मागच्या अंकात आपण शैव संप्रदायाबद्दल माहिती वाचली. ह्या संप्रदायाच्या अनुयायांनी शिव भक्तीचा प्रसार करण्यासाठी ठिकठिकाणी शिव मंदिरे बांधली. आता ह्या अंकात आपण ह्या मंदिरांचं दर्शन का घ्यावं ह्याची माहिती वाचू या.
दक्षिण भारतातील मंदिरांना भेट देणे हा आपल्या सगळ्यांचाच कुतूहलाचा विषय असतो. इथली मंदिरे भव्य असतात, त्यांमध्ये आकर्षक कोरीव काम केलेले असते आणि ह्या मंदिरांचा इतिहास पण रंजक आहे.
ह्या मंदिरांना भेट देण्याच्या आधी त्या मंदिरांमध्ये सहसा असणाऱ्या मुर्त्या आणि त्या मंदिरांतील विभागांबद्दल आपल्याला माहिती असल्यास आपली त्या मंदिरांची भेट अधिक चित्तरंजक, संस्मरणीय आणि म्हणूनच अधिक फलदायक होऊ शकते. ह्या हेतूने आम्ही इथे हि माहिती काही भागांत विभागून देणार आहोत.
ह्या पहिल्या भागात ह्या मंदिरांचं दर्शन का घ्यावं ह्याची काही महत्वपूर्ण कारणे आहेत त्यांचा आपण विचार करूया. पुढील भागांमध्ये मंदिरातल्या साधारणत: असलेल्या मुर्त्या आणि विभागांची माहिती, मंदिरात गेल्यावर दर्शन कसं घ्यावं, तामिळ महिने आणि मंदिरात साजरे होणारे मुख्य सण ह्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वरती म्हणल्या प्रमाणे ह्या पुरातन मंदिरांची भव्यता आणि त्यातील आकर्षित करणारी कोरीव कामे हे ह्या मंदिरांना भेट देण्याचं एक कारण झालं. त्या कारणासाठी अवश्य ह्या मंदिरांचं दर्शन घ्यावंच. पण त्याही पलीकडे जाऊन ही मंदिरे, आणि त्यांच्या जोडीला त्यांची पुराणे, ज्यांना स्थळ पुराणे म्हणतात, हे एकत्र वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर भक्तीमार्गाला पुष्टी देण्याचं काम करतात हे आपण ध्यानात ठेवलं तर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजेच फक्त पर्यटन नव्हे तर आपली आणि आपल्या कुटुंबातील आप्तेष्टांची आध्यात्मिक प्रगती कशी होईल ह्या दृष्टिकोनातून पण ह्या मंदिरांचं दर्शन घेऊ शकतो.
आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात महत्वाचं काय तर धर्मपालन. धर्म हा शब्द संस्कृत भाषेतील धृ ह्या धातूपासून आला आहे. ज्याचा अर्थ धरून ठेवणे किंवा उचलून धरणे असा होतो. म्हणजे ऋषी, मुनी, आपले पूर्वज ह्यांनी आध्यात्मिक प्रगती करून घेऊन मनुष्य जन्माचं परम ध्येय साधण्यासाठी जी आपल्याला शिकवण दिली त्या शिकवणीला धरून ठेवून त्याचं अनुसरण करणे आणि त्या शिकवणीला उचलून धरणे जेणेकरून आपल्या आप्तेष्टांना पण त्याचा लाभ होईल म्हणजेच धर्म.
थोर ऋषीमुनींच्या मते प्रत्येक युगामध्ये मनुष्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमता भिन्न असते. सत्ययुगात ही क्षमता अधिक होती, त्रेतायुगात, द्वापारयुगात ती घटत गेली आणि कलियुगात हि क्षमता कमीत कमी असेल असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. आणि म्हणूनच धर्म, म्हणजेच मानवी जीवनातील मुख्य ध्येय साधण्यासाठी करावयाची कर्मे, ही पण ह्या क्षमतेप्रमाणे भिन्न आहेत. युग धर्म हे शीर्षक असलेल्या इंग्लिश भाषेतल्या लेखामध्ये आम्ही प्रत्येक युगातल्या धर्माबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार कलियुगामध्ये भक्तिमार्ग हा मुख्य धर्म मानला जातो. आपण सध्या कलियुगात आहोत. त्यामुळे साहजिकच आपण भक्तिमार्गाचं अनुसरण केलं तर आपल्याकडून धर्म पाळला जाईल आणि धर्मामध्ये सांगितलेलं आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला सहज साध्य करता येईल. किंबहुना असं म्हणायला हरकत नाही की त्या परमदयाळू परमेश्वराने ही घटणारी क्षमता जाणून आपल्यासाठी आपल्या क्षमतेनुसार धर्मपालन करण्याचा सुकर आणि सुलभ मार्ग उपलब्ध करून ठेवला आहे.
थोर ऋषीमुनींच्यामते तीर्थयात्रा हा भक्तिमार्ग अनुसरण्यातला किंवा भक्तिमार्गामध्ये शिरण्याचा एक श्रेष्ठ मार्ग आहे. सर्व थोर ऋषी, संत, आचार्य एवढंच काय तर अगदी देव आणि देवांच्या अवतारांनी पण तीर्थयात्रा केल्या आहेत. म्हणजेच विविध पवित्र स्थळांना, ज्यांना तीर्थक्षेत्र म्हणतात, त्यांना भेट देऊन तेथे आराधना केली आहे. रामायण, महाभारत, पुराणे, संतकथा ह्या सर्वांमध्ये आपल्याला तीर्थयात्रांचा आणि मंदिरांचा उल्लेख आढळतो.
ह्या मंदिरांशी निगडित स्थळ पुराणे ही ह्या मंदिरांच्या दर्शनामध्ये फार महत्वाची भूमिका वठवतात. स्थळ पुराणे म्हणजे त्या मंदिराच्या स्थळामध्ये घडलेल्या विशेष घटनांची नोंद असलेले दस्तऐवज. थोर संत, भक्त ज्यांना त्या स्थळी काही विशिष्ट आध्यात्मिक अनुभव आले किंवा त्यांनी काही श्रेष्ठ भक्तांचे तसे अनुभव प्रत्यक्षात पाहिले किंवा त्यांच्याही पूर्वजांनी त्यांना सांगीतलेले अनुभव हे त्यांनी आपल्या पुढे येणाऱ्या पिढ्यांच्या आध्यात्मिक प्रगतीबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेमधून लिहून ठेवले. त्यांनाच स्थळ पुराणे म्हणतात. ह्या पुराणांमधे श्रेष्ठ भक्तांच्या आणि देवांच्या त्या त्या स्थळाशी/मंदिरांशी निगडित कथा आहेत. ह्या कथा धर्मपालनाची आणि त्यामुळे घडलेल्या आत्मोन्नतीची उदाहरणे आपल्यासमोर ठेवतात. उदाहरणार्थ “अमुक मंदिरामध्ये इंद्र देवाने तपश्चर्या करून त्यांना प्राप्त झालेल्या शापापासून मुक्ती करून घेतली” किंवा “अमुक ठिकाणी एका भक्ताची त्याची भक्ती बघून भगवान शिवांनी त्या भक्ताला दर्शन दिलं” अशा कथा वाचून आपल्यामध्ये निश्चितच त्या स्थळाला भेट देण्याची इच्छा प्रबळ होते आणि त्या मंदिरांच्या दर्शनातून, त्यांच्याशी निगडित असलेल्या कथा वाचून धर्मबोध पण होतो. परमाचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती ह्यांच्या उपन्यासांमध्येपण ते ह्या मंदिरांच्या स्थळ पुराणांना धर्माचं महत्व समजविण्याच्या क्षमतेमध्ये महर्षी व्यासांनी लिहिलेल्या १८ महापुराणांबरोबर समतुल्य मानतात. ह्या स्थळ पुराणांतल्या कथा वाचून आपण जर ह्या स्थळांना भेट दिली तर आपली त्या स्थळाची भेट अधिक स्मरणीय होऊन त्या स्मरणांवर आपण चिंतन मनन केलं तर निश्चितच आपली चित्तशुद्धता होऊन आपल्यातील भक्तीभावाची वृद्धी होते आणि हेच ह्या मंदिरांचं दर्शन घेण्याचं मुख्य फळ आहे.
आम्ही जेव्हां प्रत्येक मंदिराची माहिती देऊ त्यामध्ये तेथील स्थळ पुराणांची माहिती देण्याचा पण प्रयत्न करणार आहोत. किंबहुना आम्ही आधीच प्रकाशित केलेल्या इंग्लिश भाषेतील लेखांमध्ये आपण ती माहिती वाचू शकता.
पुढील अंकांमध्ये आम्ही शिव मंदिरातील मुख्य विभाग, शिव मंदिरांमध्ये दर्शन कसं घ्यायचं, मंदिरातल्या मुख्य मुर्त्या आणि इतर मुर्त्या ह्यांची माहिती, तसेच शिव मंदिरांचे प्रसिद्ध समूह ह्यांची माहिती देणार आहोत. ही माहिती वाचून आपण मंदिरांचं दर्शन घ्याल तर आपल्याला ह्या मंदिरांचं अधिक आत्मीयतेने दर्शन घेता येईल असा आमचा विश्वास आहे आणि प्रार्थना पण आहे.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy): ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment