हे मंदिर कुंभकोणमच्या मध्यवर्ती भागात स्थित आहे. ह्या मंदिराला कुडंथै कीळ कोट्टम (कुडंथै म्हणजे कुंभकोणम, कीळ म्हणजे पूर्व आणि कोट्टम म्हणजे मंदिर) असं नाव आहे. चिदंबरम-मयीलादुथूराई मार्गावर मयीलादुथूराईपासून ३५ किलोमीटर्स वर तर कुंभकोणम रेल्वे स्टेशन पासून २ किलोमीटर्स वर हे मंदिर आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावरील पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. शैव संत अप्पर आणि अरुणागिरिनाथर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. ह्या मंदिराचे दगडी बांधकाम आदित्य चोळा I ह्या राजाच्या कारकिर्दीमध्ये झाले. इथे साधारण ५४ शिलालेख आहेत ज्यामध्ये चोळा आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी मंदिरासाठी केलेल्या कामाचे तसेच त्यांनी दिलेल्या देणग्यांचे उल्लेख आहेत. हे राहू दोषांचे परिहार स्थळ आहे. महामाघम उत्सवाशी निगडित असलेल्या मंदिरांमधलं हे तिसरं मंदिर आहे. ह्या मंदिराला कुथंडावर कोविल तसेच सूर्यकोट्टम असं पण म्हणतात. प्रलयाच्या काळी ह्या ठिकाणी प्रलयात वाहून आलेल्या कलशातील बिल्व पत्रे पडली आणि त्यांचे रूपांतर शिव लिंगामध्ये झाले. म्हणून इथे भगवान शिवांना श्री विल्ववनेश्वरर असे नाव आहे.
मूलवर: श्री नागेश्वर स्वामी, श्री नागनाथर, श्री विल्ववनेश्वरर, श्री पाताळबीजनाथर, श्री मदंथैनाथर
देवी: श्री पेरियानायकी, श्री बृहन्नायकी
क्षेत्र वृक्ष: बिल्व
क्षेत्र तीर्थ: महामागम तलाव, सिंग-मुख-तीर्थम, सूर्य तीर्थ, नाग तीर्थ
पुराणिक नाव: थिरुकुडंथै कीळ कोट्टम
क्षेत्र पुराण:
१. एकदा प्रलयाच्या आधी ब्रह्मदेवांना “जर सृष्टीनिर्मितीची सर्व बीजे नाश पावली तर परत सृष्टीनिर्मिती कशी करायची” हा प्रश्न पडला. ह्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर मिळविण्यासाठी त्यांनी सृष्टिसंहारक भगवान शिवांकडे धाव घेतली. भगवान शिवांनी त्यांना सृष्टीनिर्मितीची बीजे कशी जपायची आणि प्रलयानंतर परत सृष्टीनिर्मिती कशी करायची ह्याबद्दल ज्ञान प्रदान केलं. त्यांनी ब्रह्मदेवांना अमृत आणि माती ह्यांचं मिश्रण करून त्यापासून एक कलश निर्मायला सांगितलं. आणि त्यामध्ये अमृत आणि सृष्टीनिर्मितीला आवश्यक सर्व बीजे कलशामध्ये पेरायला सांगितली. त्या कलशाच्या चारी बाजूंना वेद, पुराणे, आगमशास्त्रे पसरायला सांगितली. त्या कलशाच्या तोंडाशी पांच आंब्याची पाने ठेवून त्या वरती नारळ ठेवण्यास सांगितले जेणेकरून त्याला कलशाचा आकार येईल. तसेच तो कलश बंद करण्याआधी त्या कलशाला एक यज्ञोपवीत (जानवे) गुंडाळण्यास सांगितले. त्या तयार झालेल्या कलशाला भगवान शिवांनी मेरुपर्वताच्या शिखरावर जेथे ब्रह्मदेवांचे वसतिस्थान आहे तिथे ठेवावयास सांगितले आणि त्याला दर्भाच्या दोरीने छतास टांगावयास सांगितले. त्यानंतर त्यांनी त्या कलशाची बिल्वपत्र आणि फुलांनीं पूजा करण्यास सांगितले. आणि त्या कलशावर अमृताचा शिडकाव करून पवित्र करण्यास सांगितले. भगवान शिव म्हणाले कि प्रलयाच्या वेळेस हा कलश वाहत जाऊन एका स्थळी थांबेल. आणि मग भगवान शिव स्वतः किरटमूर्तींच्या (शिकारी) रूपात येऊन तो कलश फोडतील जेणेकरून ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती परत चालू करू शकतील.
ब्रह्मदेवांनी भगवान शिवांच्या सर्व सूचनांची अचूक अंमलबजावणी केली. पुढे जेव्हा प्रलय आला त्यावेळी निसर्गाच्या कोपाची पराकाष्ठा झाल्याने सगळीकडे अंदाधुंदी माजली. मेरू पर्वत पण प्रलयामध्ये बुडून गेला. तो कलश वाहत वाहत दक्षिणेकडे जाऊ लागला आणि एका स्थळी जाऊन थांबला. जसजसं प्रलयाचे पाणी ओसरायला लागले कलशाच्या भोवतीचे दर्भ, आंब्याची पाने, बिल्व पत्रे हे कलशापासून अलग झाले. ज्या ठिकाणी बिल्व पत्रे पडली त्या ठिकाणी बिल्व वन तयार झाले. ह्या ठिकाणी मंदिर बांधले गेले ज्याचे नाव नागेश्वर मंदिर असे पडले. इथे भगवान शिवांना श्री विल्ववनेश्वरर, पाताळबीजनाथर, सेल्वपिरन आणि मदंथैनाथर असे संबोधले जाते.
२. पुराणांनुसार सर्पांचा राजा आदिशेष पृथ्वी आपल्या शिरावर धारण करतात. पृथ्वीवर वाढलेल्या पापांमुळे पृथ्वीचे वजन वाढले आणि ते आदिशेषांना धारण करणं कठीण झालं. त्यांनी भगवान शिवांना हे वजन पेलण्यासाठी अजून शक्ती प्राप्त व्हावी म्हणून प्रार्थना केली. भगवान शिवांनी त्यांची प्रार्थना मान्य केली आणि त्यांना एका ऐवजी हजार शिरे प्रदान केली. महाप्रलयाच्या काळी जिथे बिल्व पत्रे पडली त्या ठिकाणी आदिशेष आले आणि त्यांनी इथे शिव लिंगाची स्थापना करून त्याची उपासना केली. इथे नागराजांनी भगवान शिवांची उपासना केली म्हणून त्यांना इथे नागेश्वरर असं संबोधलं जातं.
३. स्थळपुराणानुसार श्री सूर्यदेवांची प्रभा त्यांना मिळालेल्या शापामुळे लोप पावली. सूर्यदेव इथे आले आणि त्यांनी इथे सूर्यतीर्थ निर्माण केलं आणि भगवान शिवांची उपासना केली. त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी सूर्यदेवांना त्यांची लोप पावलेली प्रभा परत मिळवून दिली.
४. राजेंद्र चोळा राजाने उत्तरेतल्या एका युद्धातल्या विजयाची निशाणी म्हणून श्री गणेशांची मूर्ती आणली आणि ती इथल्या गाभाऱ्याच्या समोरच्या मंडपामध्ये स्थापन केली. ह्या मूर्तीचे नाव गंगै-विनायकर असे आहे.
५. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे कि सर्पांचा राजा राहूने भगवान शिवांची रात्रीच्या चार प्रहरांमध्ये चार ठिकाणी पूजा केली. ती चार ठिकाणं अशी आहेत - थिरुकुडंथै कीळ कोट्टम (विल्ववनम), थिरुनागेश्वरम नागनाथस्वामी (हीबीस्कस वनम, मराठी मध्ये जास्वंद), थिरुपमपूरम येथील नागेश्वर स्वामी (शमी वनम), नागपट्टीनं येथील नागनाथर (पुन्नाग वनम).
६. शिव भक्त पदकाचेरी रामलिंग स्वामीगळ ह्यांनी मोडकळीस आलेल्या ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी खूप कष्ट सहन केले. १९२३ मध्ये त्यांनी प्राणप्रतिष्ठा केली. ह्यासाठी धनदान प्राप्त करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मानेला एक भांडं बांधून लोकांना भेटले.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
आदिशेष, सूर्यदेव, नळ राजा, दक्ष आणि कर्कोटग हे साप.
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. प्रलयाच्या काली जेव्हा कलशातील बिलपत्रे इथे पडली, त्यातून इथे स्वयंभू शिव लिंग आणि बिल्ववन तयार झाले.
२. ह्या मंदिराला कुडंथै कीळ कोट्टम (कुडंथै म्हणजे कुंभकोणम, कीळ म्हणजे पूर्व आणि कोट्टम म्हणजे मंदिर) असं म्हणतात.
३. हे मंदिर स्थापत्य शास्त्र, इमारत तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्र ह्यांचा चमत्कार आहे.
४. महामाघम उत्सवांमध्ये भाग घेणाऱ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.
५. काही पुराणांनुसार कुंभकोणम हे काशीपेक्षाही पवित्र स्थळ आहे.
६. इथे श्री सूर्यदेवांनी उपासना केली म्हणून ह्या स्थळाला भास्करक्षेत्र असे नाव आहे.
७. नटराज सभेला पेरमबलम असं म्हणलं जातं. ही सभा रथाच्या आकाराची आहे. त्याला सुंदर दगडी चाके आहेत, आणि रथ ओढण्यासाठी दोन घोडे आणि चार हत्ती आहेत. चाकांना १२ आरे आहेत जे १२ राशींची प्रतीके आहेत.
८. जे कोणी एका दिवसात सकाळी नागेश्वरम, दुपारी १२ वाजता थिरु नागेश्वरम, संध्याकाळी थिरुपमपूरम आणि रात्री नागपट्टीनं येथील नागनाथर ह्यांचे दर्शन घेतील त्यांच्या सर्प दोषांचा परिहार होईल असा समज आहे.
९. चित्राई ह्या तामिळ महिन्याच्या ११व्या, १२व्या आणि १३व्या दिवशी सकाळी ६ वाजता सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
१०. श्री महालक्ष्मी आणि श्री अग्निवीरभद्र (ऊर्ध्व तांडव मूर्ती) हे एकमेकांच्या समोर आहेत.
११. श्री प्रळयकाळरुद्र ह्यांचे देवालय फक्त इथेच बघायला मिळते.
१२. श्री नटराजांच्या नृत्यावर श्री शिवकामिनी तालवाद्य वाजवत आहेत आणि भगवान विष्णू बासरी वाजवत आहेत असं अलौकिक दृश्य इथे चित्रित केलं आहे. म्हणून श्री नटराजांना इथे आनंदकुथर असं म्हणलं जातं.
मंदिराबद्दल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर असून ह्याला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि ह्या मंदिरात दोन परिक्रमा आहेत. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला गोपुरे आहेत. शिव लिंग हे स्वयंभू लिंग आहे जे प्रलयाच्या काळी कलशातून पडलेल्या बिल्व पत्रांमधून निर्माण झालं.
जेव्हां आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा डाव्या बाजूला आपल्याला नंदनवन आणि सिंग-मुख-तीर्थ दिसतं. उजव्या बाजूला श्री पेरियानायकी आणि श्री नटराज ह्यांच्या मूर्ती आहेत. श्री नटराज मंडप रथाच्या आकाराचा आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशाजवळ नेहमीप्रमाणे नंदि, बलीपीठ आणि ध्वजस्तंभ आहेत. भगवान शिवांचे देवालय पूर्वाभिमुख आहे. स्वयंभू लिंग पायाशी खूप रुंद आहे आणि ह्या लिंगाचा बाण म्हणजेच लिंगाचा दंडगोलाकार भागाचा व्यास छोटा आहे.
कोष्टामध्ये श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती आहेत. एका छोट्या देवालयामध्ये श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती आहे.
श्री अंबिकादेवींचे देवालय: श्री अंबिका एका स्वतंत्र दक्षिणाभिमुख देवालयामध्ये आहेत. हे देवालय राजगोपुराच्या उजव्या बाजूला श्री नटराजांच्या देवालयाच्या बाहेरील परिक्रमेमध्ये आहे. त्यांच्या देवालयामध्ये गाभारा, अर्थमंडप आणि विमान आहे.
कुंभकोणम मधील दारासुरम आणि श्री शारंगपाणी मंदिरांप्रमाणेच ह्या मंदिरामध्ये पण नटराज सभा रथाच्या आकाराची आहे. हा रथ अशा तऱ्हेने बांधला आहे कि तो रथ २ अश्व आणि ४ हत्ती ओढत आहेत असं दृश्य आहे. ह्या रथाच्या चाकाची १२ आरे हि १२ राशींची प्रतीके आहेत. श्री नटराजांना श्री आनंदकूदंथवर असं पण नाव आहे. ह्या देवालयामध्ये अशी मूर्ती आहे ज्यामध्ये श्री नटराजांच्या नृत्यावर श्री शिवकामी टाळ्या वाजवत आहेत तर भगवान विष्णू बासरी वाजवत आहेत.
श्री गंगै विनायकर देवालय: चोळा राजा राजेंद्रन ह्याने हिमालयावर मोहीम काढली होती. ह्या मोहिमेच्या विजयाची निशाणी म्हणून सैन्याने एक सुंदर श्री गणेशांची मूर्ती आणला आणि तिची इथे प्राणप्रतिष्ठा केली. ह्या देवालयाला श्री गंगै विनायकर असे नाव आहे.
परिक्रमेमध्ये आपल्याला सप्त-विडंग बघावयास मिळतात. श्री राहूंचे स्वतंत्र देवालय आहे. तसेच श्री रुद्राचे स्वतंत्र देवालय आहे ज्यामध्ये रुद्रांचे नाव प्रलयकाळ रुद्र असे आहे.
आवारातील इतर देवालये आणि मूर्ती: श्री विनायकर, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री मुरुगन, श्री ज्वरहर विनायकर, श्री सोमस्कंद, सप्त मातृका, श्री वलंचुळी विनायकर (ह्यांची सोंड उजवीकडे वळलेली आहे), श्री महाकाली, श्री अग्नीवीरभद्र, श्री विष्णू-दुर्गा, श्री पदैवेत्ति मरिअम्मन, श्री सूर्य, श्री गजलक्ष्मी, श्री आदिशेष (सर्पांचा राजा), श्री ऐयनार. श्री महाकाली आणि श्री अग्नीवीरभद्र (ऊर्ध्व तांडव मूर्ती) हे एकमेकांसमोर आपापल्या स्वतंत्र देवालयांमध्ये आहेत. ह्या दोन मूर्ती अशा पद्धतीने बनवल्या आहेत कि असं वाटतं की हे दोघे एकमेकांशी नृत्यामध्ये स्पर्धा करत आहेत. ह्या मूर्तींचे चेहरे भय निर्माण करणारे आहेत.
परिक्रमेमध्ये श्री ऐयनार, सप्त मातृका, सप्त-लिंग, नवग्रह, सप्त-विडंग क्षेत्रांची प्रतीके असलेली शिवलिंगे.
प्रार्थना:
भाविक जन इथे पुढील कारणांसाठी प्रार्थना करतात
१. राहुदोषांचा परिहार (ह्यासाठी राहुकाळ किंवा रोज दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान पूजा केली जाते).
२. विभक्त झालेल्या दाम्पत्यांचे पुनर्मीलन व्हावे म्हणून.
३. विवाहातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून.
४. अपत्यप्राप्तीसाठी.
५. ज्वरापासून मुक्ती मिळविण्यासाठी श्री ज्वरहर विनायकांची पूजा केली जाते.
पूजा:
दैनंदिन पूजा, प्रदोष पूजा, तसेच विशेष पूजा नियमित केल्या जातात.
मंदिरात साजरे होणारे सण:
बाकी सर्व मंदिरांमध्ये साजरे होणारे सण इथे पण साजरे केले जातात.
काही महत्वाचे सण:
मासी (फेब्रुवारी-मार्च): महामाघम उत्सव, मासी ब्रह्मोत्सवम
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवदीरै
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२.३०, दुपारी ४.३० ते रात्री ९
मंदिराचा पत्ता: श्री नागेश्वरर स्वामी मंदिर, कुंभकोणम (किळकोट्टम), तामिळनाडू ६१२००१
दूरध्वनी: +९१-४३५२४३०३८६
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment