साधारण सहाव्या ते आठव्या शतकांतर्गत दक्षिण भारतामध्ये ६३ शैव संत होऊन गेले जे भगवान शिवांचे परम भक्त होते. त्यामध्ये सर्व प्रकारचे स्त्री पुरुष होते जसे राजे, व्यापारी तसेच मजूर पण होते. ह्या सर्व संतांना एकत्र ६३ नायनमार असं संबोधलं जातं. त्यांच्या स्पृहणीय भक्तीभावनेतून त्यांनी अनेक शिव मंदिरांचे दर्शन घेतले आणि त्या मंदिरात त्यांनी तेथील भगवान शिवांची तसेच त्या मंदिरांची स्तुती गायली. ह्याचा अर्थ ही मंदिरे सहाव्या शतकाच्याही आधीपासुन अस्तित्वात आहेत. नायनमारांनी गायलेल्या स्तोत्रांच्या संग्रहाला थिरूमुरै असं म्हणतात. थिरूमुरै हा परत तीन संग्रहांचा संग्रह आहे. ते तीन संग्रह असे - थिरूमुलर ह्यांनी गायलेल्या स्तोत्रांचा संग्रह ज्याला थिरुमंथिरं असं म्हणतात; अप्पर, सुंदरर आणि संबंधर ह्यांनी गायलेल्या स्तोत्रांचा संग्रह ज्याला थेवरम म्हणतात आणि माणिकवचगर ह्यांनी गायलेल्या स्तोत्रांचा संग्रह ज्याला थिरुवाचगं असं म्हणतात.
ह्या स्तोत्रांमधे ज्या मंदिरांची स्तुती गायली आहे त्या मंदिरांना एकत्रितपणे पाडळ पेथ्र स्थळं असं म्हणतात, म्हणजे ज्या मंदिरांची स्तुती गायली गेली आहे अशी मंदिरे. ही मंदिरे पुढील ९ प्रदेशांमध्ये विखुरलेली आहेत
१. चोळा नाडू I - कावेरी नदीचा उत्तरेकडचा काठ (६३ मंदिरे)
२. चोळा नाडू II - कावेरी नदीचा दक्षिणेकडचा काठ (१२७ मंदिरे)
३. थोंडई नाडू (३२ मंदिरे) (चेन्नई, कांचीपुरम प्रदेश)
४. नडू नाडू (२२ मंदिरे) (मध्यवर्ती तामिळनाडू)
५. पांड्या नाडू (१४ मंदिरे) (मदुराई प्रदेश)
६. कोंगु नाडू (७ मंदिरे) (सेलम, कोइम्बतुर प्रदेश)
७. वड नाडू (५ मंदिरे) (उत्तर भारत)
८. ईळ नाडू (२ मंदिरे) (सिलोन)
९. तुलूवा नाडू (१ मंदिर) (गोकर्ण महाबळेश्वर, कारवार)
ह्यातील प्रत्येक मंदिराची माहिती प्रकाशित करण्याचा आम्ही एक नम्र प्रयत्न करत आहोत.
येणाऱ्या सप्ताहांमध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करायला सुरुवात करू. प्रत्येक गुरुवारी इंग्लिश मध्ये तर प्रत्येक रविवारी मराठी मध्ये आम्ही प्रकाशित करणार आहोत.
देवाने आम्हाला दिलेल्या ह्या संधीसाठी आम्ही देवाचे आभारी आहोत तसेच वाचक ज्यांच्यामुळे आम्हाला ही माहिती संकलित करण्याची प्रेरणा मिळत आहे त्यांचे पण आम्ही आभारी आहोत. ह्या लेखांमध्ये काही त्रुटी किंवा चुका आढळल्यास त्या आम्हाला जरूर कळवा जेणेकरून आम्ही त्या दुरुस्त करू.
No comments:
Post a Comment