पंचारण्य स्थळांमधील हे चौथं मंदिर आहे. २००० वर्षे जुनं असलेलं हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळे म्हणजेच ६३ नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ शिव मंदिरांपैकी पण एक आहे. विशेषतः हे मंदिर नवग्रह स्थळांपैकी गुरुग्रहाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. तामिळ नाडूमध्यल्या तंजावूर जिल्ह्यातील आलंगुडी ह्या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. येथील शिवलिंग स्वयंभू आहे.
मुलवर: श्री आपत्सहाय्येश्वरर्, श्री काशी अरण्येश्वरर्
देवी: श्री एलवरकुळली
स्थळ वृक्ष: रेशीम कापूस
विशेष देवता: श्री दक्षिणामूर्ती
दर्शनाची वेळ: संध्याकाळ
क्षेत्र पुराण:
देव आणि असुरांनी केलेल्या समुद्रमंथनामध्ये वासुकी नागाने जेव्हा विष बाहेर टाकायला चालू केलं तेव्हा सर्व जण चिंतीत झाले कारण ह्या विषाच्या नुसत्या स्पर्शाने पण सर्व विश्वाचा नाश होऊ शकतो. तेव्हां सर्व विश्वाचं ह्या विषापासून रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी ते विष (आलन्) प्यायलं. असं म्हणतात कि ती घटना इथे घडली. विश्वाला संकटापासून (आपत् म्हणजे संकट) वाचवलं म्हणून इथे भगवान शिवांचे श्री आपत्सहाय्येश्वर असं नाव प्रसिद्ध झालं. आणि इथे भगवान शिवांनी विष म्हणजेच आलन् प्यायलं म्हणून ह्या स्थळाला आलंगुडी असं नाव प्रसिद्ध झालं.
अजून एका आख्यायिकेनुसार नायनमारांपैकी श्री सुंदरर ह्या नायनमारांना भगवान शिवांनी बुडणाऱ्या नावेमधून वाचवलं. असा समज आहे कि श्री विनायकांनी ह्या नावेला उलटण्यापासून वाचवलं.
मंदिराचं वैशिष्ठ्य:
ह्या मंदिरामध्ये भगवान शिव हे विश्वगुरू श्री दक्षिणामूर्तींच्या रूपामध्ये चित्रित केले आहेत. इथे श्री दक्षिणामूर्तींनी त्यांच्या चार शिष्यांना म्हणजेच सनकादि मुनींना वेदांचं स्पष्टीकरण दिलं.
भाविक गण जे सर्व पंचारण्य स्थळांचं एकाच दिवशी दर्शन घ्यायचं ठरवतात ते ह्या मंदिराचं दर्शन संध्याकाळी घेतात.
इथे गुरूंची उपासना वेदांमध्ये दर्शविलेल्या क्रमाप्रमाणे केली जाते म्हणजेच प्रथम माता (श्री पार्वती देवी), मग पिता (भगवान शिव) आणि मग गुरु (श्री दक्षिणामूर्ती).
मंदिराची रचना ह्या तत्वांची आपल्याला आठवण करून देते.
हे क्षेत्र तीन नद्यांनी वेढलेलं आहे - कावेरी, कोल्लिदम आणि वेन्नरू. ह्या मंदिराच्या आजूबाजूला १५ तीर्थे आहेत. ह्यापैकी अमृत पुष्करिणी तीर्थ खूप जवळ आहे. मंदिराच्या समोर चक्र तीर्थ आहे. असा समज आहे की भगवान विष्णूंनी हे तीर्थ निर्माण केलं.
मंदिरातील इतर देवता:
श्री विनायक (ज्यांनी एका ऋषींची नाव बुडण्यापासून वाचवली), श्री मुरुगन, श्री लक्ष्मी देवी. येथील सप्त लिंगे अशी आहेत - श्री सूर्येश, श्री सोमेश्वर, श्री गुरुश्वरर, श्री सोमनादर, श्री साक्षीनाथर, श्री विषनादर, श्री ब्रह्मेश्वरर
ह्याशिवाय श्री काशीनाथ, श्री विशालाक्षी देवी, अगस्त्य ऋषी आणि श्री नंदि ह्यांची पण देवालये आहेत.
मंदिरात साजरे होणारे सण:
थै (जानेवारी-फेब्रुवारी): विशेष पूजा
मासी (फेब्रुवारी-मार्च): प्रत्येक गुरुवारी विशेष पूजा केली जाते
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरं - उत्तरा नक्षत्रावर श्रीदक्षिणामूर्तींची रथयात्रा साजरी होते
चित्राई (एप्रिल-मे): विशेष पूजा
गुरु गोचराच्या वेळेस (जेव्हा गुरु ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो) इथे विशेष पूजा केल्या जातात.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.