Sunday, April 16, 2023

श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या - भाग ७

मागच्या अंकात आपण श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ६ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री लिंगोद्भवर ह्या रूपाबद्दल माहिती वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री अर्धनारीश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया. 

शिव आणि शक्ती म्हणजेच भगवान शिव आणि श्री पार्वती देवी हे वेगळे नाहीत, एकच आहेत हे दर्शविण्यासाठी म्हणून भगवान शिवांनी आपल्या शरीराचा अर्धा भाग श्री पार्वतीदेवींना दिला. ह्या रुपाला श्री अर्धनारीश्वरर असं म्हणतात.

पुराणांनुसार एकदा सर्व ऋषीमुनी भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांना नमस्कार करण्यासाठी  कैलास पर्वतावर आले. फक्त भगवान शिवांचीच उपासना करण्याचा निश्चय केलेल्या भृंगी ऋषींनी श्री पार्वती देवींकडे दुर्लक्ष केलं. ह्यावर श्री पार्वती देवींना खूप राग आला आणि त्यांनी भृंगी ऋषींना शाप दिला कि त्यांच्या शरीरातले सर्व मांस आणि रक्त निघून जाऊन फक्त सापळा शिल्लक राहील. भृंगी ऋषींची ही दयनीय परिस्थीती  पाहून भगवान शिवांना त्यांची दया आली आणि त्यांनी भृंगी ऋषींना अजून एक पाय प्रदान केला ज्यामुळे ते व्यवस्थित उभे राहू शकतील. ह्या घटनेमुळे श्री पार्वती देवींना आपला पराभव झाला असे वाटले आणि म्हणून त्यांनी तीव्र तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन श्री पार्वती देवींना त्यांच्या मध्ये विलीन होण्याचं वरदान दिलं ज्यामुळे भृंगी ऋषींना अर्धनारीश्वरर रूपाची म्हणजेच भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची एकत्र उपासना करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पण भृंगी ऋषींनी एका भ्रमराचं रूप घेऊन अर्धनारीश्वर रूपाच्या मूर्तीला मधून छिद्र पडून फक्त भगवान शिवांनाच प्रदक्षिणा  घातली. भृंगी ऋषींची हि भगवान शिवांबद्दलची विलक्षण भक्ती पाहून श्री पार्वती देवी अचंबित झाल्या आणि प्रसन्न पण झाल्या आणि त्यांनी भृंगी ऋषींवर कृपा केली. 

कालिका पुराणानुसार एकदा श्री गौरी देवी म्हणजेच पार्वती देवींनी भगवान शिवांच्या हृदयामध्ये आपल्या सारख्याच स्त्रीचं प्रतिबिंब पाहून भगवान शिवांवर व्यभिचाराचा आरोप केला. दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पण तो लगेच मिटला. श्री गौरी देवींना इच्छा झाली कि आपण भगवान शिवांमध्ये विलीन व्हावं आणि भगवान शिवांनी ती मान्य केली आणि त्यातूनच अर्धनारीश्वरर हे त्यांचं रूप निर्माण झालं. शिव पुराणानुसार ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्यासाठी प्रजापती उत्पन्न केले पण ते सर्व स्त्रीरहित पुरुष असल्यामुळे ते सृष्टी निर्माण करण्यास असमर्थ होते. ब्रह्मदेवांनी भगवान शिवांकडे प्रार्थना केली. त्यावेळी भगवान शिव अर्धनारीश्वर (अर्ध स्त्री आणि अर्ध पुरुष) रूपात प्रगट झाले आणि त्या रूपातून बऱ्याच स्त्रिया निर्माण होऊन सृष्टीनिर्माण कार्यात मदत झाली.

दक्षिण भारतातील आणि आशिया खंडाच्या आग्नेय भागातील सर्व शिव मंदिरांमध्ये आपल्याला श्री अर्धनारीश्वर ह्यांची मूर्ती दिसते. तामिळनाडूमधल्या नमक्कल जिल्ह्यातील थिरुचेंगोड मध्ये आणि कल्लकुरीची या गावाच्या जवळ असलेल्या ऋषीवंदिअम ह्या स्थानी श्री अर्धनारीश्वर ह्यांची स्वतंत्र मंदिरे पाहायला मिळतात.  

पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री नंदिकेश्वरर ह्या रूपाबद्दल माहिती करून घेऊया. 


अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment