सप्त विडंग स्थळांमधलं हे चौथं मंदिर आहे. इथल्या विडंगाचे नाव आदि विडंगर आहे. तसेच हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळांमधलं पण एक मंदिर आहे आणि हे कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसलं आहे. श्रेष्ठ शैव संत संबंधर आणि अप्पर ह्यांनी त्यांनी रचलेल्या स्तोत्रांमधे ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. ह्या ठिकाणी भगवान शिवांनी जे नृत्य केलं त्याचे नाव कुक्कुट नृत्य असे आहे. तामिळ नाडूमधल्या थिरुवारुर जिल्ह्यातील थिरुक्करईल ह्या गावात हे मंदिर वसलं आहे.
मूलवर: श्री कण्णयारनाथर
देवी: श्री कैलासनायकी
क्षेत्र वृक्ष: फणस
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, शेष तीर्थ
पुराणिक नाव: थिरुक्करयील, थिरुक्करैवासल
वर्तमान नाव: थिरुक्करवासल
जिल्हा: थिरुवरुर, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
हरड्याची पूड पाण्यामध्ये मिसळली कि पाणी स्फटिकासारखं स्वच्छ होतं आणि त्याला औषधी गुण पण येतात. एक व्यापारी होता जो ह्या मंदिरामध्ये औषधी गुण असलेल्या जायफळाची पोती घेऊन आला. भगवान विनायक एका मुलाच्या रूपामध्ये त्या व्यापाऱ्याकडे आले. त्यांनी त्या व्यापाऱ्याकडे त्या पोत्यांमध्ये काय आहे ह्याची चौकशी केली. व्यापाऱ्याला कर भरायचा नव्हता म्हणून त्याने आपल्या पोत्यांमध्ये हरडा आहे असे सांगितले. तो मुलगा म्हणजेच भगवान विनायक परत गेले. जेव्हां त्या व्यापाऱ्याने पोती उघडून पाहिले तर त्याला त्यामध्ये हरडाच दिसला. त्या व्यापाऱ्याला कळून चुकले कि तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान विनायक होते. त्याने मनोमन भगवान विनायकांकडे क्षमायाचना केली. त्या क्षमायाचनेचे फळ म्हणून त्याच्या पोत्यांमध्ये परत जायफळ आले. तेव्हांपासून इथे भगवान विनायकांचे नाव करक्काई विनायक असे प्रसिद्ध झाले.
तामिळ कन्या महिन्याच्या पौर्णिमेला श्री इंद्रदेवांनी इथे भगवान शिवांची पूजा केली.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
भगवान विष्णू, श्री महालक्ष्मी, श्री इंद्र देव, पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी.
मंदिराबद्दल माहिती:
कण्ण म्हणजे डोळे, अयारिअम म्हणजे सहस्र नयन असलेला, उडयार म्हणजे स्वामी. म्हणजे ह्या मंदिराचा स्वामी म्हणजेच भगवान शिव ह्यांना सहस्र नयन आहेत.
हे मंदिर थिरुवरुर पासून ११४ किलोमीटर्स तसेच मन्नारगुडी पासून ३० किलोमीटर्स वर थिरुथुराईपुंडी मार्गावर आहे. ह्या मंदिराच्या आसपासचा भाग करहील वृक्षांनी घनदाट भरलेला आहे.
हे मंदिर पूर्वाभिमुख असून ह्या मंदिराचा व्याप साधारण १ एकर आहे. ह्या मंदिरात राजगोपुर आणि ध्वजस्तंभ नाही. इथले बलीपीठ धातूने आच्छादलेले आहे. इथे श्री नंदि हे थोड्या वरच्या पीठावर आहेत. इथे एक तीन स्तरांचे गोपुर आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर उजवीकडे एक शिलालेख आहे ज्यामध्ये ह्या क्षेत्राची माहिती दिली आहे. हे मंदिर साधारण १७०० वर्षे जुनं आहे.
मंदिरातील इतर मूर्ती आणि देवालये:
इथे परिक्रमेमध्ये भगवान विष्णू, श्री षण्मुख, श्री भैरव, श्री सरस्वती देवी आणि श्री गजलक्ष्मी देवी ह्यांची देवालये आहेत. तसेच बरीच शिव लिंगे आहेत. तसेच येथील उत्सवर, ज्यांचे नाव सुंदरर आहे, त्यांचे पण देवालय परिक्रमेमध्ये आहे.
इथे एक मंडप आहे ज्याचे नाव त्यागराज सभा असे आहे. इथे श्री विनायकांचे नाव प्रमोद विनायक असे आहे (प्रमोद म्हणजे आत्यंतिक आनंद). असा समज आहे कि श्री प्रमोद विनायकांची पूजा जे करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना आत्यंतिक आनंदाची प्राप्ती होते. इथे त्यागराजांचे नाव आदि विडंगर असे आहे. मंदिराच्या उत्तरेला असलेल्या तीर्थाचे नाव इंद्र तीर्थ आहे. श्री ब्रह्मदेवांनी त्यांना मिळालेल्या शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी इथे भगवान शिवांची पूजा केली आणि तीर्थ निर्माण केले ज्याचे नाव ब्रह्म तीर्थ आहे.
पुराणांनुसार सर्पांचा राजा आदिशेष हे एका विहिरीमधून इथे भगवान शिवांची पूजा करण्यासाठी यायचे म्हणून इथल्या विहिरीचे नाव सर्पतीर्थ असे आहे. इथे श्री दक्षिणामूर्तींचे नाव श्री ज्ञान दक्षिणामूर्ती असे आहे. श्री भैरवांचे नाव श्री स्वर्णाकर्षण भैरव असे आहे. असा समज आहे कि श्री स्वर्णाकर्षण भैरव ह्यांची पूजा केल्याने नुकसानाची भरपाई होते. इथे एक श्री विनायकांचे देवालय आहे जिथे श्री विनायकांचे नाव कडुक्कई (हरडा विनायक) असे आहे.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे आपले गमावलेले ऐवज मिळविण्यासाठी श्री स्वर्णाकर्षण भैरव ह्यांची पूजा करतात.
२. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे भाविक जन श्री प्रमोद विनायकांची पूजा करतात.
३. पाप आणि शापापासून मुक्ती मिळविण्यासाठी इथे भाविक जन स्नान करून भगवान शिवांची पूजा करतात.
४. असा समज आहे कि श्री प्रमोद विनायकांची पूजा केल्याने नेत्ररोग बरे होतात.
पूजा:
१. प्रत्येक तामिळ महिन्याच्या पहिल्या दिवशी विशेष पूजा केल्या जातात. ह्या दिवशी श्री त्यागराज आणि श्री नटराज ह्यांच्यावर अभिषेक केला जातो तसेच गुरु पूजा पण केली जाते.
२. कार्थिगई ह्या तामिळ महिन्यामध्ये कार्थिगई दीपम ह्या उत्सवाच्या वेळेस पूजा केली जाते
३. कालाष्टमीच्या दिवशी श्री भैरवांची पूजा केली जाते.
४. पौर्णिमा आणि अमावास्येला विशेष पूजा केल्या जातात.
मंदिराचा पत्ता: अरुलमिगु कैलासनायकी समेध कण्णयारनाथर थिरु कोविल, थिरुक्करवासल, थिरुवरुर जिल्हा, तामिळ नाडू ६१०२०२
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment