Sunday, October 20, 2024

सप्त विडंगम प्रस्तावना

विडंग ह्याचा अर्थ अशी वस्तू जी हाताने तयार केलेली नाही किंवा जी तयार करताना छिन्नी वापरलेली नाही. ह्या लेखाच्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ शिव लिंग जे हाताने तयार केलेले नाही. ह्या शिव लिंगांची पूर्ण रचना म्हणजेच त्याचा पाया आणि त्याचा लंबवर्तुळाकार भाग हे दोन्ही एकाच दगडामध्ये कुठलंही कोरीव काम न करता बनले आहेत. म्हणजेच ही स्वयंभू लिंगे आहेत. 


दक्षिण भारतामध्ये तंजावूर च्या आसपास अशी सात मंदिरे आहेत ज्या मंदिरांमधली लिंगे विडंग आहेत आणि म्हणून त्यांना ह्या सात मंदिरांना एकत्रित सप्त विडंग स्थळं असं संबोधलं जातं. ह्या सर्व मंदिरांमधली शिव लिंगे ही हिरव्या पाचूची किंवा हिऱ्याची बनली आहेत. ह्या मंदिरामध्ये भगवान शिवांना श्री त्यागराज असं संबोधलं जातं. ह्या मंदिरामधली विडंग ही सोमस्कंद मूर्ती किंवा त्यागराज मूर्ती आहेत.  


विडंग म्हणजे सोमस्कंद मूर्ती. स-उमा-स्कंद (सोमस्कंद) म्हणजेच भगवान शिव आणि श्री पार्वती देवींसमवेत स्कंद (कार्तिकेय). ह्या मूर्तीचं मूळ नाव श्री त्यागराज मूर्ती असे आहे. ही मूर्ती लिंग रुपातलीच आहे. ह्या लिंगाचा अर्धवर्तुळाकार भाग स्वयंभू आहे तर पाया (ज्याला तामिळ मध्ये अवूदयार म्हणतात) हाताने बनवला आहे. पण सप्त विडंग मधली सर्व लिंगे ही पूर्ण स्वयंभू आहेत म्हणजेच अर्धवर्तुळाकार भाग तसेच पाया हे दोन्ही एकाच दगडात छिन्नी न वापरता तयार झाले आहेत. ही सर्व लिंगे पाचूपासून बनवली असून ती विविध लांबी आणि रुंदीची आहेत. त्यातलं सर्वात मोठ्ठं लिंग थिरुनल्लर मध्ये आहे तर मध्यम आकाराचे लिंग थिरुवरुर मध्ये आहे. असा समज आहे की श्री इंद्रदेव दर संध्याकाळी थिरुवरुर येथे शिवलिंगाची पूजा करतात. म्हणून थिरुवरुर येथील लिंग हे खूप शुभ मानलं जातं. ह्या लिंगांवर दिवसातून दोन वेळा अभिषेक केला जातो. ही लिंगे खूप मूल्यवान असल्याकारणाने अभिषेक आणि पूजेनंतर ही लिंगे सुरक्षित जागी ठेवली जातात. सहसा शिवलिंगासमोर श्री नंदीदेव हे बसलेल्या मुद्रेमध्ये असतात. पण सप्त विडंग स्थळांमध्ये श्री नंदीदेव उभ्या मुद्रेमध्ये आहेत. 


सप्त विडंगांबद्दल पुराणांमधली माहिती:

पुराणांनुसार एकदा एक माकड झाडावर बसून झाडाची पाने काढून जमिनीवर फेकत होतं. त्या झाडाखाली भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवी विश्रांती घेत होते. पानांमुळे आपल्या विश्रांतीमध्ये व्यत्यय आल्यामुळे श्री पार्वती देवींनी भगवान शिवांना त्या माकडाला पळविण्याची विनंती केली. पण तो दिवस (रात्र) शिवरात्र असल्यामुळे भगवान शिव म्हणाले कि त्या माकडाकडून ती पाने त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांची त्या माकडाकडून पूजा झाली आहे आणि म्हणून ते त्या माकडावर प्रसन्न आहेत. ते त्या माकडासमोर प्रकट झाले आणि त्या माकडाला त्यांनी वरदान मागण्यास सांगितले. त्या माकडाला लौकिक गोष्टींची इच्छा नसल्याने त्याने भगवान शिवांकडे माकडाचे मुख असलेला राजा बनण्याची इच्छा दर्शवली. भगवान शिवांनी ती विनंती मान्य करून त्याला राजा होण्याचे वरदान दिले. कालांतराने ते माकड चोळा कुळात जन्माला येऊन पुढे मुचुकुंद चक्रवर्ती म्हणून प्रसिद्धी पावला.


भगवान विष्णूंनी आपल्याला पुत्र प्राप्त व्हावा ह्या इच्छेने भगवान शिवांच्या सोमस्कंद मूर्तीची पूजा केली. ह्या पूजेच्या प्रभावाने त्यांना मन्मद (कामदेव) हा पुत्र प्राप्त झाला. ह्या समयामध्ये त्यांनी विडंगमूर्तीची पण पूजा केली. कालांतराने श्री ब्रह्मदेवांना श्री सोमस्कंद आणि त्याबरोबर विडंग मूर्ती भगवान विष्णूंकडून प्राप्त झाल्या. आणि कालांतराने श्री ब्रह्मदेवांनी त्या श्री इंद्रदेवांना दिल्या. श्री इंद्रदेव ह्यांचं जेव्हा वालासुर ह्या राक्षसाबरोबर युद्ध झालं त्यावेळी मुचुकुंद राजाने वालासुराला पराभूत करण्यासाठी श्री इंद्रदेवांना मदत केली. मुचुकुंद राजाच्या मदतीने कृतज्ञ होऊन श्री इंद्रदेवांनी मुचुकुंद राजाला भेटवस्तू देण्याचे ठरवले. स्वतः भगवान शिवांचा कट्टर भक्त असल्याकारणाने मुचुकुंद राजाला श्री इंद्रदेवांजवळच्या श्री त्यागराज मूर्तीबद्दल माहिती होती. मुचुकुंद राजाने श्री इंद्रदेवांना ती मूर्ती भेट देण्याची विनंती केली. पण श्री इंद्रदेवांना ती मूर्ती अतिशय प्रिय असल्याकारणाने त्यांना ती मूर्ती द्यायची इच्छा नव्हती. त्यांनी त्या मूर्तीच्या अजून ६ हुबेहूब प्रतिकृती तयार केल्या. आणि मुचुकुंद राजाला त्यातून मूळ मूर्ती शोधायला सांगितले. मुचुकुंद राजाने भगवान शिवांची प्रार्थना केली आणि मूळ मूर्ती शोधून काढली. त्यामुळे श्री इंद्रदेवांनी मूळ मूर्तीबरोबर उरलेल्या सर्व ६ मूर्ती पण मुचुकुंद राजाला भेट दिल्या. मुचुकुंद राजाने त्या सात मुर्तींची थिरुवरुर च्या आसपासच्या भागात स्थापना करायचे ठरवले. स्वतः जरी कोंगू भागाचे रहिवासी असले तरी मुचुकुंद राजाला कावेरी नदीच्या आसपासच्या प्रदेशाच्या अध्यात्मिक महतीची जाणीव होती म्हणून त्यांनी कावेरी नदीच्या काठावरील थिरुवरुर ह्या भागात स्थापना करण्याचे ठरवले. थिरुवरुर येथे त्यांनी मूळ मूर्तीची स्थापना केली. थिरुवरुर येथे स्थापना केलेल्या पाचूच्या मूर्तीचे नाव त्यागराज किंवा मरगद (पाचू) नटराज असे आहे. तर उरलेल्या ठिकाणी स्थापना केलेल्या मूर्तींचे श्री सोमस्कंद असे नाव आहे. ह्या सर्व सात लिंगांना एकत्रित सप्त विडंग असे नाव प्रसिद्ध झाले. ह्या सात विडंगांची संक्षिप्त माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे. येणाऱ्या सप्ताहांमध्ये आम्ही ह्यातील प्रत्येक मंदिराची सविस्तर माहिती मराठी मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 


मंदिराचे नाव

विडंगाचे नाव

भगवान शिवांचे नाव

श्री पार्वती देवींचे नाव

स्थळ

नृत्य मुद्रा

नृत्य मुद्रेचा अर्थ

श्री त्यागराजर मंदिर

विधी-विडंगर

श्री वाल्मिकी-नादर

श्री कमलांबिकाई

थिरुवरुर

अजबनटनं 

जपाशिवाय नृत्य. भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर श्री त्यागराज स्थित आहेत असं चित्रीकरण आहे. 

श्री दर्भारण्येश्वरर

नगर-विडंगर

श्री दर्भारण्येश्वरर

श्री प्राणाम्बिकाई 

थिरुनल्लर

उन्मथनटनं 

एक उन्मत्त मनुष्य नृत्य करत आहे असे दृश्य

श्री कायारोहणस्वामि

सुंदर-विडंगर

श्री कायारोहणस्वामि

श्री निलयधाकाशी

नागपट्टीनं

विलाथी- नटनं 

सागराच्या लाटेसारखं नृत्य

श्री कन्नयरिया मुदयार

अभि-विडंगर

श्री सहस्रनेत्र-नादरस्वामी (कन्नयरिया नादर)

श्री कैलास-नायकी 

थिरुकरवसल 

कुक्कुड नटनं 

मोरासारखे नृत्य

श्री ब्रम्हपुरीश्वरर

अवनी- विडंगर

श्री ब्रम्हपुरीश्वरर

श्री ब्रम्हकुजल-अम्बीगाई 

थिरुकुवलै 

भृंग नटनं 

फुलाभोवती फिरणाऱ्या मधुमाशी सारखे नृत्य

श्री वैमुरनादर मंदिर

नल्ल-विडंगर

श्री वैमुर-नादर

श्री पालीनुं-नान-मोळी-अम्माई

थिरुवैमुर

कमल नटनं 

वाऱ्याच्या झुळुकीने हलणाऱ्या कमळासारखे नृत्य

श्री वेदारण्येश्वरर 

भुवनी-विडंगर

श्री वेदारण्येश्वर

श्री वेदनायकी

थिरुमरैक्कडू (वेदारण्यम) 

हंसपद-नटनं 

हंस चालण्यासारखे नृत्य



अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):


ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment