Thursday, December 27, 2018

नवग्रह मंदिरे - चंद्र

चंद्रग्रह मंदिराची माहिती:



मंदिराची माहिती:



मंदिराचे नांव: कैलासनादर मंदिर  
स्थल देवता: कैलासनादर
देवी: पेरियनायकी
गणपती: संकटविमोचन गणपती
ग्रहाचे नांव: चंद्र (तिंगळ)
गावाचे स्थान: तिंगळुर, कैलासनादर देवस्थानम्, तामिळनाडू ६१२२०४, भारत


मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

हे मंदिर थिरुवैय्यार - कुंभकोणम महामार्गावर आहे. थिरुपळ्ळम् पासून २ किमी वर आहे.  


कैलासनादर चा इतिहास:

पुराणातील कथांनुसार चंद्र हा अतिशय सुंदर होता. त्यामुळे अर्थातच बऱ्याच मुलींना त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. प्रजापतीला २७ सुंदर मुली होत्या ज्या चंद्राच्या सौन्दर्यावर मोहीत झाल्या होत्या. त्या सगळ्यांनी चंद्राबरोबर लग्न केलं. त्या सर्वांमध्ये चंद्राचं रेवतीवर जास्त प्रेम जडलं. पण त्यामुळे बाकी सर्व पत्नी आणि त्यांचा पिता प्रजापती हे चंद्रावर रुष्ट झाले. प्रजापतीने चंद्राला शाप दिला कि त्याच्या सर्व १६ कला एक एक करून प्रत्येक दिवशी नाश पावतील. चंद्र शंकराला शरण गेला आणि शंकरांच्या आज्ञेनुसार त्याने तपश्चर्या केली. त्याने स्वतः एक तीर्थ (तलाव) बनवलं. त्या तीर्थामध्ये स्नान घेऊन त्याने भगवान शंकराची पूजा केली. भगवान शंकर चंद्रावर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला वरदान दिलं कि त्याच्या कला वैकल्पिकरित्या (अल्टरनेट) विकसित (शुक्ल पक्ष) आणि अविकसित (कृष्ण पक्ष) होतील. त्यातूनच शुक्ल आणि कृष्ण पक्ष निर्माण झाले.


चंद्र ग्रहाचे महत्व:

शुभ आणि सात्विक ग्रहांमध्ये सूर्यानंतर चंद्र हा दुसरं स्थान घेतो. कुंडली मध्ये चंद्राचा प्रभाव खालील गोष्टींच्या संदर्भात दिसून येतो - माता, आयुष्यातले भोग, भाग्य, शुभ (सात्विक) अन्न, दुःख, सर्दी खोकल्या सारखे आजार, प्रसिद्धी, बल, निद्रा, डावा डोळा, मनाचे संतुलन, मेंदूचे नियंत्रण. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. चंद्राची महादशा ही १० वर्ष चालते.


चंद्र ग्रहदोषांपासून निवृत्ती:

चंद्र महादशेचे चांगले परिणाम वृद्धिंगत करण्यासाठी आणि वाईट परिणामांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाय - पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून चंद्राला पांढऱ्या भाताचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो प्रसाद म्हणून वाटून टाकावा. तो प्रसाद उपासकाने म्हणजे ज्याने उपवास करून नैवेद्य दाखवला आहे त्याने ग्रहण करू नये.


ग्रंथांच्या मते सर्व शुभ कर्मे शुक्ल पक्षात करावीत (म्हणजे अमावस्या पासून ते पौर्णिमे पर्यंतचा काळ).


ह्या मंदिरामध्ये तमिळ पंगुणी महिन्यात (मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत), पौर्णिमेला सकाळी ६ वाजता आणि दुसऱ्या दिवशी (म्हणजेच कृष्ण पक्षातील प्रथमेला) संध्याकाळी ६ वाजता सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. म्हणून कृष्णा पक्षातील प्रथमेला इथे विशेष पूजा केली जाते.  


चंद्र ग्रहाची वैशिष्ठ्ये:



#
वैशिष्ठ्य
चंद्र ग्रह
पत्नी
रोहिणी  
कपड्यांचा रंग
पांढरा (चंदेरी)
लिंग
पुरुष
पंच महाभूतातील घटक
जल
देव
वरुण  
वाहन
दहा शुभ्र पांढऱ्या घोड्यांचा रथ
अधि देवता
गौरी (पार्वती)
धातू
चांदी
रत्न (खडा)
मोती
१०
अवयव
रक्त  
११
चव
खारट
१२
धान्य
तांदूळ
१३
ऋतू
शिशिर
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
पश्चिम
१५
पुष्प
पांढरी कणेर
१६
क्षेत्र वृक्ष
केळी, बिल्व पत्र
१७
आठवड्यातला दिवस
सोमवार
१८
ध्वनी
म  


चंद्र ग्रहाची रांगोळी:



चंद्राची पूजा करताना काढावयाची रांगोळी:




चंद्र ग्रहाचा श्लोक :



चंद्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा


ध्यान श्लोक:
दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवम् |
नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणम् ||


गायत्री:

पद्मध्वजाय विद्महे हेमरुपाय धीमहि, तन्नो सोमः प्रचोदयात |



Thursday, December 20, 2018

नवग्रह मंदिरे - रवि

सूर्यग्रह मंदिराची माहिती:


मंदिराची माहिती:


मंदिराचे नांव: सूर्यनार कोविल
स्थल देवता: सूर्यनादर
देवी: प्रकाशाम्बिका
गणपती: लोकतीर्थ विनायक (इच्छापूर्ती गणपती)
ग्रहाचे नांव: शिवसूर्यनारायण स्वामी (सूर्यदेवाने ह्या ठिकाणी शिवाची उपासना केली, म्हणून हे नांव)
सूर्यदेवाच्या पत्नींची नावे : उषादेवी, प्रतिउषा देवी
गावाचे स्थान: सूर्यनार कोविल, थिरुमंगळकुडी, पोस्ट ऑफिस तंजावूर जिल्हा, थिरुविदाईमरुदूर तालुका, तामिळनाडू ६१२१०२, भारत
ऐतिहासिक / पौराणिक नांव : अर्घवनम्  (अर्घ - दुर्वा, वनम् - जंगल)
देवता: १. शिवपार्वती, २. सूर्यदेव, ३. गणेश

मंदिराकडे जाण्याचा मार्ग:

कुंभकोणम किंवा मईलाडूदुराई ह्या दोन्ही पैकी कुठल्याही शहरापासून सूर्यनार कोविल ला जाणारा रस्ता आहे. किंवा आडूदुराई पर्यंत ट्रेनने जाऊन पुढे आडूदुराई च्या उत्तरेला ३ किलो मीटर वर सूर्यनार कोविल आहे. पण हा मार्ग एवढा सोयीस्कर नाही.

मंदिरामध्ये प्रसादाचे वितरण:

मंदिरातल्या माध्याह्नपूजे नंतर दहीभाताचा प्रसाद मंदारच्या पानावर दिला जातो. रोगस्त भक्तांना ह्या प्रसादाचा चांगला लाभ होतो अशी श्रद्धा आहे.

सूर्यनार कोविल चा इतिहास:

पुराणातील कथांनुसार एकदा काल नावाचे ऋषी होते ज्यांनी स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये त्यांना आपले ग्रहदोष समजले. ह्या ग्रहदोषांचं निवारण होण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि नवग्रहांना प्रसन्न केले. आणि नवग्रहांकडून त्यांनी आपल्या वंशजांना ह्या ग्रहदोषांचा त्रास होणार नाही असा आशीर्वाद प्राप्त केला. अशा रीतीने ते आणि त्यांचे वंशज पितृदोषापासून मुक्त झाले. पितृदोष हा पूर्वजांकडून त्यांच्या वंशजांकडे येतो.

जेव्हा नवग्रहांनी काल ऋषींना दिलेल्या आशीर्वादाची माहिती त्यांच्या (नवग्रहांच्या) अधिदेवतांना कळली -  म्हणजेच शिव, पार्वती, कार्तिक स्वामी (मुरुगन), थिरुमल (विष्णू), ब्रह्म, वल्ली (कार्तिक स्वामींची पत्नी) - ह्यांना कळली, तेव्हा अधिदेवतांना ह्याचा खूप राग आला. त्यांच्या मते नवग्रहांना ग्रहदोषांचे निवारण करण्याचा अधिकार नाही. अधिदेवतांनी नवग्रहांना कुष्ठरोग सहन करायला लागेल असा शाप दिला. नवग्रहांना आपण आपली मर्यादा ओलांडली आहे ह्याची जाणीव झाली आणि त्यांनी अधिदेवतांकडे ह्या अपराधाबद्दल क्षमार्चना केली. नवग्रहांची क्षमार्चनेच्या मागील प्रामाणिक भावना लक्षात घेऊन अधिदेवतांनी नवग्रहांना अर्घवनामध्ये जाऊन तपश्चर्या करण्यास सांगितले. ह्या तपश्चर्येचं स्वरूप असं होतं - रविवारी उपवास करून तेथील तीर्थामध्ये स्नान करून शिव आणि पार्वतीची पूजा करणे आणि सोमवारी मंदारच्या पानावर दहिभाताचं सेवन करणे. असे ११ रविवार करण्यास सांगितले. असे केल्यास त्यांची शापापासून मुक्तता होईल असे आश्वासन दिले. नवग्रहांनी भक्तिभावाने ही तपश्चर्या केली आणि त्यांचे कुष्टरोग निवारण झाले.  

सूर्य ग्रहाचे महत्व:

सूर्य हा शुभ आणि सात्विक ग्रह मानला जातो. कुंडली मध्ये सूर्याचा प्रभाव खालील गोष्टींच्या संदर्भात दिसून येतो - आत्मा, पिता, शिर, शरीर, नोकरी, उजवा डोळा, धारिष्ट्य, प्रसिद्धी, आरोग्य. सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे. मेष राशी मध्ये सूर्य खूप उच्च स्थानी असतो तर तूळ राशीमध्ये तो नीच स्थानी असतो. सूर्याची महादशा ही ६ वर्ष चालते.


सूर्य ग्रहदोषांपासून निवृत्ती:

जर कोणाच्या पत्रिकेमध्ये सूर्य ग्रहदोष असेल तर पुढे सांगितल्याप्रमाणे सूर्याची उपासना करावी - लाल रंगाचे कपडे परिधान करावे, लाल रंगाच्या खड्याची अंगठी घालावी, सूर्याची पूजा करावी आणि पूजेमध्ये त्याला लाल रंगाचं वस्त्र अर्पण करावं, लाल रंगाचं पुष्प अर्पण करावं आणि दलिया किंवा शेवया पासून बनवलेला गोड पदार्थ, किंवा पोंगल नैवेद्य म्हणून अर्पण करावा.

शिव/रुद्र/अग्नी यांची उपासना करून पण सूर्यग्रहदोषांपासून निवृत्ती होते.

ह्या मंदिराचं एक वैशिष्ठ्य म्हणजे मंदिराच्या दोन्ही बाजूला बाकीच्या नवग्रहांची पण मंदिरे आहेत. सूर्यदेवाच्या मूर्तीसमोर गुरुची मूर्ती आहे. ही रचना हे दर्शवते कि सूर्याची उष्णता गुरु कमी करतो. सहसा सूर्याची उष्णता थेट अंगावर आली तर सहन होत नाही. गुरु, शिष्याच्या आणि सूर्याच्या मध्ये राहून ही उष्णता कमी करतो की ज्यामुळे शिष्याला त्या उष्णतेचा दाह लागत नाही.

ह्या मंदिराचं अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे ह्या मंदिरातील सगळ्या देवता ह्या त्यांच्या शस्त्रावीण आहेत.

सूर्य ग्रहाची वैशिष्ठ्ये:


#
वैशिष्ठ्य
सूर्य ग्रह
पत्नी
उषादेवी, प्रतीउषादेवी
कपड्यांचा रंग
लाल
लिंग
पुरुष
पंच महाभूतातील घटक
अग्नी
देव
अग्नी
वाहन
सात अश्वांचा रथ
अधिदेवता
शिव (रुद्र)
धातू
सोने / पितळ
रत्न (खडा)
माणिक (रुबी)
१०
अवयव
स्नायू
११
चव
तिखट
१२
धान्य
गहू
१३
ऋतू
ग्रीष्म
१४
ग्रहाच्या मुखाची दिशा
पूर्व
१५
पुष्प
लाल कमळ
१६
क्षेत्र वृक्ष
दुर्वा
१७
आठवड्यातला दिवस
रविवार
१८
ध्वनी


सूर्य ग्रहाची रांगोळी:


सूर्याची पूजा करताना काढावयाची रांगोळी:




सूर्य ग्रहाचा श्लोक :


सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ह्या श्लोकाचा जप करावा

जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महाद्युतिम् |
तमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ||