हे मंदिर सप्त विडंग स्थळांपैकी तिसरं मंदिर आहे. येथील विडंगाचे नाव सुंदर विडंगर असे आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. श्रेष्ठ नायनमार श्री थिरुज्ञानसंबंधर, श्री अप्पर आणि श्री सुंदरर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. वर्तमान मंदिर साधारण २००० वर्षे जुनं आहे. हे मंदिर चोळा आणि पल्लव साम्राज्यातील राजांनी बांधलं आणि त्याचा वेळोवेळी जीर्णोद्धार केला.
मूलवर: श्री कायारोहणेश्वरर
उत्सवर: श्री चंद्रशेखरर
देवी: श्री निलायदाक्षी
पवित्र तीर्थ: पुंडरीकाक्ष तीर्थ
क्षेत्र वृक्ष: आंबा
पुराणिक नाव: नागईकारोणं
वर्तमान नाव: नागपट्टीनं
जिल्हा: नागपट्टीनं, तामिळनाडू
क्षेत्र पुराण:
१. श्री शनिदेव रोहिणी नक्षत्रामध्ये आल्यामुळे दुष्काळ पडेल हे जेव्हां दशरथ राजाच्या लक्षात आले तेव्हां त्यांनी श्री शनिदेवाशी युद्ध करायचे ठरवले. पण श्री सूर्यदेवांनी त्यांना ह्या युद्धापासून परावृत्त करून श्री शनिदेवांना पूजा करून प्रसन्न करण्याचा सल्ला दिला. दशरथ राजाने श्री सूर्यदेवांनी सांगितल्या प्रमाणे श्री शनिदेवांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले आणि त्यामुळे श्री शनिदेवांच्या प्रभावाची तीव्रता कमी झाली. म्हणून इथे सर्व नवग्रह पश्चिमाभिमुख आहेत.
२. इथे एक कोळी समाजातला अतिपथर नावाचा शिवभक्त होता. मासे पकडल्यावर त्यातील एक मासा तो परत समुद्राला म्हणजेच भगवान शिवांना अर्पण करायचा. एकदा त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवांनी अशी लीला घडवून आणली कि अथीपथरला एकच मासा मिळाला. पण त्याने ठरवल्याप्रमाणे तो मासा समुद्राला अर्पण केला. अजून एकदा परीक्षा घेण्यासाठी भगवान शिवांनी परत लीला घडवली आणि अतिपथरला एकच मासा पण तो सोन्याचा मिळाला. अतिपथरच्या एका कोळी मित्राने त्याला तो मासा स्वतःकडे ठेवण्याचा सल्ला दिला. पण अतिपथरने आपल्या प्रतिज्ञेनुसार तोही मासा समुद्राला अर्पण केला. तेव्हा भगवान शिव आणि श्री पार्वती देवी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला दर्शन देऊन मुक्ती प्रदान केली. अतिपथर नायनार म्हणून प्रसिद्धी पावले. त्यांचं ह्या मंदिरामध्ये स्वतंत्र देवालय आहे.
३. अळूगुणी सिद्धर:
जसे लहान मूल आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आईसमोर रडते तसेच अळूगुणी सिद्धर हे सिद्ध मुनी श्री पार्वती देवींच्या समोर मुक्ती मिळविण्यासाठी रडायचे. श्री पार्वती देवींनी भगवान शिवांच्या संमतीने ह्या सिद्धमुनींना मुक्ती प्रदान केली. ह्या ठिकाणी अळूगुणी सिद्धर ह्यांची जीव समाधी आहे. वैकासि ह्या तामिळ महिन्याच्या विशाखा नक्षत्र दिवशी तसेच पौर्णिमेला विशेष पूजा केली जाते ज्यामध्ये खीर (पायसम) नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.
४. पुंडरीकाक्ष ऋषींनी इथे मुक्तीप्राप्तीसाठी तपश्चर्या केली. भगवान शिवांनी त्यांना दर्शन देऊन त्यांना मिठी मारली. सहसा मुक्ती हि आत्म्याला मिळते. पण इथे भगवान शिवांनी मानवी शरीरामध्ये (काया) पुंडरीकाक्ष ऋषींना मिठी मारली (आरोहण) म्हणून इथे भगवान शिवांचे नाव कायारोहणर असे आहे.
५. एकदा नागांच्या राजाने भगवान शिवांची आराधना केली ज्यामुळे त्याला पुत्री प्राप्ती झाली. ह्या पुत्रीला तीन स्तन होते. भगवान शिवांनी त्याला आश्वासन दिलं कि जेव्हां सूर्य वंशातील राजा इथे भेट देईल तेव्हां त्याच्या पुत्रीचे तिसरे स्तन त्यावेळी ते निघून जाईल. जेव्हां शालीसुहन राजा इथे आला त्यावेळी त्या पुत्रीचे तिसरे स्तन निघून गेले. नाग राजाने आपली पुत्रीचा विवाह शालीसुहन राजाबरोबर केला. इथे नागराजाने भगवान शिवांची आराधना केली म्हणून इथे भगवान शिवांना नागईकारोणं असे नाव आहे.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
सप्त ऋषी, मार्कंडेय ऋषी, पुंडरीकाक्ष ऋषी
वैशिष्ट्ये आणि देवालयांबद्दल माहिती:
सुंदर विडंगर: ह्या मंदिरातलं विडंगर अतिशय सुंदर आहे आणि म्हणून त्याला सुंदर विडंगर म्हणतात. भगवान शिवांच्या गाभाऱ्याच्या उजव्याबाजूला श्री त्यागराज ह्यांचं देवालय आहे. सहसा बऱ्याचश्या शिव मंदिरांमध्ये श्री त्यागराजांच्या फक्त मुखाचंच दर्शन होतं. ह्या ठिकाणी वैकासि महिन्यातील विशाखा नक्षत्रावर आणि तसेच मारगळी महिन्याच्या थिरुवथिरा नक्षत्रावर भगवान शिवांना अशा प्रकारे अलंकार केले जातात कि ज्यामुळे श्री त्यागराजांच्या उजव्या हाताचे आणि उजव्या पाऊलांचे दर्शन घडते. उत्सवामध्ये श्री त्यागराजांच्या रथयात्रेमध्ये भाविक अशा प्रकारे नृत्य करतात कि जणू काही ते दृश्य समुद्रातील लाटांसारखं भासतं.
निलायदाक्षी देवी: असा समज आहे कि ही देवी आपल्या भक्तांना सागरासारखे किंवा सागराएवढे आशीर्वाद देते. हे दर्शविण्यासाठी तिचे नेत्र सागरासारखे निळ्या रंगाचे आहेत. ह्या मंदिरात तिचे स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये ध्वजस्तंभ पण आहे. ह्या ठिकाणी ह्या देवीला कुमारिकेच्या रूपात (लग्न न झालेली) चित्रित केले आहे. ह्या ठिकाणी आडीपुरम उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो. चायना क्ले ने बनविलेल्या रथामध्ये तिची रथयात्रा निघते. देवीचा गाभारा रथाच्या आकाराचा बांधला आहे. इथे देवी कुमारिकेच्या रूपात असल्याने भगवान शिवांनी श्री नंदिदेवांना संरक्षक म्हणून पाठवले. पण श्री नंदिदेव भगवान शिवांपासून दूर जायला तयार नव्हते. भगवान शिवांनी श्री नंदिदेवांना देवीबरोबर राहताना त्यांचंच म्हणजे भगवान शिवांचंच दर्शन घ्यायला सांगितलं. त्यामुळे इथे श्री नंदिदेव जरी देवीच्या समोर असले तरी त्यांचं मुख भगवान शिवांच्या दिशेने आहे. त्यांचा डावा डोळा भगवान शिवांकडे आहे तर उजवा डोळा श्री देवींकडे आहे. भाविक जन इथल्या श्री नंदिदेवांची पूजा नेत्ररोगांचं निरसन करण्यासाठी करतात.
श्री विनायकर: श्री विनायकर हे एका स्वतंत्र देवालयातून भक्तांवर कृपा करतात. त्यांच्या शरीराला एका सर्पाने विळखा घातला आहे तर दुसरा सर्प त्यांच्या डोक्यावर छत्रीसारखा उभा आहे. म्हणून त्यांना नागभरण विनायकर (नागभूषण विनायकर) असे नाव आहे. राहू आणि केतू ग्रहांच्या दोषापासून मुक्तीसाठी भक्त त्यांची आराधना करतात.
इथे श्री भैरवर देवांचं श्वानाच्या ऐवजी सिंह हे वाहन आहे. श्री भैरवर हे दक्षिणाभिमुखी असून त्यांचं मुखं खूप क्रूर आहे. त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या समोर दोन विनायकर उभे आहेत.
दक्षिण भारतात अशी प्रथा आहे कि जेव्हां मृत देहाची यात्रा मंदिरासमोरून जाते त्यावेळी मंदिराची प्रवेशद्वारं बंद केली जातात. पण इथे मात्र जेव्हां मृत देहाची यात्रा मंदिरासमोरून जाते तेव्हां भगवान शिवांच्या मंदिरातले हार आणि वस्त्र हे त्या मृतदेहावर पांघरले जातात. कोळी समाजातल्या एका श्रेष्ठ शिव भक्ताचा मान राखण्यासाठी हे केले जाते.
सहसा उत्सवाच्या वेळेस भगवान शिवांची रथयात्रा हि मंदिराभोवतीच्या चार रस्त्यांवरून नेली जाते. सलीसामहाराज जेव्हां गावांत भगवान शिवांची पूजा करून इथे आले त्यावेळी त्यांना भगवान शिवांचे वररूपातले दर्शन झाले. त्यांच्या ह्या दर्शनप्राप्तीच्या आदराप्रीत्यर्थ येथील रथयात्रा नागपट्टीनंच्या आजूबाजूच्या सात गावांमधून ते नेली जाते.
श्री मोहिनी देवींची रथयात्रा: सहसा भगवान शिवांच्या इतर मंदिरांमध्ये प्रदोष काळी भगवान शिवांची रथयात्रा त्यांच्या ऋषभ वाहनावरून काढली जाते. पण इथे ह्या रथयात्रेमध्ये भगवान विष्णूंना त्यांच्या श्री मोहिनी अवताररूपामध्ये बरोबर घेतले जाते. समुद्र मंथनानंतर जेव्हां अमृत बाहेर आलं तेव्हां तें अमृत प्राशन करण्याच्या आधी देवांनी भगवान शिवांची पूजा केली नाही. ह्या त्यांच्या चुकीला क्षमा करण्यासाठी म्हणून भगवान शिवांनी प्रदोष काळ चालू होण्याआधी तांडव नृत्य केले. त्यावेळी भगवान विष्णू श्री मोहिनी अवतारामध्ये प्रकट झाले. म्हणून इथे प्रदोषकाळी श्री मोहिनींचे दर्शन घेता येते. इतर वेळी श्री मोहिनींची मूर्ती भगवान शिवांच्या गाभाऱ्यामध्ये ठेवलेली असते.
इथे श्री काली देवी (अष्टभुजा अंबिका) ह्यांचे देवालय आहे. ह्या देवालयामध्ये अष्ट भैरव आणि श्री गजलक्ष्मी ह्यांच्या मूर्ती बघायला मिळतात. शिव लिंगाच्या मागे श्री सोमस्कंद ह्यांची मूर्ती आहे, तसेच श्री मुरुगन ह्यांची बारा हातांमध्ये शस्त्र असलेली मूर्ती आहे.
परिक्रमेमध्ये श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती आहे.
येथील क्षेत्र वृक्षाची म्हणजेच आंब्याचीं फळें गोड, कडू आणि आंबट अशा तीन चवींची आहेत. जेव्हां आपण ह्या वृक्षाकडे आग्नेय दिशेकडून पाहतो तेव्हा हा वृक्ष श्री नंदिदेवांसारखा भासतो.
येथील गाभाऱ्यातील मंडपाच्या छतावर बारा राशींच्या आकृत्यांची शिल्पे कोरली आहेत. ह्या मंडपात भगवान शिवांची पूजा केल्याने ग्रहदोषांचे निवारण होते असा समज आहे.
इथे असे एक शिल्प आहे ज्यामध्ये श्री गजलक्ष्मी ज्यांचे पाय खाली मोकळे सोडले आहेत आणि चार दंत असलेले दोन हत्ती त्यांची पूजा करत आहेत.
कोष्टाच्या बाहेरील भागात श्री दक्षिणामूर्तींची कोष्ठ मूर्ती आहे. ह्या मूर्तीमध्ये त्यांच्या पायाशी चार ऐवजी आठ शिष्य बसलेले आहेत.
इथे श्रेष्ठ नायनमार श्री सुंदरर ह्यांना भगवान शिवांची स्तुती गायल्याने मोत्यांचा हार, हिऱ्यांचा हार, कस्तुरी आणि हत्ती ह्यांची प्राप्ती झाली.
मंदिराबद्दल माहिती:
जरी हे शिव मंदिर असलं तरी ते श्री निलायदाक्षी अम्मन कोविल म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ मंदिर लाकोलिक समाजाच्या लोकांनी बांधलं आहे. ह्या समाजाने अजून एक मंदिर बांधलं ते आहे तामिळनाडूच्या कांचीपुरम मध्ये. हे एक शक्तीपीठ पण आहे. ह्या मंदिराला शिवराजधानी असं पण म्हणतात कारण भगवान शिव इथून राज्य करतात. समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हे मंदिर नागपट्टीनं ह्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे लिंग स्वयंभू आहे. सध्या असलेलं शिव लिंग हे मूळ लिंग नाही. मूळ लिंग बऱ्याच काळापूर्वी चोरीला गेलं आहे. सध्याचे लिंग गोमेद पासून बनलं आहे.
येथील राजगोपुर पांच स्तरांचे आहे. येथील परिक्रमेमध्ये बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदनवन आहे.
पूजा:
दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक पूजा केल्या जातात. रोज सकाळी ९ आणि संध्याकाळी ८ वाजता अभिषेक केला जातो.
मंदिरात साजरे होणारे सण:
आनी (जून-जुलै): ह्या महिन्यातील अयिलं (मराठीमध्ये आश्लेषा) नक्षत्र दिवशी अर्धजाम पूजेच्या वेळेस पुंडरीकाक्ष ऋषींच्या मुक्तीप्राप्तीच्या आदराप्रीत्यर्थ अर्धजाम पूजेच्या वेळेस पूजा केली जाते. हि पूजा दिवसाची शेवटची पूजा असते.
वैकासि (मे-जून): कल्याण उत्सव (विवाह उत्सव)
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम उत्सव (पूर्वा नक्षत्रावर उत्सव)
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि उत्सव
ऎपासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment