साईबाबांची अकरा वचने म्हणजे एक आध्यात्मिक प्रवास आहे. संस्कारक्षम आणि अध्यात्ममार्गामध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्या मुमुक्षु जीवांचे एका अनन्य भक्तामध्ये रुपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे साईबाबांची अकरा वचने. ही प्रक्रिया सुरु होते शिर्डीची वाट धरल्याने आणि या वाटेवरच्या प्रवासामधील अकरा टप्पे, अकरा स्थित्यंतरं, अकरा अवस्था म्हणजे बाबांची अकरा वचने.
पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि प्रत्यक्षात इंद्रिय नसले तरी या दहा इंद्रियांवर अधिसत्ता गाजविणारे अकरावे अंतःकरण.
वचन पहिले :-
शिर्डीस ज्याचे लागतील पाय | टळती अपाय सर्व त्याचे || १ ||
मुळात ज्यांचे शिर्डीला पाय लागतील ही शब्दरचना का? तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर भगवंताच्या चरणांचे दर्शन घेण्याचा उल्लेख बरोबर वाटतो. भगवंताचे पाय महत्वाचे, आपले नाहीत. आपण एवढे पुण्यवंत, भगवंतही नाही की आपल्याच पायांनी हा चमत्कार घडावा. मुळात शिर्डी काय आहे? बाबा काय केवळ शिर्डीतच आहेत? या विश्वाची माउली फक्त शिर्डीगावापुरता संकुचित विचार करू शकेल काय? म्हणजेच शिर्डी नावाचे मूळ शोधणे आवश्यक ठरते. शिर्डीचे मूळ नाव आहे शीलधि वा शीलधी.
शीलधि: - शील + धि: - धि म्हणजे आशय, साठा
शीलधि - शिलांचा साठा अर्थात शीलवाला, शीलवंत
शीलधी - शील + धी(बुद्धी, मन, विचार, कल्पना)
शीलधी - शील + बुद्धी
धी - सत् असत् विवेक बुद्धि, सरसर विवेक
शिरडी नावामध्ये शील, साठा, बुद्धि हे तीन मूळ घटक आढळतात.
ज्याचे शील शाबूत आहे, बुद्धी स्थिर आहे, आत्मनाआत्म विवेक जागृत आहे आणि जो शीलाचा साठा आहे, तोच शिर्डीची वाट चालण्याचा अधिकारी आहे.
* भक्ताला भगवंताकडे घेऊन जाणारी कडी हीच साईनाथांची शिर्डी *.
साईभक्तीचे हे pre-qualification आहे. "लागतील पाय" पाय लागणे म्हणजे त्या मार्गावर चालणे. शिर्डीची वाटचाल करणे म्हणजे दोन दिवसाचे कपडे घेऊन उठसुठ शिर्डीला पळणे नव्हे. शिर्डीला गेले अन् शिर्डीच्या भूमीला आपले पाय लागले की आपले अपाय दूर होतात एवढा साधा सरळ अर्थ या वचनाचा नाही. भगवंत एवढा स्वस्त आणि सहजप्राय नाही. शिर्डीची वाट धरण्याची योग्यता अगोदर अंगी आणावी लागते. केवळ शिर्डीला हा देह नेल्याने अपाय टळले असते तर आज भरताच्या काना कोपऱ्यातून देशभरातून हजारो गाड्या शिर्डीला येतात. त्यातून कोणी येवो न येवो, दोन व्यक्ती हमखास येतात. एक ड्रायव्हर आणि दुसरा कंडक्टर. अगदी न चुकता दोघे शिर्डीला जातात. मग त्यांचे सर्व अपाय टळतात का? साईचरिताच्या १३व्या अध्यायातील ओवी येथे लिहाविसी वाटते. "पाप ज्यांचे विलयाला गेले | ऐसे जे पुण्यात्मे वहिले | तेची माझे भजनी लागले | खुण लाधले ते माझी ||". साई भगवंताची भक्ती करण्याची ओढ, आस लागणे म्हणजेच शिर्डीस पाय लागणे, शिर्डीच्या मार्गाला पाय वळणे. मुळात शिर्डी कोठे आहे हा प्रश्न पडला पाहिजे. बाबांनी याचे उत्तर साई चरितामध्ये दिले आहे. "हा सच्चरित मार्ग धोपट | जेथे जेथे याचा पाठ | तेथेच द्वारकामाईचा मठ | साई ही प्रकट निश्चये ||२१८|| तेथेच गोदावरीचे तट | तेथेंच शिर्डी क्षेत्र निकट | तेथेच साई धुनिसकट | स्मरतां संकट निवारी || २१९ ||. साई सत्चरित ही एक उपासना, आराधना आहे आणि जेथे साई सत्चरिताचा पाठ, साई भक्तीपाठ चालतो तेथेच "द्वारका माईचा मठ" अर्थात शिर्डी आहे. साई भगवंत तेथे निश्चितपणे प्रकट होतात. हजर असतात. तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डीक्षेत्र आहे, आणि तेथेच साई भगवंताचे स्मरण केल्यास संकटाचे निवारण साई भगवंत करतात, म्हणजेच "टळती अपाय सर्व त्याचे". येथे टळती अपाय म्हटले आहे. भगवंत साईनाथ टाळतात म्हणून संकटे टळतात. आता प्रश्न पडतो की, पूर्वायुष्य दुषित असेल तर? शिर्डीच्या वाटेवर, भक्तिमार्गावर चालणे म्हणजे शुद्ध झाल्यातच जमा. चारित्र्यवान, शीलवान, मुमुक्षु जीवांचा प्रवास स्वतःच्या पायाने येथून सुरु होतो.
|| ॐ साई राम ||
No comments:
Post a Comment