पंचारण्य स्थळांमधलं हे पहिलं मंदिर आहे. दिवसाच्या पहिल्या प्रहरामध्ये ह्या मंदिराचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर तामिळ नाडूमधल्या तंजावूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी ज्या मंदिरांमध्ये भगवान शिवांची स्तुती केली अशा मंदिरांमधलं पण हे एक मंदिर आहे.
मुलवर: श्री मुल्लईवननाथर
देवी (अम्मन): श्री गर्भरक्षाम्बिका, श्री करुकात्थरनायकी
स्थळवृक्ष: मालती वेल (तामिळ मध्ये मुल्लई)
इतर महत्वपूर्ण देवता: श्री कर्पग विनायक
दर्शनाची वेळ: उषःकाल
क्षेत्र पुराण:
निरुथव नावाचे मुनी त्यांची पत्नी वेदिकी समवेत ह्या ठिकाणी आपल्या आश्रमात वास्तव्य करून होते. वेदिकी जेव्हा गर्भवती होती तेव्हा उर्धपाद नावाचे ऋषी त्यांच्या आश्रमात आले. वेदिकी गर्भारपणाच्या अंतिम टप्प्यामध्ये असल्याकारणाने तिचे लक्ष विचलित होते आणि त्यामुळे तिचे उर्धपाद ऋषी आपल्या आश्रमात आले आहेत ह्याकडे लक्ष गेले नाही. ह्यामुळे ऋषींना क्रोध आला आणि त्यांनी तिचा गर्भ मृत जन्माला येईल अशा शाप दिला. मुनी निरुथव आणि त्यांच्या पत्नीने श्री मुल्लईनाथर आणि श्री पार्वती देवींकडे गर्भरक्षणाची याचना केली. श्री पार्वतीदेवींनी त्या गर्भाचं एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून त्याचं रक्षण केलं. त्याच बरोबर श्री पार्वती देवींनी कामधेनू गाईच्या मदतीने एका दुधाच्या तलावाची निर्मिती केली जेणेकरून त्या मुलाचे संगोपन होईल. वेदिकीने श्री पार्वती देवींना विनंती केली कि इथे राहून जे भक्त येतील त्यांना संतती प्राप्तीचा आशीर्वाद मिळावा आणि तसेच गर्भवतींच्या गर्भाचे संरक्षण व्हावे. म्हणूनच इथे श्री पार्वती देवींचे श्री गर्भरक्षाम्बिका असे नाव प्रसिद्ध झाले.
श्री विनायकांची मूर्ती आणि भगवान शिवांचे लिंग हे दोन्ही स्वयंभू आहे. पूर्वी ह्या स्थळामध्ये भरपूर मालती (चमेली) वेली होत्या. अजूनही येथील शिवलिंगावर वेलींच्या खुणा बघायला मिळतात. येथील श्री नंदिदेवांची मूर्ती पण स्वयंभू आहे.
मंदिरातल्या इतर देवता:
१. सोमस्कंद
२. नवग्रह - ह्या नवग्रह संनिधीचे वैशिष्ट्य असे आहे कि येथील सर्व ग्रहांची मुखे सुर्याभिमुख आहेत.
पूजा आणि प्रार्थना:
१. ह्या ठिकाणी पुनुगू नावाची औषधी वनस्पती असल्याकारणाने भाविक लोकं त्वचारोग बरे होण्यासाठी प्रार्थना करतात.
२. कार्तिक महिन्याच्या रविवारी इथे प्रदोष पूजा केली जाते. तसेच शिवलिंगावर १००८ शंखांचा विशेष अभिषेक केला जातो.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment