Sunday, December 9, 2018

दक्षिण भारतातील नवग्रह स्थाने

पूर्वी कलव नावाचे ऋषी होते. त्यांना कुष्ठरोग जडला होता. ह्या रोगाचं निवारण होण्यासाठी त्यांनी नवग्रहांची उपासना केली. नवग्रहांनी प्रसन्न होऊन कलव ऋषींच्या रोगाचं निवारण केलं. परंतु ब्रह्मदेवाला हे काही पटलं नाही. त्यांच्या मते नवग्रहांचं कर्तव्य हे की भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार नवग्रहांनी फक्त चांगल्या वाईट कर्मांची फळें देणं. ब्रह्मदेवाच्या मते नवग्रहांनी भगवान शंकरांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं होतं. ब्रह्मदेवांनी नवग्रहांना शाप दिला की त्यांना कुष्ठरोगाचे कष्ट सहन करायला लागतील. नवग्रह पृथ्वीवर आले आणि श्वेत पुष्पांच्या (पांढऱ्या पुष्पांच्या) वनामध्ये त्यांनी कुष्ठरोग निवारण होण्यासाठी तपश्चर्या केली. तमिळ मध्ये ह्या वनाला वेल्लरुक्कु वन म्हणतात. सध्या प्रचलित असलेल्या कुंभकोणम शहराजवळ हे वन आहे. नवग्रहांच्या तपश्चर्येवर भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी नवग्रहांना सांगितलं की ज्या स्थानावर तुम्ही तपश्चर्या केली आहे ते स्थान आता तुमचंच आहे. ह्या स्थानी राहून पृथ्वीवरील जे लोक त्यांची (नवग्रहांची) आराधना करतील त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवून त्यांच्या सर्व प्रकारच्या क्लेश निवारणासाठी मदत करावी अशी आज्ञा केली. अशाप्रकारे ही दक्षिण भारतातील नवग्रह मंदिरं अस्तित्वात आली. चोला साम्राज्यामध्ये ही मंदिरं बांधली गेली असावीत. एकत्र ह्या मंदिरांना नवग्रह स्थलम् असं संबोधलं जातं. ही सर्व मंदिरे कुंभकोणमच्या जवळपास आहेत. ह्या सर्व नवग्रह मंदिरांना भेट द्यायला साधारणतः २ ते ३ दिवस लागतात. येणाऱ्या महिन्यांमध्ये ह्या प्रत्येक मंदिराची माहिती आम्ही प्रकाशित करणार आहोत.


नवग्रह मंदिरांची थोडक्यात माहिती


नवग्रह
कुठे आहे?

ह्या मंदिरातील भगवान शंकराचं नांव
भगवान शंकरांच्या पत्नीचं (पार्वतीचं) नांव
ह्या मंदिराची दुसरी प्रचलित नावे
सुर्य
सुरियानार कोविल
श्री सूर्यनादर
श्री प्रकाशाम्बिका
अर्गवनम् (दूर्वांचं वन)
चंद्र
थिंगलूर
श्री कैलाशनादर
श्री पेरियनायकी

अंगारक (मंगळ, तमिळ मध्ये सेव्वै)
वैतीश्वरन कोविल
श्री वैद्यनादर
श्री थैयलनायकी
बुध
थिरुवेंकाडू
श्री श्वेतारण्येश्वर
श्री ब्रह्मविद्याम्बिका

गुरु
आलंगुडी
श्री आपत्सहायर
श्री वेळ्ळीएलवर कूझली

शुक्र (तमिळ मध्ये वेळ्ळी)
कंजनूर
श्री अग्निपुरीश्वर
श्री कर्पगंबाळ

शनी
थिरुनळ्ळर
श्री दर्भारण्येश्वरर्  
श्री प्राणाम्बिका

राहू
थिरुनागेश्वरम्
श्री सेनबागारणेश्वरर
श्री गिरीभुजांबिका

केतू
किळपेरुम्पल्लम्
श्री नागनादर
श्री नागाम्बिका

1 comment: