पूर्वी आडूथुराईला तेनकुरुंगाडूथुराई असं नाव होतं. हे शिव मंदिर कंजनूरशी संबंधित सप्तस्थानांपैकी एक आहे. मयीलादुथुराई - कुंभकोणम मार्गावर कुंभकोणम पासून साधारण १३ किलोमीटर्स वर तर मयीलादुथुराई पासून २० किलोमीटर्स वर हे मंदिर स्थित आहे. हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. मूळ मंदिर विटांचे बांधले होते. नंतर चोळा राणी सिम्बिअन महादेवी हिने हे मंदिर ग्रॅनाईट वापरून बांधलं. शैव संत अप्पर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. इथे १५ शिलालेख आहेत ह्यामध्ये पांड्या, चोळा आणि चेरा राजांनी ह्या मंदिरासाठी केलेल्या कामांचे आणि देणग्यांचे उल्लेख आहेत. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिरातील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे.
मूलवर: श्री आपत्सहायेश्वरर
देवी: श्री पवळकोडी अम्माई
क्षेत्र वृक्ष: पारिजात वृक्ष (तामिळमध्ये पवळमल्लीगै)
पवित्र तीर्थ: सहाय तीर्थ, सूर्य तीर्थ (मंदिराच्या समोर)
पुराणिक नावे: तेनकुरुंगाडूथुराई, थिराईमूरनाडू, भुबलाकुळवल्ली
वर्तमान नाव: आडूथुराई
क्षेत्र पुराण:
१. स्थळ पुराणानुसार वानरांचा राजा वाली ह्याने काही गैसमजुतीमुळे आपल्या भावाला म्हणजेच सुग्रीवाला राज्यातून बाहेर घालवलं. पुराणानुसार वाली आणि सुग्रीवांच्या युद्धामध्ये जेव्हां सुग्रीवाने भगवान शिवांना मदतीसाठी प्रार्थना केली, त्यावेळी भगवान शिवांनी सुग्रीवांना वाचवलं. त्यांनी सुग्रीवांचं अन्नपरवै (ह्याचा अर्थ श्वेत हंस असा समजला जातो) ह्या पौराणिक पक्षामध्ये रूपांतर केलं. त्याच वेळेस सुग्रीवांच्या पत्नीचे पण त्यांनी पारिजात वृक्षामध्ये रूपांतर केलं आणि सुग्रीवांना पारिजात वृक्षाच्या मागे लपवलं. त्यांनी सुग्रीवांना संकटातून वाचवलं म्हणून भगवान शिवांना इथे श्री आपत्सहायनाथर (ज्यांनी आपत् म्हणजेच संकटातून वाचवलं).
२. जेव्हां प्रभू श्रीराम आणि सीता देवी वनवासात होते तेव्हां ते हनुमान आणि सुग्रीवांबरोबर इथे आले आणि त्यांनी भगवान शिवांची पूजा केली.
३. स्थळपुराणानुसार इथून जवळ असलेल्या थिरुमंगलकुडी ह्या गावामध्ये एक स्त्री होती जी भगवान शिवांची भक्त होती. ती ह्या मंदिराला नियमित भेट देऊन भगवान शिवांची पूजा करायची. जेव्हां ती प्रसूत होती तेव्हां ती नेहमी प्रमाणे ह्या मंदिरात येऊन तिने पूजा केली. जेव्हां ती मंदिरातून परत जायला निघाली तेव्हा ती आपल्या गावात पोचू शकली नाही कारण नदीला पूर आला होता. तेव्हांच तिला प्रसूती वेदना पण चालू झाल्या होत्या. तिने भगवान शिवांना मदतीसाठी प्रार्थना केली. असा समज आहे की भगवान शिव एका परिचारिकेच्या रूपात आले आणि त्यांनी त्या स्त्रीची प्रसूती करवली.
४. क्षेत्र पुराणानुसार इथे हरदत्त नावाचा शिव भक्त होता. त्याचा जन्म इथल्या जवळच्या गावात वैष्णव कुटुंबात झाला होता पण तो स्वतः कट्टर शिव भक्त बनला. तो रोज रात्रीच्या जेवणाआधी कंजनूरशी संबंधित सप्त स्थानांना भेट द्यायचा (कंजनूर, थिरुक्कोडीकवळ, थिरुवेंगाडू, थिरवडूथुराई, आडूथुराई, थिरुमंगलकुडी आणि थिरुमनथुराई). एकदा तो दर्शन घेऊन आपल्या घराकडे निघाला होता त्यावेळेस जोरात पाऊस चालू झाला. त्यामुळे काळोख आणि पाऊस ह्यांच्यामुळे तो परत घरी पोचू शकला नाही. असा समज आहे कि त्यावेळी भगवान शिव ब्राह्मणाच्या रूपात आले आणि त्यांनी हरदत्ताला आपल्या घरी पोचण्यास मदत केली.
५. असा समज आहे की श्री भैरव आणि अगस्त्य मुनी ह्यांनी इथे भगवान शिवांची पूजा केली.
६. अगस्त्य आणि इतर ऋषी चिंदंबरंमध्ये भगवान शिवांनी केलेलं वैश्विक नृत्य पाहू शकले नाहीत म्हणून त्यांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी त्यांना ते नृत्य इथे करून दाखवलं. ह्या नृत्याला आनंदतांडव असे नाव आहे.
७. अगस्त्य ऋषी त्यांच्या तीर्थयात्रेमध्ये इथे येऊन पोचले. त्यांनी इथे स्वर्णाकर्ष भैरव ह्यांची स्थापना केली आणि भगवान शिवांकडून वरदाने प्राप्त केली.
८. एकदा श्री हनुमान तन्मयतेने कैलास पर्वतावर भगवंताची स्तुती गात होते. जेव्हां नारद मुनी तिथे पोचले तेव्हां ते त्या गायनाने मंत्रमुग्ध झाले आणि ते तिथेच बसून राहिले. त्यांनी आपली वीणा जमिनीवर ठेवली. ते गायन ऐकण्यामध्ये एवढे तन्मय झाले होते कि त्यांनी परत आपल्या वीणेकडे जेव्हां बघितलं तेव्हां ती बर्फाने आच्छादली गेली होती. त्यामुळे ते ती वीणा काढू शकले नाहीत. त्यांना श्री हनुमानाचा खूप राग आला आणि त्यांनी श्री हनुमानाला शाप दिला ज्यामुळे श्री हनुमानांची गायन कला लुप्त झाली. श्री हनुमान इथे आले आणि त्यांनी भगवान शिवांची पूजा केली ज्यामुळे त्यांना त्यांची गायन कला परत प्राप्त झाली.
ह्याठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
प्रभू श्रीराम, सीता देवी, श्री लक्ष्मण, श्री हनुमान, सुग्रीव आणि त्यांची पत्नी, अगस्त्य आणि इतर ऋषी, संत हरदत्त, श्री ब्रह्म आणि श्री भैरव.
वैशिष्ट्ये:
१. इथला गाभारा अर्धवर्तुळाकार खंदकाच्या आकाराचा आहे.
२. प्रत्येक वर्षी चित्राई ह्या तामीळ महिन्याच्या ५व्या, ६व्या आणि ७व्या दिवशी सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
३. श्री नटराज, श्री गंगाधर, श्री विष्णुदुर्गा देवी, श्री भिक्षाटनर आणि श्री ब्रह्म खूप सुंदर आहेत.
४. ह्या मंदिरातली सर्व शिल्पे उत्कृष्टपणे कोरली आहेत.
५. इथे एक शिल्प आहे ज्यामध्ये वानरराजा सुग्रीवाशी संबंधित स्थळ पुराण चित्रित केले आहे.
६. असा समज आहे की जर एखाद्या पिता-पुत्रांमधलं नातं विस्कळीत झालं असेल तर त्यांनी इथे येऊन एकत्र श्री सूर्य आणि श्री शनी ह्यांची पूजा केली तर त्यांचं नातं परत सुरळीत होतं.
७. नवग्रह संनिधीमध्ये सर्व आठ ग्रह सूर्याकडे मुख करून आहेत.
८. गाभाऱ्याच्या विमानावर एक मूर्ती आहे ज्यामध्ये वाली आणि सुग्रीव हे भगवान शिवांची पूजा करत आहेत.
९. हे स्थळ कावरी नदीच्या दक्षिण काठावर आहे म्हणून ह्या स्थळाला तेनकुरुंगाडूथुराई (तेन म्हणजे दक्षिण). कुरुंग म्हणजे वानरांचा राजा सुग्रीव ज्याने इथे भगवान शिवाची पूजा केली.
मंदिराबद्दल माहिती:
गाभाऱ्यामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थ मंडप आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख असून इथे तीन स्तरांचं राजगोपुर आहे आणि दोन परिक्रमा आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर नंदि आणि बलीपीठ त्यांच्या नेहमीच्या जागी दिसतात पण इथे ध्वजस्तंभ नाही. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. गाभारा खंदकाच्या आकाराचा आहे. गाभारा अर्धवर्तुळाकार खंदकाच्या आकाराचा आहे. मंडपामध्ये नंदि, बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि विनायक आहेत.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री नर्थन विनायकर, अगस्त्य ऋषी, श्री नटराज, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्म, श्री गंगाधरर, श्री भिक्षाटनर, श्री दुर्गा देवी. श्री अंबिका देवींचे देवालय बाहेरील परिक्रमेमध्ये असून दक्षिणाभिमुख आहे. नवग्रह संनिधी आतील परिक्रमेमध्ये आहे आणि इथे सगळे ग्रह सुर्याभिमुख आहेत.
परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री गजलक्ष्मी, इंद्र लिंग, कुबेर लिंग, श्री चंडिकेश्वर, श्री चंडिकेश्वरी, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री गणेश, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री सोमस्कंदर, शैव संत नालवर, श्री वायू, श्री महागणपती आणि श्री काशीविनायकर.
बाहेरील प्रकारामध्ये पुढील देवालये आहेत: श्री काशी विश्वनाथ आणि श्री विशालाक्षी, श्री विनायक, श्री मुरुगन आणि श्री शिवकामी देवीसमवेत श्री नटराज.
श्री नटराजांच्या देवालयासमोरच्या मंडपामध्ये पुढील देवालये आहेत: श्री शनीश्वरर, बाण लिंग, शैव संत हरदत्त आणि श्री स्वर्णाकर्ष भैरव. इथे एक स्टुक्को चित्र आहे ज्यामध्ये स्थळ पुराणे चित्रित केली आहेत ज्यामध्ये सुग्रीव भगवान शिवांची पूजा करत आहेत, भगवान शिव सुग्रीवांचं श्वेत हंसामध्ये रूपांतर करत आहेत आणि सुग्रीवांच्या पत्नींचं पारिजात वृक्षामध्ये रूपांतर करत आहेत. तसेच इथे अजून एक चित्र आहे ज्यामध्ये शैव संत कारैक्कल अम्माईयार आणि राणी सिंबिअन महादेवी श्री आपत्सहायेश्वरर ह्यांची पूजा करत आहेत.
ज्या मंडपामध्ये सगळे उत्सव साजरे होतात त्या मंडपाला अप्पर अरंगम असं नाव आहे.
प्रार्थना:
१. इथे पिता पुत्र शनिवारी आणि रविवारी नातेसंबंध सुदृढ राहण्यासाठी एकत्र पूजा करतात.
२. समृद्धी प्राप्तीसाठी भाविक जन इथे भगवान शिव आणि श्री पार्वती देवींची पूजा करतात
३. पौर्णिमेला भाविक जन इथे अगस्त्य मुनींच्या मूर्तीला विशेष तेल लावून पूजा करतात. असा समज आहे की ह्यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
४. भाविक जन इथे कालसर्प दोष निवारणासाठी भगवान शिवांवर अभिषेक करतात.
पूजा:
दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा नियमित केल्या जातात. अमावास्येच्या दिवशी अगस्त्य ऋषींची विविध वरदाने मिळविण्यासाठी विशेष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री विनायकी चतुर्थी
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथुराई
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराचा पत्ता: श्री आपत्सहायेश्वरर मंदिर, आडूथुराई पोस्ट, थिरुविडाईमरुथुर तालुका, तामिळ नाडू ६१२१०१
दूरध्वनी: ९४४३४६३११९, ९४४२४२५८०९
No comments:
Post a Comment