठी त्यांनी श्री पार्वती देवींना ह्या ठिकाणी तपश्चर्या करण्यास सांगितले. श्री पार्वती देवींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना त्यांच्या आधीच्या रूपापेक्षाही सुंदर असं स्वर्गीय रूप प्रदान केलं. त्याचबरोबर श्री पार्वती देवींना भगवान शिवांनी पंचाक्षरी मंत्राची दीक्षा पण दिली. आणि म्हणूनच श्री पार्वती देवींना ह्या ठिकाणी श्री ज्ञान प्रसुनाम्बिका असं नाव आहे.
येथे तपश्चर्या केल्यामुळे आणि येथील स्वर्णमुखी नदीमध्ये स्नान केल्यामुळे श्री मयूर, श्री चंद्र आणि श्री देवेंद्र ह्यांना त्यांना प्राप्त झालेल्या शापापासून मुक्तता मिळाली.
ह्या स्थळाला श्री काळहस्ती हे नाव कसं प्राप्त झालं ह्याची एक आख्यायिका आहे. पौराणिक काळामध्ये ह्या ठिकाणी कोळी (श्री), साप (काळ) आणि हत्ती (हस्ती) ह्यांनी भगवान शिवांची आराधना केली. कोळ्याने गाभाऱ्यामध्ये राहून शिवलिंगाभोवती जाळं विणून भगवान शिवांची आराधना केली. पण एकदा वाऱ्यामुळे यज्ञातील अग्नी लिंगाच्या दिशेनी वाहल्यामुळे ते जाळं उध्वस्त झालं. राग अनावर झाल्याने कोळ्याने अग्नीला गिळायचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. भगवान शिवांनी कोळ्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला मोक्ष प्रदान केला. कोळ्याने अग्नीला गिळण्याचा प्रयत्न करण्याच्या कृतीकडे थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर कोळ्याने अग्नीला म्हणजेच आपल्या “स्व” ला गिळून त्याचं आयुष्य धोक्यात घातलं म्हणजेच अहंकार घालवण्याचा प्रयत्न केला म्हणून तो मोक्षासाठी पात्र झाला.
कोब्रा म्हणजेच सापाने हिरे आणि माणिक मोती शिवलिंगावर अर्पण करून भगवान शिवांची आराधना केली. काही काळाने तेथे हत्ती आला आणि त्याने शिवलिंगावर पाण्याची फवारणी करून भगवान शिवांची आराधना केली. पण हे करताना तो सापाने वाहिलेले हिरे आणि माणिकमोती काढून टाकायचा. काही दिवसाने हत्तीचे हे कृत्य सहन न होऊन साप हत्तीच्या सोंडेमध्ये शिरला. हे सहन न होऊन हत्तीने आपली सोंड भीतीवर आपटली आणि ह्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झाला. मात्र भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या दोघांनाही मोक्ष प्रदान केला. येथील शिव लिंगाच्या पायथ्याशी आपल्याला पांच शिरे असलेला साप, कोळी आणि हत्तीचे दोन दंत ह्यांची प्रतीके दिसतात.
कन्नप्पा नावाचा एक कट्टर शिवभक्त होता. त्याला एकदा शिवलिंगाच्या डोळ्यांमधून रक्त येत आहे असं दिसलं म्हणून त्याने स्वतःचे डोळे काढून शिवलिंगाला अर्पण केले. त्याच्या ह्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला मोक्ष प्रदान केला.
ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामधल्या दिव्याची ज्योत गाभाऱ्यामध्ये कुठलाही वारा नसताना पण लुकलुकते. ह्या गाभाऱ्याला कुठलीही खिडकी नाही. प्रत्यक्ष वायुदेवच उपस्थित आहेत ह्याचा प्रत्यय येथे येतो. येथील लिंग हे स्वयंभू लिंग आहे आणि ते श्वेत रंगाचे आहेत. हत्तीच्या सोंडेसमान भासणारं हे लिंग पांढऱ्या दगडाचे आहे.
इथे दगडामध्ये कोरलेली श्री विनायकाची मूर्ती आहे. हि मूर्ती जमिनीच्या पातळीवर स्थापित आहे. इथे बाकीच्या मंदिरात सहसा न आढळणाऱ्या श्री वल्लभ गणपती, श्री महालक्ष्मी गणपती ह्यांच्या मूर्ती तसेच सहस्र लिंगे आहेत. श्री ज्ञान प्रसुनाम्बिका ह्यांचं भव्य देवालय आहे. तसेच श्री काशीविश्वनाथ, श्री अन्नपूर्णी देवी, श्री सूर्यनारायण, श्री सद्योग गणपती आणि श्री सुब्रमण्यम ह्यांची छोटी देवालये आहेत. सूर्य पुष्करिणी आणि चंद्र पुष्करिणी नावाची दोन पवित्र तीर्थे आहेत.
मंदिरात साजरे होणारे सण:
चित्राई (एप्रिल-मे): ब्रह्मोत्सव
कार्तीगै (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्तीगै दीपं
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री (हा सण येथे खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो)
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment