मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ७ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री अर्धनारीश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
श्री नंदी हे खूप महत्वाचं दैवत आहे. किंबहुना असा समज आहे शिव आणि शक्ती मधून जेव्हां विश्व निर्माण होतं त्या घटनेचे श्री नंदी हे एकमेव साक्षी आहेत. आणि म्हणूनच श्री नंदींची आराधना केल्यामुळे आपल्याला सर्व आध्यात्मिक लाभ होतात आणि आपली ईश्वरकृपेची ग्रहणक्षमता वाढते. दक्षिण भारतातल्या शिव मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे की पुढे दिलेला श्री नंदीश्वरांचा श्लोक म्हणून त्यांची अनुज्ञा घेऊन मगच श्री शिव आणि श्री पार्वती देवींची आराधना करता येते. तो श्लोक असा आहे.
नंदीकेश महाभाग शिवध्यान परायण ।
गौरीशंकर सेवार्थम् अनुज्ञानम् दातुमर्हसि ||
श्री नंदी हे अंतर्ज्ञान आणि अंतःप्रेरणा ह्यांचे मूर्त स्वरूप आहेत. आणि म्हणूनच भगवान शिवाच्या लिंगाचं दर्शन हे श्री नंदींच्या दोन शिंगांच्या मधून घेण्याची प्रथा आहे. त्याचा अर्थ असा आहे कि श्री नंदींचं ध्यान करून आपली अंतर्ज्ञान आणि अंतःप्रेरणा ह्यांची क्षमता वाढली की आपोआपच आपली भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्याची तसंच ती जाणण्याची क्षमता पण वाढते. काही ठिकाणी अशी पण प्रथा आहे की भक्त हे आपल्या इच्छा श्री नंदीच्या कानात सांगतात ह्या विश्वासाने कि श्री नंदी आपल्या प्रामाणिक आणि न्याय्य प्रार्थना भगवान शिवांपर्यंत पोचवतील.
सर्व शिव मंदिरांमध्ये श्री नंदींची मूर्ती ही साधारणतः शिव लिंगाच्या समोर आढळते. हि रचना हे दर्शवते कि जिव म्हणजेच नंदी आणि जिवाने सतत एकांतामध्ये शिवाच्या ध्यानात असावं. श्री नंदी हे भगवान शिवाचे वाहन आहेत, सर्व शिव गणांमध्ये प्रथम आहेत आणि भगवान शिवांच्या देवालयाचे ते द्वारपाल पण आहेत. नंदी ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आनंदी व्यक्ती असा आहे. सहसा श्री नंदींचं रूप हे वृषभ रूपच असतं पण कधी कधी मानवी शरीर आणि वृषभाचे शिर असं पण रूप असतं. भारतामध्ये श्री नंदीदेवांची स्वतंत्र मंदिरे आहेत.
शैव पंथातल्या समजुतीनुसार श्री नंदी १८ सिद्ध मुनींपैकी मुख्य गुरु मानले जातात.
पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment