महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर हे एक होय. हे स्थान सह्याद्री पर्वतावर महाराष्ट्रातील पुण्यापासून सुमारे १२५ किलोमीटरवर आहे.
शिवपुराणातील कथेनुसार त्रिपुरा या असुराने अत्यंत कठोर तपश्चर्या केली. त्याच्या उपासनेने सर्व देव भयभीत झाले. कारण त्याला इच्छित वर मिळाल्यास तो अतिशक्तिमान होणार हे उघड होते. ते सर्व देवेंद्राकडे गेले व त्रिपुराची उपासना थांबविण्याची त्याला विनंती केली. पण देवेंद्र काही करू शकण्याआधीच त्रिपुराने लोभ, मत्सर, हेवा, लालसा, वासना वगैरेंवर विजय मिळवला होता. म्हणून सर्व देव व इंद्र ब्रह्मदेवाकडे मदत मागण्यास गेले. ब्रह्मदेवानी देवांना मदत करण्याचे वचन देऊन तो स्वतः त्रिपुराकडे त्याच्या उपासना करण्याच्या ठिकाणी गेला. पण ब्रह्मदेव त्रिपुराच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाला आणि त्याने त्रिपुराला आशीर्वाद देऊन त्याला हवे असलेले खालील तीन वर दिले:
१. देव, असुर व यक्ष त्याला मारू शकणार नाहीत
२. सर्व जगामध्ये म्हणजेच तिन्ही लोकात तो पाणी आणि हवेमध्ये संचार करू शकेल,
३. इंद्र आणि अमरावतीसह संपूर्ण विश्वाला तो पादाक्रांत करू शकेल
ह्या तीन वरांखेरीज ब्रह्मदेवाने त्याला स्वतःहून आणखी एक वर दिला. त्यानुसार जर एखाद्याने एकाच बाणाने त्रिपुराच्या तीन पुरांना छेद दिला तरच त्याला मृत्यू येईल. त्रिपुराला वर प्राप्त झाल्याबरोबर तो एवढा माजला की सरसकट सर्वांना त्रास द्यायला त्याने सुरुवात केली. यज्ञामध्ये विघ्न आणणे, ब्राह्मणांचा अपमान करणे वगैरे उद्योग चालू केले. त्रिपुराचा वध करण्यासाठी शंकराची मदत घेण्याच्या इच्छेने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी ऋषी, देवगण व इंद्र या सर्वांनी शंकराची भक्ती चालू केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने इंद्राला सांगितले की जर त्याने सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या ज्योतिर्लिंगासमोर शिवाची तपश्चर्या केली तर त्रिपुराला मारावयास तो मदत करेल. इंद्र आणि देवांनी कठोर तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केल्यावर शंकराने सात दिवसांच्या आत त्रिपुराला मारण्याचे वचन दिले. शंकराने त्यानंतर नंदीवर आरूढ झालेल्या महाकाय मनुष्याचे रूप धारण केले. त्यावेळी त्याच्या हातात त्रिशूळ व डमरू असून त्याच्या अवतीभवती देवगण, डाकिनी व शाकिनी आदि योगिनी पण होत्या. तेव्हा शंकर भीमासारखा (पाच पांडवांपैकी) दिसत होता, म्हणून त्याला भीमाशंकर हे नाव पडले.
त्रिपुराचा वध केल्यावर देवांच्या व ऋषींच्या विनंतीवरून शंकराने तिथेच वास्तव्य केले आणि तेव्हापासून तो भीमाशंकर याच नावाने ओळखला जातो.
भीमाशंकराचे मंदिर प्राचीन असून कित्येक शतकांपूर्वी बांधले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देवळाची देखभाल व पूजाअर्चेसाठी देणगी दिली होती असे म्हणतात. तसेच पेशव्यांचे सचिव नाना फडणवीस यांनी कळसाची पूनर्बांधणी केली असेही म्हणतात.
भीमा नदीचा उगम येथेच आहे. आख्यायिका अशी आहे की त्रिपुरा व भीमाशंकराच्या घनघोर युद्धात शंकराला घाम आला व त्यापासून भीमा नदी उत्पन्न झाली.
इथे पार्वतीचे पण मंदिरआहे व ती कमळजा या नावाने प्रसिद्ध आहे. पार्वतीने इथे एका असुराचा वध केला. तेव्हा देवांनी व ऋषींनी तिची कमळाने पूजा केली म्हणून ती कमळजा या नावाने येथे पुजली जाते.
भीमाशंकर मंदिराच्या पाठीमागे मोक्षकुंड तीर्थ नावाचे कुंड आहे. त्याच्याशी कौशिक मुनींचे नाव जोडले गेले आहे कारण त्यांनी येथे शिवाची आराधना केली. त्याच्याखेरीज तिथे सर्व तीर्थ व कुषारण्य तीर्थ या नावाची दोन तीर्थे असून ज्ञानकुंड नावाचे कुंड आहे.
भीमाशंकर येथील शंकराची आराधना करण्यास महाशिवरात्र व श्रावणी सोमवार हे दिवस विशेष महत्वाचे मानले जातात.
No comments:
Post a Comment