जेव्हा मनुष्याचा जन्म होतो त्यावेळी शरीराबरोबर मनुष्याच्या पूर्व कर्माचे बरेवाईट परिणाम पण जन्म घेतात जे मनुष्याला येणाऱ्या आयुष्यात भोगायचे असतात. हे परिणाम ग्रहदशेच्या रूपात जन्म घेतात. म्हणूनच ज्योतिषी मनुष्याच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहांच्या स्थानावरून त्याला/तिला कुठल्या बऱ्यावाईट परिणामांना सामोरं जायला लागणार आहे ह्याचा अचूक अंदाज वर्तवु शकतात. ह्या सर्व नऊ ग्रहांना एकत्रपणे नवग्रह (नव = नऊ) असं संबोधलं जातं.
ह्या नऊ ग्रहांपैकी सात ग्रह रवि, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनि हे आकाशात दिसतात. राहू आणि केतू हे आकाशात दिसत नाहीत. पृथ्वी सूर्याभोवती फिरते व चंद्र, जो पृथ्वीचा उपग्रह आहे, तो पृथ्वीभोवती फिरतो. त्यांच्या (पृथ्वी व चंद्र) फिरण्याच्या मार्गाने होणारी वर्तुळे एकमेकांस जेथे छेदतात, त्या छेदनबिंदूंस राहू आणि केतू अशी नावे आहेत.
खगोलशास्त्रानुसार हे नऊ ग्रह भौतिक रूपात आहेत, पण मनुष्याच्या जीवनानुभवाच्या दृष्टीने पहिले तर हे नवग्रह म्हणजे नऊ शक्ती आहेत ज्या देवरूप मानल्या जातात. ह्या नवग्रहांची भावभक्तीने पूजा/अर्चना केल्यास मनुष्याच्या पूर्वकर्माच्या वाईट परिणामांचे दमन होऊन त्यांस सुख शांतीचा अनुभव मिळतो अशी श्रद्धा आहे.
“दक्षिण भारतातील नवग्रह स्थाने” ह्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे दक्षिण भारतामध्ये प्रत्येक नवग्रहाचं एक स्वतंत्र मंदिर आहे. येत्या आठवड्यांमध्ये आम्ही ह्या प्रत्येक नवग्रहाच्या मंदिराची माहिती लेखाद्वारे प्रकाशित करणार आहोत.
No comments:
Post a Comment