मागच्या
अंकात आपण
श्री शिव मंदिरातल्या इतर मुर्त्या ह्या सदरातील भाग ३ वाचला. त्यामध्ये आपण भगवान शिवांच्या श्री सोमस्कंदर आणि श्री भैरवर ह्या रूपांबद्दल माहिती
वाचली. आता ह्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री वीरभद्रर आणि श्री चंडिकेश्वरर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया.
श्री वीरभद्रर:
श्री वीरभद्रर हे भगवान शिवांच्या गणांपैकी एक आहेत. भूतगण आणि शिवगण हे सहसा दफन आणि स्मशान भूमीमध्ये वास करतात असा समज आहे. भगवान शिवांचे ते परिचर आहेत आणि ते कैलास पर्वतावर पण त्यांची सेवा करतात.
जेव्हा राजा दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञामध्ये दक्षपुत्री श्री सती म्हणजेच भगवान शिवांची पत्नी ह्यांनी आपल्या पतीचा आपल्या पित्याने केलेला अपमान सहन न होऊन यज्ञकुंडामध्ये आत्मसमर्पण केलं तेव्हा भगवान शिवांना अति क्रोध आला आणि त्यांनी क्रोधाने आपल्या जटांमधील एक केस जमिनीवर आपटला तेव्हा त्यातून श्री वीरभद्रर निर्माण झाले. भगवान शिवांनी त्यांना सेनापतीपद प्रदान केलं आणि दक्ष यज्ञ उध्वस्त करण्याचा आदेश दिला. त्यांच्या बरोबर रुद्रकाली देवी पण निर्माण झाल्या आणि त्यांनी भद्रकालीचं रूप घेऊन श्री वीरभद्ररांना दक्ष यज्ञ उध्वस्त करण्यास मदत केली. म्हणूनच श्री वीरभद्ररांना भगवान शिवांच्या क्रोधाचं मनुष्य रूप असं समजलं जातं. श्री वीरभद्ररांना वीरभद्रर स्वामि असं पण संबोधलं जातं कारण ते शिवगणांचे नायक आहेत.
असा समज आहे की दक्ष यज्ञ घटना उत्तर केरळ मधील कोट्टियूर ह्या स्थानात घडली. हे स्थान अतिशय निसर्गरम्य आहे. इथे दक्ष यज्ञामध्ये श्री सती देवींनी केलेल्याआत्म समर्पणास्मृत्यर्थ २७ दिवसांची मोठी पूजा आयोजित केली जाते. ह्या पूजेची रूपरेखा ही श्री आदि शंकराचार्यांनी आखून दिली आहे असा समज आहे.
तामिळनाडूमधील व कर्नाटकामधील पंच आचार्य आणि लिंगायत व वीरशैव ह्या समाजातील लोकं श्री वीरभद्ररांची आराधना करतात. श्री वीरभद्ररांचं मुख्य स्वतंत्र मंदिर उत्तर काशीमधल्या हृषीकेश मध्ये आहे. काही नामांकित स्थळे जिथे श्री वीरभद्रांची मूर्ती बघावयास मिळते ती अशी - १) महाराष्ट्रामध्ये जेजुरी २) तामिळनाडू मधील पुडुकोट्टाई जिल्ह्यातील वेत्तनविधूथी ३) तामिळनाडूमधील वेल्लोर जिल्ह्यामध्ये मित्तुर गावातील विलंगुप्पम ४) तामिळनाडूमधील चेंगलपेठ जिल्ह्यातील हनुमंथपुरम येथील श्री अघोर वीरभद्रर स्वामी मंदिर ५) तामिळनाडू मधील थिरुवेंगाडू येथील श्री श्वेथारण्येश्वरर मंदिर (नवग्रह स्थळांपैकी हे श्री बुध ग्रहाचे स्थान आहे). ६) तामिळनाडूमधील पेरंबलूर जिल्ह्यातील पसुमबलूर
सिलोन आणि मलेशिया देशात पण श्री वीरभद्ररांची मंदिरे आहेत.
श्री चंडिकेश्वरर:
श्रेष्ठ शिव भक्त मानल्या जाणाऱ्या ६३ नायनमारां मधले पहिले नायनमार म्हणजेच श्री चंडिकेश्वरर. श्री चंडिकेश्वरर हे बालपणापासूनच शिव भक्त होते. त्यांचं बालपणाचं नाव विचारशर्मन असं होतं. त्यांनी एकदा बघितलं कि एक गोप गाईंना चरायला नेताना गाईंना मारत होता. विचारशर्मनला हे बघवलं नाही. त्यांनी त्या गोपाला दरडावून समजावलं की गाय ही खूप पवित्र प्राणी आहे जी यज्ञासाठी लागणाऱ्या वस्तू देते. तिला मारणं म्हणजे महापाप आहे. त्यांनी गोपांकडून गायी हाकण्याचं काम स्वतः घेतलं. त्यांनी हाकण्याचं काम घेतल्यापासून गायी विचारशर्मन वर खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी नेहमीपेक्षा अधिक दूध द्यायला चालू केलं. विचारशर्मन रोज एक मातीचं शिव लिंग तयार करायचे आणि त्यावर दुधाचा अभिषेक करायचे. गायी विचारशर्मन ह्यांच्या शिवाभिषेकासाठी पण दूध द्यायच्या आणि त्याशिवाय त्यांच्या मालकांसाठी पण त्यांच्या कामासाठी पुरून उरेल एवढं दूध द्यायच्या. एकदा एका गावकऱ्याने विचारशर्मन दूध मातीवर ओतत आहेत हे पाहून गावात तक्रार केली कि विचारशर्मन हे दुधाचा अपव्यय करत आहेत. हे जेव्हा विचारशर्मन ह्यांच्या पित्यांना कळलं तेव्हा खरी गोष्ट काय आहे हे पाहण्यासाठी ते विचारशर्मन चा पाठलाग करत आले. जेव्हा त्यांनी पाहिलं कि विचारशर्मन मातीच्या लिंगावर दूध ओतत आहेत त्यांनी रागाने त्या लिंगाला लाथ मारली. भक्ती मध्ये तल्लीन असलेल्या विचारशर्मनला समोर फक्त शिव लिंग दिसत होतं आणि शिव लिंगाच्या अभिषेकामध्ये कोणीतरी व्यत्यय आणला आहे एवढंच त्यांना जाणवलं आणि त्यांनी क्रोधामध्ये आपल्या बाजूला असलेली एक काठी भिरकावली. ती काठी त्यांच्या पित्यांच्या पायाला एका कोयत्याच्या स्वरूपात लागली आणि त्यामुळे त्यांचे पाय कापले गेले. हे ऐकून त्यांची माता त्वरित तेथे आली आणि आपल्या पुत्राचं क्रोधीत रूप बघून घाबरली आणि तिने तिच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना केली. भगवान शिव श्री पार्वती देवींसमवेत तेथे प्रकट झाले आणि विचारशर्मनच्या भक्तीची तल्लीनता पाहून त्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला कवेत घेतलं. विचारशर्मन ह्यांच्या पित्याचे पाय भगवान शिवांनी पूर्ववत केले. भगवान शिवांनी विचारशर्मन ह्यांना शिव मंदिराच्या खजिनदाराची पूर्ण जबाबदारी कायमस्वरूपी दिली आणि त्याच बरोबर त्यांना ईश्वरपद पण प्रदान केलं. आणि त्यांचं चंडिकेश्वर हे नाव प्रसिद्ध झालं. चंडिकेश्वर हे फक्त मंदिराच्या खजिन्याचंच नव्हे तर भगवान शिवांचं पण पालन करतात असा समज आहे. दक्षिण भारतातील सर्व शिव मंदिरांमध्ये अशी प्रथा आहे कि, प्रत्येक भक्त मंदिराचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर निघण्याच्या आधी श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या मूर्तीसमोर आपले हात झटकून त्यांना हे दर्शवून देतात कि मंदिरातून त्यांनी प्रसादाशिवाय इतर कुठलीही गोष्ट घेतलेली नाही.
पुढच्या अंकात आपण भगवान शिवांच्या श्री दक्षिणामूर्ती आणि श्री लिंगोद्भवर ह्या रूपांबद्दल माहिती करून घेऊया.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment