क्षेत्र पुराणे, ज्यांना स्थळ पुराणे असं पण म्हणतात, ही त्या क्षेत्राशी किंवा स्थळाशी निगडित पुराणे किंवा कथा. शंकराचार्यांच्या मते धर्मतत्वे समजावण्याच्या क्षमते मध्ये ही पुराणे मुख्य पुराणांएवढीच तुल्यबळ मानली जातात.
सप्त विडंग स्थळांशी निगडित पण पुराण आहे जे आम्ही आधीच्या लेखामध्ये समाविष्ट केलं होतं. पण तेच पुराण परत आता ह्या स्वतंत्र लेखाद्वारे प्रकाशित करत आहोत कारण त्याची महती खूप आहे.
एकदा भगवान विष्णूंना आपल्याला पुत्र असावा अशी इच्छा झाली. त्यांनी देवांचा वास्तुविशारद आणि शिल्पकार श्री विश्वकर्मा ह्यांना एक मूर्ती बनवण्यास विनंती केली ज्या मूर्तीमध्ये भगवान शिव, श्री पार्वती देवी आणि त्या दोघांमध्ये त्यांचा पुत्र मुरुगन बसले आहेत. ह्या मूर्तीला सोमस्कंद मूर्ती असं म्हणतात. सोमस्कंद मध्ये स म्हणजे भगवान शिव म्हणजेच सत्, उमा म्हणजे श्री पार्वती देवी म्हणजेच चित्त आणि स्कंद म्हणजे आनंद. म्हणजे सोमस्कंद मूर्ती ह्याचा अर्थ सत्-चित्-आनंद मूर्ती.
भगवान विष्णूंच्या पूजेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना पुत्रप्राप्तीचं वरदान दिलं. तो पुत्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून श्री मन्मद म्हणजेच श्री कामदेव होते.
कालांतराने भगवान विष्णूंनी सोमस्कंद मूर्ती श्री ब्रम्हदेवांना दिली आणि कालांतराने श्री ब्रम्हदेवांनी ती मूर्ती श्री इंद्रदेवांना दिली.
पुढे कधी काळी वल्लन (वालासुर) ह्या राक्षसाने इंद्रपुरीवर म्हणजेच श्री इंद्रदेवांच्या राज्यावर आक्रमण केलं. श्री इंद्रदेवांनी भगवान शिवांकडे मदत मागितली. भगवान शिवांनी त्यांना मुचुकुंद राजाची मदत घ्यायला सांगितली.
मुचुकुंद राजा हे आधीच्या जन्मामध्ये एक नरमाकड होते. एकदा ते माकड एका झाडावर बसून पाने जमिनीवर फेकत होते. पण त्या झाडाखाली भगवान शिव आणि श्री पार्वती देवी विश्रांती घेत होते. आपल्या विश्रांती मध्ये ते माकड व्यत्यय आणत आहे हे पाहून श्री पार्वती देवींनी भगवान शिवांना त्या माकडाला पळवून लावण्याची विनंती केली. पण त्या दिवशी शिवरात्र असल्याकारणाने आणि माकडाकडून भगवान शिवांवर झाडाची पाने अर्पण झाल्यामुळे भगवान शिव त्या माकडावर प्रसन्न झाले आणि त्या माकडाला त्यांनी वरदान मागण्यास सांगितले. त्या माकडाने पुढच्या जन्मी माकडाचे मुख असलेला राजा व्हावं अशी इच्छा दर्शवली. भगवान शिवांनी त्या माकडाला त्याची इच्छा पूर्ण होण्याचा आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाच्या प्रभावाने ते माकड पुढच्या जन्मी चोळा कुळामध्ये जन्माला आले पण त्यांचे मुख मात्र माकडाचे होते. तेच पुढे मुचुकुंद चक्रवर्ती म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची राजधानी करूवरै होती.
श्री इंद्रदेवांच्या विनंतीवरून मुचुकुंद राजाने श्री इंद्रदेवांना मदत केली आणि वालासुर राक्षसाचा पराभव केला. श्री इंद्रदेव मुचुकुंद राजावर प्रसन्न झाले आणि कृतज्ञतेच्या भावाने त्यांनी मुचुकुंद राजाला एक भेट देण्याचे ठरवले.
त्यांनी मुचुकुंद राजाला त्यांना हवी ती भेट मागण्याची विनंती केली. भगवान शिवांनी गुप्तपणे मुचुकुंद राजाला श्री इंद्रदेवांकडे असलेल्या सोमस्कंद मूर्तीची भेट मागण्यास सांगितले. श्री इंद्रदेवांना ती मूर्ती कोणाला देण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी एक युक्ती केली. त्यांनी त्या मूर्तीच्या अजून ६ हुबेहूब प्रतिकृती केल्या. आणि मुचुकुंद राजाला त्यातील मूळ मूर्ती ओळखण्यास सांगितले. मुचुकुंद राजाने भगवान शिवांना प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांना मूळ मूर्ती ओळखायला मदत केली. त्यामुळे श्री इंद्रदेवांना आता ती मूर्ती भेट देणे भाग पडले. त्यांनी त्या बरोबर उरलेल्या ६ मूर्तीपण मुचुकुंद राजाला भेट दिल्या.
मुचुकुंद राजाने ह्या सात मूर्तींची सात ठिकाणी स्थापना केली. ह्या सात ठिकाणांना एकत्रित पणे सप्त विडंग स्थळं असा संबोधलं जातं. विडंग म्हणजे भगवान शिवांचे त्यागराज रूप. ही सर्व विडंगे पाचूची (मरगद) साधारण हाताच्या पंज्याएवढी आहेत. आणि ती चांदीच्या डब्यामध्ये ठेवली जातात. सणांच्या दिवशी श्री त्यागराज मूर्तीची पालखी निघते. आणि ह्या मिरवणुकीमध्ये भक्तगण विशेष मुद्रा असलेली नृत्ये सादर करतात. प्रत्येक विडंगाशी काही विशिष्ट नृत्य मुद्रा निगडित आहेत.
येणाऱ्या सप्ताहांमध्ये आम्ही सप्त विडंग स्थळांमधल्या प्रत्येक मंदिराची ओळख करून देणार आहोत.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment