Tuesday, October 4, 2022

विजयादशमी सीमोल्लंघनाचे महत्व

अश्विन शुक्ल दशमी जाण । सायंकाळी श्रवण नक्षत्र । विजयनामाचा काल पूर्ण । तारकाउदयीं जाणावा ।। तो विजयकाल सकळिक । सर्वकार्यार्थसाधक । प्रयाणमुहूर्ती विशेषक । सर्व कामना सिद्ध होती ।। विजयकालाची म्हणोनि । विजयादशमी म्हणती जनीं । तो विजयमुहूर्त पाहूनी । निघता झाला काकुत्स्थ ।। सर्व देवांसहित जाण । करोनियां शमीपूजन । केलें शमीसीं प्रिय भाषण । मग पुष्पकीं बैसला ।। ईशान्येसी केलें गमन । आला अयोध्येलागून । सर्व सुहृदादिजनां भेटोन । राज्य करिता जाहला ।। सर्व देवऋषींसी आनंद । जाहला तुटले अवघे बंध । सीमोल्लंघन केलें प्रसिद्ध । स्वेच्छाचारें दशमीसी ।। या कारणास्तव जाण । विजयादशमीसी पूजन । करावें ईशान्येसी सीमोल्लंघन । शमीपूजने जयप्राप्ती ।। 

-  देवी माहात्म्य अध्याय १२

 

विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला सायंकाळी ईशान्य दिशेला सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. ही प्रथा प्रभू श्रीरामांनी प्रसिद्ध केली. सीमोल्लंघन म्हणजेच सीमा ओलांडून पुढे जाणे. आत्तापर्यंत आपल्यावर झालेल्या वेगवेगळ्या बऱ्यावाईट संस्कारांमुळे, बऱ्यावाईट सवयीं मुळे आपल्यामध्ये एक प्रकारचं जडत्व येतं. आपण आपल्यालाच काही सीमांमध्ये जखडून ठेवतो. मला हे कसं जमेल? ते कसं जमेल? काही वेळा प्रयत्न करून यश मिळत नाही म्हणून आपण काही गोष्टी सोडून देतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भोवती काही सीमा आखतात आणि त्यामुळे आपली अपेक्षित प्रगती होत नाही. ह्या सीमांना उल्लंघून जाऊ शकलो तरच आपण अपेक्षित यश मिळवून समाधानी होऊ शकतो. सीमोल्लंघन करून ईशान्य दिशेला का जायचं? ईशान्य दिशेला भगवान ईशानांचा वास असतो जे ज्ञान आणि संपत्तींचे संरक्षक आहेत. भगवान ईशानांकडे आपल्याला कोण घेऊन जाईल? देवी भगवती. देवी भगवती आपल्यावर प्रसन्न झाली तर ती आपल्याला ज्ञान आणि संपत्ती प्रदान तर करेलच पण हे टिकण्यासाठी ती आपल्याला भगवान ईशानांची पण कृपा प्राप्त व्हावयाला मदत करेल जेणेकरून आपण मिळविलेल्या ज्ञान आणि संपत्तीचा कधी विनाश होणार नाही. देवी भगवतीची प्रीती कशी मिळवावी हे स्वतः देवी भगवती देवीनेच श्री देवी माहात्म्यामध्ये सांगितले आहे. 

 

संवत्सरें करुनि पूजन । माझी साधावी प्रीती जाण । माझें चरित्र श्रवण पठण । प्रेमभावें करावे ।। पातकांचा करी नाश । आरोग्यता पाठकास । भूतांपासूनि रक्षणास । हें माहात्म्य करीतसे ।। - श्री देवी माहात्म्य अध्याय १२

 

निदान वर्षाकाठी नवरात्री काळामध्ये निरालस्य होऊन देवी भगवतीचे पूजन करावे, तिच्या चरित्राचे श्रवण-पठण करावें जेणेकरून आपण तिची प्रीती प्राप्त करू शकू आणि सर्व यश प्राप्ती करून अंती समाधान पावू शकू. 


No comments:

Post a Comment