Thursday, June 25, 2020

श्वेतारण्येश्वरर मंदिर - थिरुवेंकाडू - बुध ग्रहाचे मंदिर



हे मंदिर बुध ग्रहाचे मंदिर आहे आणि नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे.  

मुख्य दैवत: श्वेतारण्येश्वरर
अम्मन (देवी): ब्रह्माविद्याम्बिका
क्षेत्र वृक्ष: पीपल (वडवानल), कोंद्रेई (बहावा), बिल्व
पौराणिक नाव: थिरुवेंकाडू, आदी चिदंबरम, श्वेतारण्य
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ, अग्नी तीर्थ, चंद्र तीर्थ
पत्ता: थिरुवेंकाडू, तामिळनाडू ६०९११४, इंडिया

वैशिष्ठ्ये:

१) येथील शिवलिंग स्वयंभू आहे 
२) जशा काशीमध्ये विष्णू पादुका आहेत, त्याचप्रमाणे इथे वडवानल वृक्षाच्या खाली रुद्र पादुका आहेत. म्हणूनच इथे भगवान शंकरांना थिरुवेंकदर किंवा
थिरुवेंकट्टूदेवर असं संबोधलं जातं. 
३) येथील स्फटिक लिंगावर दिवसातून चार वेळा तर नटराजाच्या मूर्तीवर सहा वेळा अभिषेक केला जातो. 
४) हे स्थळ म्हणजे शक्ती पीठ पण मानलं जातं. आणि येथील शक्ती पीठाचे प्रणव शक्तीपीठ असे नाव आहे. 
५) काशी एवढेच पवित्र मानले जाणाऱ्या सहा क्षेत्रांपैकी हे एक क्षेत्र आहे. बाकीच्या पांच क्षेत्रांची नावे - १. थिरुवयरू, २. मैलादुथुराई, ३. छायावन,
४. थिरुवडुमैथुर, ५. थिरुवणचिअम
६) वाल्मिकी रामायणामध्ये ह्या स्थळाचा उल्लेख सापडतो

श्वेतारण्याचा अर्थ: श्वेत म्हणजे पांढरा (तामिळ मध्ये वेनमै). अरण्यम म्हणजे
जंगल (तामिळ मध्ये काडू). आणि म्हणूनच ह्या स्थळाला श्वेतारण्य किंवा
वेंगाडू असं म्हणलं जातं. 

आख्यायिका:

१) एकदा भगवान मुरूगांनी ब्रह्मदेवाला प्रणव मंत्राचे स्पष्टीकरण देता आलं नाही म्हणून बंदिस्त केलं. पण ह्यामुळे ब्रह्मसृष्टीचं कार्य स्तंभित झालं आणि म्हणून भगवान शिवांनी मध्यस्थी करून ब्रह्मदेवाला मुक्त केलं. काही काळ बंदिस्त राहिल्यामुळे ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञानाचं विस्मरण झालं आणि ब्रह्मदेवांनी इथे येऊन तपश्चर्या केली. त्यांनी जी तपश्चर्या इथे केली त्याला
समधूनीलै (तामिळ), म्हणजे श्वास राखून धरणे, असं म्हणतात. भगवान
शिवांनी दक्षिणामूर्तींच्या रूपात येऊन ब्रह्मदेवांना ब्रह्मज्ञान प्रदान केलं तर
देवी पार्वतींनी त्यांना ब्रह्मकलेचं ज्ञान दिलं. म्हणून इथे देवी पार्वतींना
ब्रह्मज्ञानाम्बिका असं संबोधलं जातं. ही घटना दर्शविण्यासाठी इथे स्वतंत्र
देवस्थान आहे. 

२) असं समजलं जातं की भगवान शिवांची ६४ रूपे आहेत आणि पांच मुखे
आहेत. ती पांच मुखे अशी - ऊर्ध्वमुखी ईशान (पवित्रतेचं प्रतीक), उत्तरमुखी
वामदेव (उदरनिर्वाहाचं प्रतीक), पूर्वमुखी तत्पुरुष (अध्यात्म आणि अहंकार
निर्मुलनाचं प्रतीक), दक्षिणमुखी अघोर मूर्ती (संहार आणि पुनरुत्थान ह्यांचं
प्रतीक), पश्चिममुखी सदाशिव (शाश्वत आनंदाचं प्रतीक). 

३) एका आख्यायिकेनुसार मरुत नावाच्या दैत्याने (सालीन्द्र चा पुत्र) इथे
भगवान शिवांची प्रखर तपश्चर्या करून त्यांच्याकडून वरदान म्हणून त्रिशूल
प्राप्त केलं. पण ह्या प्राप्त झालेल्या त्रिशुळाने त्याने देवांना त्रास द्यायला चालू
केलं. भगवान शिवांनी मरुताला शिक्षा देण्यासाठी नंदीदेवाला पाठवलं. पण
नंदीदेवाबरोबरच्या युद्धात मरुताने नंदीदेवाच्या शरीरावर त्रिशुळाने वार
केले आणि त्यामुळे नंदीदेवाच्या शरीरावर नऊ ठिकाणी जखमा झाल्या.
भगवान शिवांना क्रोध आला आणि त्यांनी अघोरमूर्ती रूप घेऊन मरुत
दैत्याला एका वृक्षाखाली मारले. (हे वृक्ष अजूनही ह्या ठिकाणी आहे असा
समज आहे). येथील नंदीदेवाच्या मूर्तीवर नऊ जखमा दिसून येतात. असा
उल्लेख आहे कि भगवान शिवांनी मरुत्वाला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र असताना
मारले आणि त्यावेळी रविवार होता. 

४) एका आख्यायिकेनुसार यमदेवाला भगवान शिवांनी श्वेतकेतु राजाचा जीव
हरण केल्याबद्दल शिक्षा केली. आणि ह्या ठिकाणी यमदेवाने भगवान शिवांना
क्षमायाचना करण्यासाठी तपश्चर्या केली. 

५) असा उल्लेख आहे की भगवान शिवांनी येथे नऊ तांडव नृत्ये केली -
आनंद तांडव, कली तांडव, गौरी तांडव, मुनी तांडव, संध्या तांडव, त्रिपुर
तांडव, भुजंग तांडव, संहार तांडव आणि भिक्षाटन तांडव. देवीपार्वती साठी
त्यांनी आनंद तांडव केले आणि ते तांडव करताना त्यांच्या नेत्रातून अश्रुंचे
तीन थेंब पडले आणि त्यातून तीन तीर्थे निर्माण झाली.

६) इंद्र, ऐरावत, महाविष्णू, सूर्य, चन्द्र आणि अग्नी ह्यांनी येथे भगवान शिवांची
उपासना केली. 

७) पत्तीनाथर नावाच्या संतांना येथे शिवदीक्षा प्राप्त झाली. 

ह्या ठिकाणच्या इतर देवता


१) भगवान विनायक देवस्थान
२) भगवान वल्लभ गणपती आणि त्यांची पत्नी श्री वल्लभ देवी ह्यांचे देवस्थान 
३) श्वेतवनपेरूमल, पंचलिंग, नागेश्वर आणि वीरभद्र ह्यांची देवस्थाने
४) काशी विश्वनाथ आणि विशालाक्षी 
५) भगवान विष्णूंचे येथे स्वतंत्र देवस्थान आहे. 

ह्याशिवाय इतर देवतांच्या त्यांच्या त्यांच्या स्थानी कोष्ट मुर्त्या आहेत. 

ह्या स्थळाचं एक अद्वितीय वैशिष्ठ्य असं आहे की इथे - तीन देवांच्या मुर्त्या
आहेत - स्वयंभू लिंग, नटराज आणि अघोर मूर्ती. तीन देवींच्या मुर्त्या आहेत -
ब्रह्मविद्याम्बिका, काली आणि दुर्गा. तीन तीर्थे आहेत - सूर्य, चंद्र आणि अग्नी,
आणि तीन क्षेत्र वृक्ष आहेत - बिल्व, कोंद्रेई (बहावा), वडवानल

इथे साजरे केले जाणारे सण


१) मासी (फेब - मार्च) महिन्यात साजरा होणारा ब्रह्मोत्सव ज्याला इंद्राचा सण
असं पण म्हणतात
२) आडी (जुलै - ऑगस्ट) महिन्यात पूर्वा फाल्गुनी नक्षत्रावर साजरा होणारा
दहा दिवसांचा सण 
३) आवणी (ऑगस्ट - सप्टेंबर) मध्ये गणेश चतुर्थी 
४) ऎप्पसी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) मध्ये साजरे होणारे स्कंद षष्ठी आणि
अन्नाभिषेक सण
५) मार्गाळी (डिसेंबर - जानेवारी) महिन्यात आर्द्रा नक्षत्रावर साजरा होणारा
आरुद्र दर्शन सण 
६) पंगूनी (मार्च - एप्रिल) महिन्यामध्ये अघोर मूर्तीवर लक्षार्चना 
७) कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर) महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अघोर पूजा 
८) इंद्रदेवाच्या ऐरावत हत्तीचा वैकासि सण. ह्या ठिकाणी ऐरावताला त्याच्या
शापातून मुक्ती मिळाली. 
९) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा 
१०) शरद ऋतू मध्ये दहा दिवसाचा नवरात्र सण


आभार: खाली दिलेल्या वेब साईट्स वरून काही माहिती ह्या पोस्ट मध्ये समाविष्ट केली आहे
1. https://tamilnadu-favtourism.blogspot.com/ 2. https://temple.dinamalar.com/en/
3. http://www.indiatemples.in/

Thursday, June 18, 2020

थिरुवैद्यनादर कोविल - मंगळ ग्रहाचे मंदिर



हे मंगळ (अंगारक) ग्रहाचं मंदिर आहे. नायनमारांनी प्रशंसा गायलेल्या कावेरी नदीकाठावरल्या स्थळांपैकी पण एक आहे. साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. 

मंदिराचे नाव: वैथीश्वरन कोविल (वैद्य + ईश्वरन + कोविल)
स्थळ देवता : श्री वैद्यनाथ 
अम्मन (देवी): थैयल नायकी 
गणपती: कर्पग विनायक 
ग्रहाचे नाव: अंगारकन (तामिळ मध्ये छेवै)
क्षेत्र वृक्ष: नीम 
पत्ता: वैथीश्वरन कोविल, नागपट्टीनं जिल्हा, तामिळ नाडू ६०९११७, भारत

मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:

सिरकाळी - मैलादुथुराई मार्गावर हे मंदिर आहे. 

येथील शिवलिंग स्वयंभू आहे. येथील पांच गोपुरे (टॉवर) सरळ रेषे मध्ये (संरेखित) आहेत. इथे शिवलिंगासमोर दोन दीपस्तंभ आहेत. एक सोन्याचा आहे तर दुसरा चांदीचा आहे. सहसा नवग्रह देवस्थान हे मुख्य देवस्थानाच्या समोर असते, पण इथे मात्र ते मुख्य देवस्थानाच्या (गाभाऱ्याच्या) पाठीमागे आहे. मुख्य देवस्थानाच्या पूर्वेला भैरवाचे देवस्थान आहे, पश्चिमेला वीरभद्राचे देवस्थान आहे, दक्षिण दिशेला विनायकाचे तर उत्तरेला काली देवीचे देवस्थान आहे. असा समज आहे की ही चार दिशांना असलेली देवस्थाने रक्षक म्हणून आहेत. इथे एक पाचूचे शिवलिंग आहे.

मंदिराच्या आख्यायिका:


१) सिद्ध अमृत तीर्थ: असा उल्लेख आहे की सिद्धांनी इथे अमृताचा अभिषेक करून बरीच वरदानं मिळविली. अभिषेक करताना थोडे अमृत तीर्थामध्ये सांडलं आणि म्हणून ह्या तीर्थाला सिद्ध अमृत तीर्थ असे नाव मिळाले. ऋषी सदानंद ह्यांनी दिलेल्या शापामुळे इथे साप किंवा बेडकं आढळत नाहीत. 

२) असा समज आहे की वारुळाची वाळू, अभिषेक तीर्थ, नीम पाने, अभिषेक चंदन आणि अभिषेक भस्म मिसळून जो लेप तयार होतो त्यात बरेच रोग निवारण करण्याचे सामर्थ्य आहे. आणि असा समज आहे की ह्या ठिकाणी भगवान शंकरांनी स्वतः हा लेप तयार केला. आत्ता चालू काळात सुद्धा हा लेप इथे तयार होतो आणि जवळ जवळ ४०० रोग ह्या लेपाने बरे होतात असा विश्वास आहे. 

क्षेत्र पुराण:

जेव्हां अंगारक श्वेतकुष्ठरोगग्रस्त होता तेव्हा त्याला आकाशवाणीने, ह्या स्थळाला येऊन अमृत तीर्थामध्ये स्नान करून भगवान शिवांची उपासना करण्याची आज्ञा झाली. अंगारकाने आज्ञेनुसार इथे येऊन भगवान शिवांची उपासना केली आणि त्यामुळे शिव त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी (शिवांनी) अंगारकासाठी औषध बनवायला घेतलं आणि त्याच वेळी देवी पार्वती औषधासाठी एक विशेष तेल घेऊन आली. म्हणूनच तिला इथे तैलनायकी असे नाव पडले. 

मंगळ ग्रह मंदिराचा इतिहास:

पुराणातील कथांनुसार ह्या गावाचं मूळ नांव पुल्लीरुक्कुवेलूर (पुल्ल - जटायूचं एक नांव, इरुक्कु - ऋग्वेद, वेल - मुरुगन/कार्तिकेय स्वामी, उर - गाव) म्हणजे १) जिथे जटायूने सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठी युद्ध केलं २) जिथे ब्रह्माने ऋग्वेद निर्माण केले आणि ३) जिथे वेलाची (म्हणजे मुरुगन देवाच्या शस्त्राची) पूजा होते. 

असं मानलं जातं की सगळे वेद हे सुरुवातीला ब्राह्मण रूपात होते. ऋग्वेदाने या जागी तपश्चर्या करून दोषनिवारण केलं. 

प्रभू श्रीरामांनी या जागी जटायूच्या देहाचं दहन करून त्याला मुक्ती दिली. जटायूने या जागी रावणाच्या तावडीतून सीतेला सोडवण्यासाठी त्याच्याबरोबर युद्ध केलं. या युद्धामध्ये जटायू गंभीररीत्या जखमी झाला. जेव्हा प्रभू श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या जागी आले त्यावेळी जटायूने श्रीरामांना रावणाने सीतेला पळवून नेल्याची बातमी सांगितली आणि मग आपला प्राण सोडला. 

या जागी मुरुगन स्वामींना (कार्तिकेय स्वामी) त्यांच्या मातेकडून म्हणजेच पार्वती मातेकडून सुरपद्मन राक्षसाचा वध करण्यासाठी वेल (भाला) शस्त्र म्हणून मिळालं. असा समज आहे की मुरुगन स्वामी आणि सुरपद्मन राक्षसाच्या युद्धामध्ये जे देव जखमी झाले त्यांना भगवान शंकरांनी बरं केलं आणि माता पार्वतींनी त्या देवांची सुश्रुषा केली. शंकर-पार्वतींनी इथे वैद्याची भूमिका केली म्हणून या जागेचं नाव वैदीश्वरन (वैतीश्वरन) असं प्रसिद्ध झालं. 

असा समज आहे की ह्या ठिकाणी १८ कुंडं (पुण्य तीर्थ) होती. ह्यापैकी सध्या माहिती असलेली तीर्थे:

१) सिद्ध अमृत तीर्थ - कामधेनूने निर्माण केलेलं पहिलं तीर्थ 
२) कोदंड तीर्थ -  पुराणांनुसार प्रभू श्रीरामांनी लंकेच्या वाटेवर असताना ह्या ठिकाणी स्नान घेतलं होतं 
३) गौतम तीर्थ - गौतम मुनींनी निर्माण केलेलं तीर्थ 
४) बिल्वतीर्थ
आणि इतर  

आख्यायिकांनुसार असा समज आहे की इथे उपासना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना वरदानं मिळतात. कुठले ग्रह आणि देव कुठली वरदानं देतात?

१) कर्पग विनायक सर्व इच्छा पूर्ण करतो 
२) अंगारक अंगारक दोषांचं (मंगळ दोषांचं निवारण) करतो
३) वैद्यनादर स्वामी सर्व रोगांचं निवारण करतात 
४) सेल्व मुत्तू कुमारन (भगवान मुरुग) संततीचं वरदान प्रदान करतात 
५) तैलनायकी (देवी पार्वती) संततीचं कल्याण करते 

मंदिरात साजरे होणारे सण:

१) थाई महिन्याच्या मंगळवारी भगवान सेल्वमुत्तूकुमारन ह्यांचा १० दिवसांचा उत्सव 
२) पंगूनी (मार्च -एप्रिल) महिन्यात २८ दिवसांचा ब्रह्मोत्सव 
३) ऎप्पसी (ऑक्टोबर - नोव्हेंबर) महिन्यात सहा दिवसांचा स्कंद षष्ठी उत्सव 
४) वैकासि (मे-जून) मध्ये कार्तिकेय अभिषेक
५) प्रत्येक महिन्याच्या कार्तिक नक्षत्र दिवशी विशेष पूजा 
६) प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा 

Thursday, June 11, 2020

कैलासनादर थिंगळूर - चंद्रग्रहाचे मंदिर


हे चंद्रदेवाचे मंदिर आहे. साधारण १५०० वर्षांपूर्वी बांधलेले आहे. 


मुख्य दैवत: कैलासनादर 
अम्मन (देवी): पेरियनायकी 
क्षेत्रवृक्ष: बिल्व 
पवित्र तीर्थ: चंद्र पुष्करिणी 
पत्ता: थिंगळूर, तंजावूर जिल्हा, तामिळनाडू


मंदिरापर्यंत पोचायचा मार्ग:  

कुंभकोणम वरून थिरुवैयरुकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण ३३
किलोमीटर्सवर हे मंदिर आहे. थिरुपळनं पासून २ किलोमीटर्सवर आहे.


ठळक वैशिष्ठ्ये:

पुरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर) आणि पंगूनी (मार्च-एप्रिल) ह्या महिन्यांमध्ये
चंद्राची किरणे मूर्तीवर पडतात. चंद्रदेवाचे इथे स्वतंत्र देवस्थान आहे जिथे
चंद्राची विशेष पूजा केली जाते.

चंद्र मंदिराचा इतिहास:

पुराणातील कथांनुसार चंद्र हा अतिशय सुंदर होता. त्यामुळे अर्थातच
बऱ्याच मुलींना त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. प्रजापतीला २७ सुंदर
मुली होत्या ज्या चंद्राच्या सौन्दर्यावर मोहीत झाल्या होत्या. त्या सगळ्यांनी
चंद्राबरोबर लग्न केलं. त्या सर्वांमध्ये चंद्राचं रेवतीवर जास्त प्रेम जडलं. पण
त्यामुळे बाकी सर्व पत्नी आणि त्यांचा पिता प्रजापती हे चंद्रावर रुष्ट झाले.
प्रजापतीने चंद्राला शाप दिला कि त्याच्या सर्व १६ कला एक एक करून
प्रत्येक दिवशी नाश पावतील. चंद्र शंकराला शरण गेला आणि शंकरांच्या
आज्ञेनुसार त्याने तपश्चर्या केली. त्याने स्वतः एक तीर्थ बनवलं. त्या तीर्थामध्ये
स्नान घेऊन त्याने भगवान शंकराची पूजा केली. भगवान शंकर चंद्रावर
प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला वरदान दिलं कि त्याच्या कला
वैकल्पिकरित्या (अल्टरनेट) विकसित (शुक्ल पक्ष) आणि अविकसित
(कृष्ण पक्ष) होतील. त्यातूनच शुक्ल आणि कृष्ण पक्ष निर्माण झाले. 


मंदिरात साजरे होणारे सण:

  1. अमावस्या, कृत्तिका नक्षत्र, पौर्णिमा, महाशिवरात्री आणि आर्द्रा दर्शन या दिवशी इथे विशेष अभिषेक केला जातो.
  2. पंगूनी उत्तरम सण 
  3. कार्तिकेय सण 

Thursday, June 4, 2020

सूर्यनार कोविल - सूर्यग्रहाचे मंदिर



हे सूर्य ग्रहाचे मंदिर आहे. सूर्य ग्रहदोषांचे हे परिहार स्थळ तर आहेच, पण
त्याशिवाय हे उर्वरित ग्रहदोषांचे पण परिहार स्थळ म्हणून मानले जाते.
साधारण २००० वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले आहे. सर्व नवग्रहांपैकी हे एकच
नवग्रह स्थळ आहे जिथे मुख्य दैवत भगवान शिव नसून भगवान सूर्य
आहे. 

मुख्य दैवत: शिवसूर्यन 
अम्मन (देवी): उषादेवी, प्रत्युषादेवी (छायादेवी)
क्षेत्र वृक्ष : अर्घ वृक्ष (अर्घवन), (मराठी मध्ये रुई)
पवित्र तीर्थ: सूर्य तीर्थ
पत्ता: सूर्यनार कोविल, तंजावूर जिल्हा

मंदिरापर्यंत पोचण्याचा मार्ग:

मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे कुंभकोणम किंवा
मैलादुथुराई कडून रस्त्याने सूर्यनार कोविल कडे जाऊ शकतो किंवा
अदुथुराई वरून रेल्वे करून पण जाऊ शकतो. पण रेल्वेचा मार्ग फार
काही सोयीस्कर नाही. अदुथुराई रेल्वे स्टेशन पासून मंदिर उत्तरेला
साधारण ३ किलोमीटर्स वर आहे.

ठळक वैशिष्ठ्ये:

हे भारतातील तीन प्रसिद्ध सूर्यमंदिरांपैकी एक आहे. येथील गाभाऱ्यात
सूर्यदेवाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि मूर्तीच्या डाव्या बाजूला उषादेवी
तर उजव्याबाजूला छायादेवी वधूंच्या रूपात आहेत. सूर्यदेवाची मूर्ती उभी
असून त्यांच्या हातामध्ये लाल कमळ आहे. मूर्तीच्या पुढे सूर्यदेवाचे वाहन
म्हणजेच अश्वाची मूर्ती आहे. गुरुग्रहदेवाची मूर्ती सुर्याभिमुख आहे जणू
काही ते सूर्याला शांत करत आहेत. हे एकच मंदिर असं आहे की जिथे
एकाच ठिकाणी सर्व नवग्रहांची स्वतंत्र देवस्थाने आढळतात. इथले सर्व
नवग्रह हे अनुग्रह देण्याच्या रूपात आहेत आणि ते त्यांच्या वाहनांशिवाय
आहेत.

सूर्य मंदिराचा इतिहास:

पुराणातील कथांनुसार पूर्वी काल नावाचे ऋषी होते ज्यांनी स्वतःच्या
कुंडलीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना आपले ग्रहदोष
समजले. ह्या ग्रहदोषांचं निवारण होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि
नवग्रहांना प्रसन्न केले. आणि नवग्रहांकडून त्यांनी आपल्या वंशजांना ह्या
ग्रहदोषांचा त्रास होणार नाही असा आशीर्वाद प्राप्त केला. अशा रीतीने ते
आणि त्यांचे वंशज पितृदोषापासून मुक्त झाले. पितृदोष हा पूर्वजांकडून
त्यांच्या वंशजांकडे येतो. 

जेव्हा नवग्रहांनी काल ऋषींना दिलेल्या आशीर्वादाची माहिती त्यांच्या
(नवग्रहांच्या) अधिदेवतांना -  म्हणजेच शिव, पार्वती, कार्तिक स्वामी
(मुरुगन), थिरुमल (विष्णू), ब्रह्म, वल्ली (कार्तिक स्वामींची पत्नी) ह्यांना
कळली, तेव्हा अधिदेवतांना त्यांचा खूप राग आला. त्यांच्या मते नवग्रहांना
ग्रहदोषांचे निवारण करण्याचा अधिकार नाही. अधिदेवतांनी नवग्रहांना
कुष्ठरोग सहन करायला लागेल असा शाप दिला. नवग्रहांना आपण आपली
मर्यादा ओलांडली आहे ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी अधिदेवतांकडे
ह्या अपराधाबद्दल क्षमार्चना केली. नवग्रहांची क्षमार्चनेच्या मागील
प्रामाणिक भावना लक्षात घेऊन अधिदेवतांनी नवग्रहांना अर्घवनामध्ये
जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. ह्या तपश्चर्येचं स्वरूप असं होतं -
रविवारी उपवास करून तेथील तीर्थामध्ये स्नान करून शिव आणि
पार्वतीची पूजा करणे आणि सोमवारी मंदारच्या पानावर दहिभाताचं सेवन
करणे. असे ११ रविवार करण्यास सांगितले. असे केल्यास त्यांची
शापापासून मुक्तता होईल असे आश्वासन दिले. नवग्रहांनी भक्तिभावाने ही
तपश्चर्या केली आणि त्यांचे कुष्टरोग निवारण झाले.

भगवान शिवांनी नवग्रहांना इथेच राहून भक्तांवर अनुग्रह करून त्यांचे
ग्रहदोष निवारण करण्याची आज्ञा केली.

मंदिरातील इतर देवस्थाने: भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश

मंदिरात साजरे होणारे सण:


  1. फेब्रुवारी महिन्यामध्ये १० दिवसांचा रथसप्तमी सण 
  2. प्रत्येक तामिळ महिन्याच्या पहिल्या रविवारी येथे भगवान सूर्यांवर विशेष अभिषेक आणि अर्चना केली जाते. 
  3. सूर्य आणि गुरु ग्रहांचे एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होत असतांना इथे विशेष पूजा केल्या जातात.