रामेश्वर ज्योतिर्लिंग तामिळनाडूमधील रामनाड जिल्ह्यामध्ये आहे. हे दक्षिण भारताचे टोक आहे. असे समजले जाते की गंगा नदीतील पाणी घेऊन रामेश्वरला अभिषेक केल्याशिवाय चार धाम यात्रा पूर्ण होत नाही आणि तसेच रामेश्वराहून थोडीशी वाळू घेऊन तिचे विसर्जन गंगेमध्ये करणे हा सुद्धा चार धाम यात्रेचा भाग आहे.
स्कंदपुराण व शिवपुराणात रामेश्वरचा उल्लेख महत्वाची पवित्र जागा असा केला आहे. रावणाचा पराभव केल्यावर श्रीरामाने शंकराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास तसेच त्याला वंदन करण्यास म्हणून शिवलिंगाची स्थापना करण्याचे ठरविले. रामाने हनुमानाला वाराणसीला जाऊन काशी विश्वेश्वराची प्रार्थना करून त्याची हुबेहूब प्रतिकृती आणावयास सांगितले. हनुमान मुहूर्तापर्यंत परत येऊ न शकल्याने सीतेने रामेश्वरातील समुद्रकाठी असलेल्या वाळूचे शिवलिंग तयार केले. वेदमंत्रांच्या घोषात, अभिषेक करून विधिपूर्वक सीतेने तयार केलेल्या लिंगाची प्रतिष्ठापना झाली. काशीहून परतल्यावर हे शिवलिंग पाहून हनुमान क्रोधाविष्ट झाला. त्याचा राग पाहून प्रभू श्रीराम हनुमानाला म्हणाले की सीतेने स्थापन केलेले लिंग तिथून काढून हनुमानाने आणलेले लिंग त्याच जागी स्थापित करावयास काही हरकत नाही. हनुमानाने त्याची सर्व शक्ती पणाला लावून सीतेने बसवलेले लिंग समूळ उखडण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते शक्य झाले नाही. लवकरच सीतेने निर्माण केलेल्या लिंगाचे महत्व हनुमानाच्या ध्यानात आले. पण श्रीरामाने आज्ञा केली की हनुमानाने आणलेल्या शिवलिंगाची स्थापना सीतेने स्थापन केलेल्या शिवलिंगाशेजारी करावी. अर्थातच श्रीरामाची आज्ञा पाळली गेली व म्हणूनच रामेश्वरला दोन लिंगे पहायला मिळतात. हनुमानाने आणलेल्या लिंगाला विश्वलिंग तर सीतानिर्मित लिंगाला रामलिंग असे संबोधले जाते. रामाने सांगितल्याप्रमाणे प्रथम दर्शन विश्वलिंगाचे होऊन मगच रामलिंगाचे दर्शन घ्यावयाचे असते. ही प्रथा आजतागायत चालू आहे.
दुसरी आख्यायिका अशी आहे की सीतेचा शोध घेत प्रभू रामचंद्र रामेश्वरला पोहोचले. ते पाण्याचा घोट घेणार तोच त्यांना आठवले की त्यांची शंकराची पूजा राहिली आहे. शंकराची पूजा करण्याआधी प्रभू रामचंद्र पाणीसुद्धा पीत नसत. त्यांनी शिवाची प्रार्थना करताच साक्षात शिव त्यांच्यासमोर अवतीर्ण झाले. रामाची इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकर रामेश्वरलिंग म्हणून तिथेच राहिले.
रामेश्वर देवळाच्या प्रदक्षिणा मार्गात पवित्र पाण्याचे चोवीस झरे आहेत. त्यांना रामतीर्थ किंवा रामकुंड असे म्हणतात. त्यांची नावे सीतातीर्थ, कपितीर्थ, ब्रह्मकुंड वगैरे आहेत. ही कुंडे म्हणजे चोवीस विहिरी आहेत व अशी प्रथा आहे की ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जाण्याआधी भक्तांनी सर्व कुंडांवर स्नान करून मगच दर्शनाला जावे. देवस्थानाने प्रत्येक कुंडावर सेवकांची नेमणूक केली असून ते बादलीभर पाणी भक्तांच्या डोक्यावर ओततात. इथे हे नमूद करावेसे वाटते की पाणी थंड असते व सर्वजण शेवटपर्यंत पाणी घेऊ शकतील हे खात्रीने सांगता येत नाही. पण जे शेवटपर्यंत जातात त्यांना अनपेक्षित वाटणारी घटना म्हणजे शेवटची तीन कुंडे गरम पाण्याची आहेत.
असा समज आहे की रामेश्वराच्या काठी पितृधर्म केल्यास पितरांना त्यांच्या कर्मापासून मुक्ती मिळून मोक्ष मिळायला सहाय्य होते.
No comments:
Post a Comment