नन्नीलं कुंभकोणम-नागोर मार्गावर कुंभकोणम पासून ३० किलोमीटर्स वर, मयीलादुथुराई पासून ३० किलोमीटर्सवर आणि थिरुवारुर पासून १६ किलोमीटर्सवर आहे. ह्या स्थळाला नन्नीलथू पेरुंगकोईल असं पण नाव आहे. हे कावेरी नदीच्या काठावर वसलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी एक आहे. हे कोचेंगाट चोळा राजाने कावेरी नदीच्या उपनदी असलेल्या मुडीकोंडन ह्या नदीच्या काठावर बांधलेल्या माड कोविल मंदिरांपैकी पण एक मंदिर आहे. मंदिराचं वर्तमान बांधकाम १४०० वर्षे जूनं आहे. शैव संत सुंदरर ह्यांनी ह्या मंदिरातील भगवान शिवांची स्तुती गायली आहे. म्हणून हे मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. ह्या मंदिरामध्ये शिलालेख आहेत पण ते विस्कळीत स्थितीत आहेत.
मूलवर: श्री मधुवनेश्वरर, श्री बृहदीश्वरर, श्री देवारण्येश्वरर, श्री प्रकाशनाथर, श्री कल्याणसुंदरर
देवी: श्री पेरियानायकी, श्री मधुवननायकी, श्री देवकांथरा नायकी
आगम / पूजा: शिव आगम
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, शूल तीर्थ, देव तीर्थ, कोंगू तीर्थ आणि वेंगाई तीर्थ
पवित्र वृक्ष: बिल्व
पुराणिक नाव: सुंदरवनम, मधुवनम, देवारण्यम, बृहद्पुरम, सुंदरवाणी, श्री नन्नीलथू पेरुंगकोईल
वर्तमान नाव: नन्नीलं
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार त्रेतायुगामध्ये वृद्धासुर नावाच्या राक्षसाने देवांना खूप त्रासलं. भगवान शिवांनी सर्व देवांना मधमाश्यांमध्ये रूपांतरित केलं. त्यांनी देवांना गाभाऱ्याभोवती मधमाश्यांची पोळी तयार करून त्यामध्ये राहून त्यांची पूजा करायला सांगितलं. म्हणून इथे भगवान शिवांना श्री मधुवनेश्वरर असं संबोधलं जातं आणि श्री पार्वती देवींना श्री मधूवन नायकी असं संबोधलं जातं आणि ह्या स्थळाला मधुवन असं संबोधलं जातं. अजूनही इथे गाभाऱ्याच्या बाजूला तसेच श्री सोमस्कंदर ह्यांच्या देवालयाच्या बाजूला मधमाश्यांची पोळी दिसतात.
२. पुराणानुसार एकदा आदिशेष आणि वायुदेवांमध्ये कोण शक्तिमान आहे ह्याबद्दल वाद निर्माण झाला. आदिशेषाने मेरू पर्वताची १००० शिखरे आच्छादली आणि त्यांना घट्ट धरून ठेवले. त्याला प्रतिसाद म्हणून वायुदेवाने मेरू पर्वताला आदिशेषांच्या तावडीतून सोडविण्यासाठी अतिवेगाचा वारा निर्माण करून आदिशेषांना हटविण्याचा प्रयत्न केला. त्या अतिवेगाच्या वाऱ्याने सारी पृथ्वी डगमगायला लागली. देवांच्या आणि ऋषींच्या विनंतीवरून आदिशेषांनी मेरू पर्वताचं एक शिखर मोकळं केलं. तसं केल्या केल्या वायुदेवांनी त्या शिखराचे तुकडे केले आणि अतिवेगवान वाऱ्याने ते दक्षिण दिशेला फेकले जेणेकरून ते समुद्रात जाऊन पडले. समुद्राच्या मार्गावर त्यातील काही तुकडे दक्षिण भारतामध्ये ठिकठिकाणी पडले आणि त्यांचे रूपांतर टेकड्यांमध्ये झाले. असा समज आहे की अशाच एका टेकडीवर हे मंदिर बांधले गेले.
३. पुराणानुसार कृतयुगामध्ये सोमपुरीमध्ये बृहद् नावाचा राजा होता. त्याने इथे येऊन भगवान शिवांची उपासना केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला तेजोलिंग रूपामध्ये दर्शन दिलं. राजाने भगवान शिवांना यांच्या त्रिशुळाने तीर्थ निर्माण करण्याची विनंती केली आणि ते तीर्थ गंगेच्या पाण्याने भरावं अशी पण विनंती केली. म्हणून ह्या तीर्थाला बृहद् तीर्थ किंवा शूळ तीर्थ असे नाव आहे.
४. पुराणानुसार जालंधसुर ह्या राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी देवांनी स्त्रियांचं रूप घेऊन ह्या ठिकाणी येऊन आसरा घेतला. त्यांनी शूळ तीर्थामधल्या पाण्याने भगवान शिवांची पूजा करून त्यांना मदत करण्याची विनंती केली. त्यांच्या पूजेवर आणि प्रार्थनेवर प्रसन्न होऊन इथून जवळ असलेल्या थिरुवीरकुडी येथे राक्षसाचा संहार केला. म्हणून ह्या स्थळाला देवारण्यम असे नाव प्राप्त झाले आणि ह्या तीर्थाला देवतीर्थ असे नाव प्राप्त झाले.
५. वृद्धासुराचा वध केल्याने प्राप्त झालेल्या ब्रह्महत्या दोषाचे निवारण करण्यासाठी इंद्र देवांनी इथे येऊन शूल तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची उपासना केली. भगवान शिवांनी त्यांना ह्या दोषापासून मुक्ती केलं.
६. श्री विष्णूंनी जालंधरसुराबरोबर त्यांचं चक्र वापरून घनघोर युद्ध केलं. ते चक्र इथे पडलं आणि त्यातून तीर्थ निर्माण झालं. ह्या तीर्थाचे नाव चक्र तीर्थ असं प्रचलित झालं.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
श्री ब्रह्म, श्री इंद्र, श्री वरुण, श्री कुबेर, श्री यमदेव, श्री सूर्यदेव, देव, अगस्त्य ऋषी, बृहद् राजा, आदिशेष.
वैशिष्ट्ये:
१. शैव संत संबंधर ह्यांनी ह्या स्थळाला नन्नीलथू पेरुंगकोईल असं संबोधलं आहे.
२. श्री ब्रह्मदेव श्री सूर्यदेवांच्या बाजूला आहेत.
३. नवग्रह देवालयामध्ये सगळ्या मूर्ती सूर्याकडे मुख करून आहेत.
४. सूर्य आणि गुरु एकमेकांकडे मुख करून आहेत.
५. चित्रगुप्त आणि श्री शनीश्वरांचं स्वतंत्र देवालय आहे.
६. मासी ह्या तामिळ महिन्याच्या माघ नक्षत्र दिवशी ब्रह्म तीर्थामध्ये स्नान करणं हे खूप शुभ समजलं जातं
७. गाभाऱ्याचा प्रवेश खूप अरुंद आहे. गाभाऱ्याकडे जाण्यासाठी १८ पायऱ्या चढून जायला लागतं.
८. ह्या मंदिराच्या आतमध्ये आणि गाभाऱ्यात मधमाश्यांचे पोळे आहेत. पण त्याचा कुणाला त्रास होत नाही.
९. इथे श्री चंडिकेश्वरर त्यांच्या पत्नींसमवेत चित्रित केले आहेत.
१०. असा समज आहे की शूल तीर्थ भगवान शिवांनी आपल्या त्रिशुळाने बनवले.
११. श्री नटराजांचे इथे स्वतंत्र देवालय आहे.
१२. इथे श्री यमदेव, श्री वरुण, श्री इंद्रदेव आणि श्री कुबेर ह्यांनी भगवान शिवांची उपासना करून शिव लिंगे प्रस्थापित केली. श्री यमदेव दक्षिणाभिमुख असून बैठ्या मुद्रेमध्ये आहेत, श्री वरुण पश्चिमाभिमुख आहेत, श्री इंद्रदेव पूर्वाभिमुख तर श्री कुबेर उत्तराभिमुख आहेत.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्या मंदिराला दोन स्तरांचं राजगोपुर आहे आणि त्यावर पांच कलश आहेत. मंदिराच्या प्रवेशावर भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवी ह्यांचे नंदीसमवेत एक सुंदर शिल्प आहे. त्यांच्या डाव्याबाजूला श्री सुब्रमण्यम आहेत तर उजव्याबाजूला श्री गणपती आहेत. तसेच भगवान शिवांच्या आजूबाजूला दोन भुतगण आहेत.
इथले शिवलिंग स्वयंभू आहे आणि चौकोनी पायथ्यावर (अवूदयार) आहे. हे माड कोविल असल्याकारणाने भगवान शिव वरच्या पातळीवर (थोडे उंचावर) आहेत.
मंदिरात प्रवेश केल्यावर बलीपीठ आणि ध्वजस्तंभ आहेत.
कोष्ट मूर्ती: श्री नर्दन विनायक, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गादेवी आणि श्री सोमस्कंदर. हे सगळे मंदिराच्या प्रकारामध्ये एका लहानश्या उंचवट्यावर (टेकडी) आहेत.
श्री अंबिकादेवींचे देवालय दक्षिणाभिमुख आहे आणि ते खालच्या पातळीवर आहे. ज्या उंचवट्यावर कोष्ठ मूर्ती आहेत त्याच्या खाली पुढील देवालये आणि मूर्ती आहेत - श्री सिद्धिविनायक, आपल्या पत्नींसमवेत श्री सुब्रमण्यम, श्री महालक्ष्मी, श्री चंडिकेश्वरर त्यांच्या पत्नीसमवेत.
श्री अगस्थीश्वरर, श्री ब्रह्मपुरीश्वरर आणि श्री शैलेश ह्या नावांची शिव लिंगे आहेत. ह्याशिवाय श्री भैरव, श्री सूर्य, नाग आणि नवग्रह मूर्ती आहेत.
श्री नटराजांचे एक स्वतंत्र देवालय आहे.
श्री दक्षिणामूर्ती सोडून इतर सर्व कोष्ट मूर्ती जमिनीच्या पातळीवर आहेत.
श्री चित्रगुप्त आणि श्री यमदेव ह्यांचे स्वतंत्र देवालय आहे.
इथे पुढील शिव लिंगे आहेत - श्री यमदेवांनी पुजीलेलं शिव लिंग (दक्षिणाभिमुख), श्री वरुण देवांनी पुजीलेलं शिव लिंग (पश्चिमाभिमुख), श्री इंद्रदेवांनी पुजीलेलं शिव लिंग (पूर्वाभिमुख), श्री कुबेरांनी पुजीलेलं शिव लिंग (उत्तराभिमुख), श्री अगस्त्य ऋषींनी पुजीलेलं शिव लिंग आहे ज्याचं नाव अगस्त्यलिंग असे आहे आणि श्री ब्रह्मदेवांनी पुजीलेलं शिव लिंग आहे ज्याचे नाव ब्रह्मलिंगं असे आहे. भगवान शिवांच्या गाभाऱ्यामध्ये श्री भोगशक्तींची कास्याची मूर्ती आहे. श्री सोमस्कंद, श्री दक्षिणामूर्ती आणि श्री नर्दन गणपती ह्यांच्या देवालयाकडे जाण्यासाठी पायऱ्या चढून जायला लागतं. श्री सूर्यदेवांच्या बाजूला श्री भैरवांची मूर्ती आहे. श्री शनीश्वरांचे स्वतंत्र देवालय आहे. उत्तरेकडे असलेले शूल तीर्थ भगवान शिवांनी आपल्या त्रिशुळाने तयार केले.
प्रार्थना:
१. भाविकांचा असा समज आहे की इथे भगवान शिवांची पूजा केल्याने त्यांच्या सर्व मानसिक रोगांचे निवारण होते.
२. भाविकांचा असा समज आहे की एकादशी आणि प्रदोष दिवशी पवित्र तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केल्यास मुक्ती प्राप्त होते.
३. भाविकांचा असा समज आहे की मासी ह्या तामिळ महिन्याच्या माघ नक्षत्र दिवशी ब्रह्मतीर्थामध्ये स्नान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
पूजा:
रोज चार पूजा केल्या जातात. ह्याशिवाय साप्ताहिक पूजा तसेच पाक्षिक पूजा (प्रदोष पूजा, अमावस्या, पौर्णिमा दिवशी पूजा) केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
वैकासि (मे-जून): वैकासि विशाखम उत्सव
आनी (जून-जुलै): थिरुमंजनम
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम (पूर्वा फाल्गुनी नक्षत्र दिवशी पूजा)
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरुकार्थिगई दीपम
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति, पुष्य नक्षत्र दिवशी उत्सव
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
आडी महिन्याच्या स्वाती नक्षत्र दिवशी सुंदरर ह्यांची गुरुपूजा केली जाते. तसेच कार्थिगई, वैकासि आणि मारगळी ह्या महिन्यांमध्ये भगवान शिवांची मिरवणूक काढली जाते.
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते १२, दुपारी ४ ते रात्री ८
मंदिराचा पत्ता:
श्री मधुवनेश्वरर मंदिर,
ऍट पोस्ट नन्नीलं,
तालुका: नन्नीलं,
जिल्हा: थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१०१०५
दूरध्वनी: +९१-९४४२६८२३४६, +९१-९९४३२०९७७१
मंदिराचा पुजारी: श्री शिवकुमार गुरुक्कल - +९१-७९०४३७४७७०
No comments:
Post a Comment