Thursday, February 21, 2019

नवग्रह मंदिरे - राहू

राहुग्रह मंदिराची माहिती:


मंदिराची माहिती:


मंदिराचे नांव: थिरुनागेश्वरम्  
स्थल देवता: श्री शेनबागा अरण्येश्वर
देवीचे नांव: श्री गिरी गुजांबिका   
ग्रहाचे नांव: राहु    
गावाचे स्थान: थिरुनागेश्वरम्, तामिळनाडू ६१४०१४, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव:  श्री शेनबागा (जास्वंद) अरण्येश्वर
इथे नागावर एक चिन्ह आणि फणी आहे पण सर्पावर चिन्ह किंवा फणी नाहीये. ह्या ठिकाणी शिवलिंगावर अभिषेकाच्या वेळेस जे दूध ओतलं जातं ते लिंगावरून खाली आल्यावर निळं होतं.

मंदिराकडे जाण्याचा मार्ग:
हे मंदिर कुंभकोणम् च्या पूर्वेला ६ किलोमीटरवर आहे.


राहु ग्रह मंदिराचा इतिहास:

पुराणांनुसार एका शिवरात्रीला पाताळ लोकातील नागराजाने कुंभकोणम् मधील चार वनांमध्ये (बिल्व वन, जास्वंद वन, वन्नी वन आणि नागपटणं) प्रत्येक प्रहरी एका वनात पूजा केली.  त्याने प्रत्येक वनांत एक शिवाचे मंदिर उभे केले आणि तेथे पूजा केली. पुराणांनुसार असं मानलं जातं की गणपती, नंदी, ब्रह्म, सूर्य, वसिष्ठ मुनी आणि इंद्रदेवाने इथे शिवाची उपासना केली. असं पण मानलं जातं की गौतम मुनींनी इथे उपासना करून आपल्या पत्नीस परत मिळविले. अज्ञातवासात असताना पांडवांनी इथे भेट दिली असा पण समज आहे.

राहु ग्रहाचा इतिहास:

इथे राहुदेवाने उपासना केली आणि नागराजाने पण उपासना केली म्हणून राहुदोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी ही जागा योग्य मानली जाते. राहुदेव आणि नागराज ह्यांना इथे उपासना करून फक्त वैयक्तिक लाभ झाला नाही तर भगवान शंकरांनी त्यांना असं पण वरदान दिलं कि जे कोणी राहुदेवाची आणि नागराजाची येथे उपासना करतील त्यांना सर्व ग्रहदोषांपासून मुक्ती मिळेल.

असा समज आहे की रविवारी राहुकाळामध्ये (म्हणजेच दुपारी ४.३० ते ६ मध्ये) जर कोणी येथे दुधाचा अभिषेक केला तर त्यांना राहु, केतू आणि सर्पदोषांपासून मुक्ती मिळेल.

सिंहिका म्हणजे हिरण्यकशिपू राक्षसाची पुत्री. तिचा विवाह विप्रजीत नावाच्या राक्षसाशी झाला. त्यांना पुत्र झाला ज्याचे नाव स्वरभानू होते.

समुद्रमंथनाच्या वेळेस वासुकी सर्प दोर म्हणून वापरला गेला तर मंदार पर्वत रवी (घुसळण्यासाठी वापरतात ती) म्हणून वापरला गेला. जेव्हा मंथनातून बाहेर आलेल्या अमृतासाठी देव आणि दानव ह्यांमध्ये युद्ध चालू झालं त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला आणि देव आणि दानव ह्यांना दोन वेगळ्या पंगतीमध्ये बसवून अमृत वाटण्यास सुरुवात केली. मोहिनीने अमृत वाटणीचे काम सर्वप्रथम देवांपासून चालू केले. स्वरभानु वेषांतर करून देवपंगतीमध्ये बसला आणि म्हणून त्यास अमृत मिळाले. जेव्हां सूर्यदेवाला हे उमगले कि स्वरभानु हा वेषांतर करून पंगतीमध्ये बसला आहे तेव्हा त्याने मोहिनीकडे तक्रार केली. तेव्हा मोहिनीने अमृत वाढण्याच्या पळीनेच स्वरभानूचा शिरच्छेद केला. पण स्वरभानुला आधीच अमृत मिळाल्यामुळे त्याचे शिर जिवंत राहिले. त्याच्या शिराचा खालचा भाग वाढून काळ्या रंगाचा सर्परूप झाला. ह्या रूपाने तो राहु म्हणून प्रसिद्ध झाला. त्याच्या शरीराचा उर्वरित भाग पाच शिरांच्या सर्पामध्ये रूपांतरित झाला, आणि तोच केतू म्हणून प्रसिद्ध झाला.

राहु आणि केतूने ब्रह्म आणि विष्णूंकडे क्षमायाचना केली. राहु आणि केतूने तपश्चर्या केली आणि ते ज्ञानसंपन्न आणि मोक्षदाते झाले.

राहुला दोन पत्नी आहेत - नागवल्ली आणि नागकन्नी. आणि एक पुत्र आहे.

राहु ग्रहाचे महत्व:

राहु आणि केतू ग्रहांना त्यांची स्वतःची अशी आकाशामध्ये स्थाने नाहीत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते व चंद्र, जो पृथ्वीचा उपग्रह आहे, तो पृथ्वीभोवती फिरतो. त्यांच्या (पृथ्वी व चंद्र) फिरण्याच्या मार्गाने होणारी वर्तुळे एकमेकांस जेथे छेदतात, त्या छेदनबिंदूंस राहु आणि केतू अशी नावे  आहेत.  

राहु हा मेष आणि वृश्चिक राशींचा स्वामी आहे. तूळ राशीमध्ये तो उच्च असतो तर धनु राशीमध्ये तो नीच असतो. राहु हा धन, संपत्ती आणि मानाची पदे प्रदान करणारा आहे. राहु ज्याला प्रतिकूल असेल त्याला उद्धटपणा आणि मत्सर हे दुर्गुण त्रास देतात. राहु हा ताप, कुष्ठरोग, अस्वस्थपणा ह्यांना पण कारणीभूत ठरतो.

राहु महादशा ही १९ वर्ष चालते. काही समजुतींनुसार ती साधारण १८ वर्ष चालते.

राहु ग्रहदोषांपासून निवृत्ती:

थिरुनागेश्वरम् ही एकच अशी जागा आहे जेथे राहुचे आपल्या पत्नींसमवेत मंदिर आहे. राहु दोषांपासून निवृत्तीसाठी काही समज आहेत ते असे
१) जो कोणी येथे दुधाचा अभिषेक आणि अर्चना करतो त्याची राहुदोषापासून निवृत्ती होते.
२) जर कोणी लिंबाच्या सालीमध्ये तुपाचा दिवा लावून राहु देवाची अधिदेवता असलेल्या दुर्गादेवीची अकरा आठवडे उपासना केली तर त्याची राहुदोषापासून मुक्ती होते.
३) राहु च्या मूर्तीसमोर काळ्या कापडामध्ये उडीद डाळ बांधून ठेवल्यास राहु दोषांपासून निवृत्ती होते. काळ्या कापडाऐवजी निळे कापड पण चालते.  

असा समज आहे की राहुकाळामध्ये कुठलेही शुभ कार्य सुरु करू नये. प्रचलित समजुतीनुसार प्रत्येक दिवशी राहुकाळ असा असतो - रविवारी संध्याकाळी ४.३० ते ६, सोमवारी सकाळी ७.३० ते ९, मंगळवारी दुपारी ३ ते ४.३०, बुधवारी दुपारी १२ ते १.३०, गुरुवारी १.३० ते ३, शुक्रवारी सकाळी १०.३० ते १२ आणि शनिवारी सकाळी ९ ते १०.३०  

राहु ग्रहाची वैशिष्ठ्ये:


#
वैशिष्ठ्य
राहु ग्रह
पत्नी
नागवल्ली आणि नागकन्नी
कपड्यांचा रंग
काळा / निळा    
लिंग
स्त्री
पंच महाभूतातील घटक
वायू
देव
निरृति
वाहन
काळा / निळा सिंह
अधि देवता
दुर्गा
धातू
खडी
रत्न (खडा)
गोमेध
१०
अवयव
शिर
११
चव
गोड
१२
धान्य
काळे चणे
१३
ऋतू
वसंत  
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
दक्षिण
१५
पुष्प
श्वेत मंदार / रुई    
१६
क्षेत्र वृक्ष
१) बेल  २) चंपक ३) शमी (वन्नी) ४) पुन्नई
१७
आठवड्यातला दिवस
-
१८
ध्वनी
-

राहु ग्रहाची रांगोळी:

राहुची पूजा करताना काढावयाची रांगोळी:



राहु ग्रहाचा श्लोक :

राहु ग्रह देवाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा

अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम् |
सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम् ||

No comments:

Post a Comment