Thursday, November 16, 2017

प्रदक्षिणा

देऊळ, मूर्ती किंवा ज्या पर्वतावर देऊळ आहे अशा पर्वताला पायी फेरी मारणे ह्याला प्रदक्षिणा म्हणतात. जेव्हा पर्वताला, ज्यावर देऊळ आहे, त्याला प्रदक्षिणा घातली जाते तेव्हा त्याला गिरीप्रदक्षिणा किंवा गिरीवलम असं म्हणतात. प्रदक्षिणा हे एक पुण्यकारक कर्म आहे. पुराणांमध्ये प्रदक्षिणेची महती आपल्या सर्वांना माहिती असलेल्या श्री गणेशाच्या कथेतून कळते. जेव्हा भगवान शंकर आणि माता पार्वतींनी आपल्या दोन मुलांमध्ये पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा घोषित केली तेव्हा श्री गणेशाचे बंधू श्री कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेसाठी त्वरित निघाले. पण श्री गणेशांनी विचार केला की आपलं विश्व म्हणजे कैलास पर्वतावर बसलेले आपले मातापिताच आहेत आणि हा विचार करून त्यांनी आपल्या मातापितां भोवती म्हणजेच कैलाश पर्वतालाच प्रदक्षिणा घातली. श्री गणेशाच्या ह्या कृतीमुळे त्यांनी अर्थातच प्रदक्षिणा आपल्या बंधूच्या आधीच पूर्ण केली. शिव आणि पार्वती श्री गणेशावर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्री गणेशाला विजेता म्हणून घोषित केलं. ह्या गोष्टीतून प्रदक्षिणेचं आणि मुख्यतः गिरिप्रदक्षिणेचं महत्व प्रदर्शित होतं.

विशेषतः प्रदक्षिणा ही अनवाणी केली जाते. साधारणतः पर्वताभोवतीची प्रदक्षिणा ही पर्वत उजवीकडे धरून म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या फिरण्याच्या दिशेने केली जाते.

श्री रमण महर्षींनी प्रदक्षिणेचा अर्थ फार छान सांगितला आहे. “प्र” हे अक्षर सर्व प्रकारच्या पापांचं क्षालन दर्शवतं, “” अक्षर सर्व कामनापूर्ती दर्शवतं, “क्षि” अक्षर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती दर्शवतं, तर “णा” हे अक्षर ज्ञानप्राप्ती होऊन मोक्षसिद्धी दर्शवतं.

श्री रमण महर्षींच्या मते प्रदक्षिणेचे फायदे किंवा फळं अशी आहेत - प्रदक्षिणेच्या दिशेनं एक पाऊल चाललं की मनुष्याला जगातल्या सर्व आनंदांची प्राप्ती होते, दोन पाऊलं चालली की स्वर्गातल्या आनंदाची प्राप्ती होते, आणि तीन पाऊलं चालली की सत्यलोकातील आनंदाची प्राप्ती होते.

पुराणांमध्ये असं नमूद केलं आहे की दक्षिण भारतातल्या काही शंकराच्या देवळांभोवती प्रदक्षिणा घातल्यास अश्वमेध यज्ञ केल्यावर मिळणाऱ्या फळांपेक्षाही अधिक फळं मिळतात.

प्रदक्षिणा घालताना मौन व्रत पाळून ध्यान किंवा नामस्मरण करावं किंवा भजन करावं. त्यामुळे सतत परमेश्वराचं स्मरण राहतं. असं म्हणतात की नववा महिना लागलेल्या गर्भवती स्त्रीच्या चालण्याच्या वेगाने प्रदक्षिणा घालावी.

गिरीप्रदक्षिणा घालण्याची काही प्रसिद्ध ठिकाणं अशी - गुजरात मधील गिरनार पर्वत, तिरुवन्नमलै मधील अरुणाचल पर्वत, महाराष्ट्रामधील हरिहरेश्वर, गणपतीपुळे, आंध्र प्रदेश मधील श्री शैलम आणि तामिळनाडू मधील पक्षीतीर्थ (तिरुक्कळूकुंद्रम). 


No comments:

Post a Comment