हे मंगळ (अंगारक) ग्रहाचं मंदिर आहे. नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे.
मंदिराचे नाव: वैथीश्वरन कोविल (वैद्य + ईश्वरन + कोविल)
स्थळ देवता : श्री वैद्यनाथ
अम्मन (देवी): थैयल नायकी
गणपती: कर्पग विनायक
ग्रहाचे नाव: अंगारकन (तामिळ मध्ये छेवै)
क्षेत्र वृक्ष: नीम
पत्ता: वैथीश्वरन कोविल, नागपट्टीनं जिल्हा, तामिळ नाडू ६०९११७, भारत
मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:
सिरकाळी - मैलादुथुराई मार्गावर हे मंदिर आहे.
येथील शिवलिंग स्वयंभू आहे. येथील पांच गोपुरे (टॉवर) सरळ रेषे मध्ये (संरेखित) आहेत. इथे शिवलिंगासमोर दोन दीपस्तंभ आहेत. एक सोन्याचा आहे तर दुसरा चांदीचा आहे. सहसा नवग्रह देवस्थान हे मुख्य देवस्थानाच्या समोर असते, पण इथे मात्र ते मुख्य देवस्थानाच्या (गाभाऱ्याच्या) पाठीमागे आहे. मुख्य देवस्थानाच्या पूर्वेला भैरवाचे देवस्थान आहे, पश्चिमेला वीरभद्राचे देवस्थान आहे, दक्षिण दिशेला विनायकाचे तर उत्तरेला काली देवीचे देवस्थान आहे. असा समज आहे की ही चार दिशांना असलेली देवस्थाने रक्षक म्हणून आहेत. इथे एक पाचूचे शिवलिंग आहे.
मंदिराच्या आख्यायिका:
१) सिद्ध अमृत तीर्थ: असा उल्लेख आहे की सिद्धांनी इथे अमृताचा अभिषेक करून बरीच वरदानं मिळविली. अभिषेक करताना थोडे अमृत तीर्थामध्ये सांडलं आणि म्हणून ह्या तीर्थाला सिद्ध अमृत तीर्थ असे नाव मिळाले. ऋषी सदानंद ह्यांनी दिलेल्या शापामुळे इथे साप किंवा बेडकं आढळत नाहीत.
२) असा समज आहे की वारुळाची वाळू, अभिषेक तीर्थ, नीम पाने, अभिषेक चंदन आणि अभिषेक भस्म मिसळून जो लेप तयार होतो त्यात बरेच रोग निवारण करण्याचे सामर्थ्य आहे. आणि असा समज आहे की ह्या ठिकाणी भगवान शंकरांनी स्वतः हा लेप तयार केला. आत्ता चालू काळात सुद्धा हा लेप इथे तयार होतो आणि जवळ जवळ ४०० रोग ह्या लेपाने बरे होतात असा विश्वास आहे.
क्षेत्र पुराण:
जेव्हां अंगारक श्वेतकुष्ठरोगग्रस्त होता तेव्हा त्याला आकाशवाणीने, ह्या स्थळाला येऊन अमृत तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची उपासना करण्याची आज्ञा झाली. अंगारकाने आज्ञेनुसार इथे येऊन भगवान शिवांची उपासना केली आणि त्यामुळे शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी (शिवांनी) अंगारकासाठी औषध बनवायला घेतलं आणि त्याच वेळी देवी पार्वती औषधासाठी एक विशेष तेल घेऊन आली. म्हणूनच तिला इथे तैलनायकी असे नाव पडले.
मंगळ ग्रह मंदिराचा इतिहास:
पुराणातील कथांनुसार ह्या गावाचं मूळ नांव पुल्लीरुक्कुवेलूर (पुल्ल - जटायूचं एक नांव, इरुक्कु - ऋग्वेद, वेल - मुरुगन/कार्तिकेय स्वामी, उर - गाव) म्हणजे १) जिथे जटायूने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी युद्ध केलं २) जिथे ब्रह्माने ऋग्वेद निर्माण केले आणि ३) जिथे वेलाची (म्हणजे मुरुगन देवाच्या शस्त्राची) पूजा होते.
असं मानलं जातं की सगळे वेद हे सुरुवातीला ब्राह्मण रूपात होते. ऋग्वेदाने या जागी तपश्चर्या करून दोषनिवारण केलं.
प्रभू श्रीरामांनी या जागी जटायूच्या देहाचं दहन करून त्याला मुक्ती दिली. जटायूने या जागी रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी त्याच्याबरोबर युद्ध केलं. या युद्धामध्ये जटायू गंभीररीत्या जखमी झाला. जेव्हा प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या जागी आले त्यावेळी जटायूने श्रीरामांना रावणाने सीतेला पळवून नेल्याची बातमी सांगितली आणि मग आपला प्राण सोडला.
या जागी मुरुगन स्वामींना (कार्तिकेय स्वामी) त्यांच्या मातेकडून म्हणजेच पार्वती मातेकडून सुरपद्मन राक्षसाचा वध करण्यासाठी वेल (भाला) शस्त्र म्हणून मिळालं. असा समज आहे की मुरुगन स्वामी आणि सुरपद्मन राक्षसाच्या युद्धामध्ये जे देव जखमी झाले त्यांना भगवान शंकरांनी बरं केलं आणि माता पार्वतींनी त्या देवांची सुश्रुषा केली. शंकर-पार्वतींनी इथे वैद्याची भूमिका केली म्हणून या जागेचं नाव वैदीश्वरन (वैतीश्वरन) असं प्रसिद्ध झालं.
असा समज आहे की ह्या ठिकाणी १८ कुंडं (पुण्य तीर्थ) होती. ह्यापैकी सध्या माहिती असलेली तीर्थे:
१) सिद्ध अमृत तीर्थ - कामधेनूने निर्माण केलेलं पहिलं तीर्थ
२) कोदंड तीर्थ - पुराणांनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेच्या वाटेवर असताना ह्या ठिकाणी स्नान घेतलं होतं
३) गौतम तीर्थ - गौतम मुनींनी निर्माण केलेलं तीर्थ
४) बिल्वतीर्थ
आणि इतर
आख्यायिकांनुसार असा समज आहे की इथे उपासना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना वरदानं मिळतात. कुठले ग्रह आणि देव कुठली वरदानं देतात?
१) कर्पग विनायक सर्व इच्छा पूर्ण करतो
२) अंगारक अंगारक दोषांचं (मंगळ दोषांचं निवारण) करतो
३) वैद्यनादर स्वामी सर्व रोगांचं निवारण करतात
४) सेल्व मुत्तू कुमारन (भगवान मुरुग) संततीचं वरदान प्रदान करतात
५) तैलनायकी (देवी पार्वती) संततीचं कल्याण करते
मंदिरात साजरे होणारे सण:
१) थाई महिन्याच्या मंगळवारी भगवान सेल्वमुत्तूकुमारन ह्यांचा १० दिवसांचा उत्सव
२) पंगूनी (मार्च -एप्रिल) महिन्यात २८ दिवसांचा ब्रह्मोत्सव
३) ऎप्पसी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) महिन्यात सहा दिवसांचा स्कंद षष्ठी उत्सव
४) वैकासि (मे-जून) मध्ये कार्तिकेय अभिषेक
५) प्रत्येक महिन्याच्या कार्तिक नक्षत्र दिवशी विशेष पूजा
६) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा
No comments:
Post a Comment