हे मंदिर उरैयूर ह्या त्रिचीच्या उपनगरात वसले आहे. शैव संतांनी ज्या मंदिरांची स्तुती गायली आहे त्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. शैवसंत श्री अप्पर आणि श्री संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधी अस्तित्वात असावे. पांड्या राजा वरगुण II ह्याने ह्या मंदिराची पुनर्निर्मिती केली असा समज आहे. आणि चोळा, विजयनगर आणि नाट्टूकोट्टै चेट्टियार राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि विस्तार केला असा समज आहे. इथल्या शिलालेखांमध्ये विविध राजांनी दिलेल्या देणग्यांचा उल्लेख आहे. अगदी अलीकडे म्हणजे २००२ मध्ये ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. पूर्वी ह्या स्थळाचे नाव मुक्कीचरम असे होते. चेरा, चोळा आणि पांड्या राजांनी येथे भगवान शिवांची उपासना केली. ही जागा पूर्वी त्रिची शहराचा भाग होता आणि चोळा साम्राज्याची राजधानी होती. प्राचीन शहर वादळामध्ये नष्ट झाले असा समज आहे.
मुलवर: श्री पंचवर्णेश्वरर, श्री थानथोंड्रीनाथर
देवी: श्री कांथीमती अम्माई, श्री वलयकप्पूनायकी
पवित्र तीर्थ: शिव तीर्थ, नाग तीर्थ
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पौराणिक नाव: मुक्कीचरम
वर्तमान नाव: उरैयूर
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार श्री ब्रम्हदेव ह्या ठिकाणी आले आणि त्यांनी भगवान शिवांची पूजा केली. त्यांच्या पूजेवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी श्री ब्रह्मदेवांना पांच रंगांमध्ये दर्शन दिले ते रंग असे - सोनेरी पिवळा, पांढरा, लाल, काळा राखी आणि धुरकट राखी. भगवान शिवांनी सांगितलं की ते पंचमहाभुतांमध्ये समाविष्ट असतात आणि ते असे प्रकट होतात - सोनेरी पिवळा (पृथ्वी), पांढरा (जल), लाल (अग्नी), काळा राखी (वायू), धुरकट राखी (आकाश). तसेच ते पांच ठिकाणी प्रकट झाले - जल रूपात थिरुवईन्नईकवळ येथे, पृथ्वीरूपात कांची येथे, अग्निरूपात थिरुवन्नमलै येथे, वायुरूपात कालहस्ती येथे आणि आकाश रूपात चिदंबरम येथे. ह्या ठिकाणी भगवान शिव सर्व रूपात आहेत म्हणून इथे भगवान शिवाचे नाव पंचवर्णेश्वरर असे आहे आणि ह्या स्थळाचे नाव उरैयूर (तामिळ मध्ये उरै म्हणजे राहणे, युर म्हणजे गाव किंवा एखादी जागा).
२. पुराणांनुसार उत्तंग ऋषी हे वेद, आगम आणि पुराणांमध्ये पारंगत होते. एकदा ते प्रयाग येथे गंगा नदी मध्ये आपल्या पत्नीसमवेत स्नान करत होते. त्यावेळी एका मगरीने त्यांच्या पत्नीला पाण्यात ओढले आणि मारले. ह्यामुळे घटनेमुळे ऋषींचे मनःस्वास्थ्य बिघडले. मनःशांती मिळविण्यासाठी ते उरैयूरला आले आणि त्यांनी भगवान शिवांची उपासना केली. भगवान शिवांनी त्यांना पांच रत्नांच्या लिंगामध्ये दर्शन दिले - सकाळच्या पूजेसमयी रत्नलिंग रूपात, माध्यान्ह पूजेसमयी स्फटिक लिंग रूपात, संध्याकाळच्या पूजेसमयी स्वर्णलिंग रूपात, रात्रीच्या पहिल्या प्रहरसमयी हिऱ्याच्या लिंगाच्या रूपात आणि अर्धजाम पूजेसमयी चित्रलिंग रूपात. म्हणून इथे भगवान शिवांना पंचवर्णेश्वरर असे नाव आहे. ह्या दर्शनाने उत्तंग ऋषींना परत मनःस्वास्थ्य लाभले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि शेवटी मुक्ती प्राप्त झाली.
३. ह्या ठिकाणी श्री शनैश्वरर, श्री भैरवर आणि श्री सूर्य एकाच देवालयामध्ये आहेत. म्हणून हे स्थळ ग्रहदोषांचे परिहारस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
४. ह्या ठिकाणी श्री पार्वतीदेवी श्री कांथीमती रूपात तर श्री विनायकर श्री पंचमुखी विनायकर रूपात भक्तांवर कृपावर्षाव करतात.
५. पुराणानुसार वीर आदित्यन नावाचा राजा (काही जणांच्या मते चोळा राजा कारिकलन) ह्या प्रदेशातून हत्तीवर प्रवास करत होता. एका जागेमध्ये त्या हत्तीचा तोल गेला आणि तो बेभान झाला. राजा आणि माहूत दोघांनाही तो हत्ती आवरेना. त्यावेळी अचानक एक कावळा आला आणि तो हत्तीच्या डोक्यावर बसला आणि त्याने आपल्या चोचीने हत्तीच्या डोक्यावर डंख मारायला चालू केलं. ह्या कृतीने हत्ती भानावर येऊन मूळ स्तिथीत आला. त्यानंतर तो कावळा एका बिल्व वृक्षामध्ये जाऊन अदृश्य झाला. राजा अचंबित झाला आणि त्याने आपल्या सेवकांना त्या बिल्व वृक्षाच्या जवळ खणायला सांगितले. त्यांना तिथे एक शिव लिंग सापडले. त्यानंतर राजाने इथे शिव मंदिर बांधले.
६. अजून एका आख्यायिकेनुसार इथल्या स्थानिक राजाने बघितले कि नागराजाच्या पांच कन्या शिव लिंगांची पूजा करत आहेत. त्याने त्या पांच कन्यांपैकी सर्वात लहान कन्येशी विवाहाची मागणी केली आणि नागराजाला शिव लिंग देण्याची पण विनंती केली. नागराजाने शिवलिंगांपैकी अर्धी शिव लिंगे त्याच्या सर्वात लहान कन्येला दिली. त्या कन्येने उरलेली शिव लिंगे पण आपल्या बहिणींकडून घेतली आणि ती सर्व शिव लिंगे बिल्व वृक्षाच्या खाली एका शिव लिंगामध्ये विलीन झाली. त्यानंतर त्या जागी मंदिर बांधले गेले. म्हणून इथे भगवान शिवांचे नाव श्री पंचवर्णेश्वरर आहे.
७. अजून एका आख्यायिकेनुसार इथल्या स्थानिक राजाची पत्नी शिव भक्त होती. ती दररोज त्रिची मधल्या श्री थायूमानवर यांची पूजा करायची. काही काळाने ती गर्भवती झाली. आणि गर्भधारणेच्या प्रगत टप्प्यामध्ये ती मंदिरात जाऊ शकली नाही. ह्यामुळे तिला खूप रडू आलं आणि तिने भगवान शिवांची म्हणजेच श्री थायूमानवर ह्यांची मनोमन प्रार्थना केली. श्री थायूमानवर तिच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला उरैयूर इथेच ते जसे त्रिची मंदिरात आहेत त्याच रूपात दर्शन दिले. म्हणून इथे भगवान शिवांना श्री थानथोंड्रीश्वरर आणि श्री पार्वतीदेवींना श्री वलैकप्पूनायकी अशी नावे आहेत.
८. अजून एका आख्यायिकेनुसार इथे एक नास्तिक माणूस होता. त्याने एकदा मंदिरात प्रसाद म्हणून दिलेली विभूती नाकारली. त्यामुळे त्याला पुढचा जन्म डुक्कराचा प्राप्त झाला. डुक्कराच्या जन्मात त्याला अत्यंत अस्वच्छ, चिखल असलेल्या जागेत राहावे लागले. त्याला जाणीव झाली कि हि त्याची परिस्थिती आधीच्या जन्मात केलेल्या पापामुळे म्हणजेच मंदिरातली प्रसाद म्हणून दिलेली विभूती नाकारल्यामुळे आहे. तो ह्या मंदिरात आला आणि त्याने इथल्या पवित्र तीर्थामध्ये स्नान केले. पवित्र स्नान करून बाहेर येताच त्याच्या पूर्व पापाचे क्षालन आले. त्यानंतर त्याने इथे राहून भगवान शिवांची पूजा केली.
९. सातव्या शतकातल्या शैव संत संबंधर यांनी दैवी स्तोत्रांची रचना केली ज्याला थेवरं असं म्हणतात. त्या मध्ये संबंधर ह्यांनी ह्या स्थळाची स्तुती मुक्तिश्वरम (मुक्तीचरम) अशी केली आहे.
१०. हे चोळा साम्राज्याचा राजा कोचेंगट चोळा नायनार आणि शैवसंत पुगळ चोळा नायनार ह्यांचे जन्मस्थान आहे. राजा कोचेंगट चोळा नायनार ह्यांना इथे भगवान शिवांच्या पदकमळी मुक्ती प्राप्त झाली.
११. वैष्णव संत थिरुपनळवार ह्यांचे पण हे जन्मस्थान आहे.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
गरुड, कर्कोटक, श्री ब्रम्हदेव, भगवान विष्णू, स्त्री ऋषी कथिरु (काश्यप ऋषींची पत्नी).
वैशिष्ट्ये:
१. येथील शिव लिंगाचा रंग पूजे समयी पांच रंगांमध्ये बदलतो.
२. इथे खूप सुंदर शिल्पे आहेत.
३. चंडिकेश्वरांची मूर्ती ४ फूट उंच आहे आणि ह्या मंदिरातली ती सर्वात उंच मूर्ती आहे.
४. इथे कोष्टामध्ये लिंगोद्भवर मूर्तीच्या ऐवजी अर्धनारीश्वरर ह्यांची मूर्ती आहे.
५. श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
६. इथे श्री आंजनेयांना तीन नेत्र आहेत. म्हणून इथे त्यांचे नाव रुद्र आंजनेय असे आहे.
७. इथल्या नवग्रह संनिधीमध्ये प्रत्येक ग्रह आपल्या पत्नीसमवेत आहे.
८. असा समज आहे कि विश्वातल्या कुठल्याही मंदिरात शिव पूजा होते ती पूजा ह्या मंदिरात पोचते. म्हणून ह्या स्थळाला उरैयूर असं नाव आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. ह्या मंदिराला पांच स्तरांचं राजगोपुर आहे आणि तीन परिक्रमा आहेत. मंदिरात गाभारा, अर्थमंडप आणि महामंडप आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशावर तीन स्तरांचं राजगोपुर आहे. नंदी मंडपामध्ये श्री नंदिदेव आहेत. राजगोपुराच्या आधी बलीपीठ आणि नंदि आहेत. राजगोपुराच्या पुढे ध्वजस्तंभ, अजून एक बलीपीठ आणि अजून एक नंदि आहेत. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरचे द्वारपाल आठ फूट उंची असलेले आणि खूप सुंदर आहेत. हे आठव्या शतकातील पांड्या राजांशी निगडित असावे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे. ते छोटे आहे आणि ग्रॅनाईटचे आहे. जेव्हा इथे श्री ब्रम्हदेवांनी भगवान शिवांची पूजा केली त्यावेळी त्यांनी श्री ब्रम्हदेवांना पांच रंगांमध्ये दर्शन दिले - सोनेरी पिवळा, पांढरा, लाल, काळा राखी आणि धुरकट राखी. म्हणून इथे भगवान शिवांना श्री पंचवर्णेश्वरर असं नाव आहे. इथल्या प्रत्येक पूजे मध्ये शिव लिंगाचा रंग बदलतो. उत्तंग ऋषींनी पण जेव्हां पूजा केली त्यावेळी भगवान शिव पांच रंगांमध्ये प्रकट झाले.
कोष्टामध्ये श्री गणेश, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवरांच्या ऐवजी श्री अर्धनारीश्वरर, श्री ब्रह्मदेव आणि श्री दुर्गादेवी ह्यांच्या मूर्ती आहेत.
श्री चंडिकेश्वरर ह्यांची मूर्ती उत्तरेला आहे आणि ती चार फूट उंच आहे. हि ग्रॅनाइटची मूर्ती मंदिरातली सर्वात उंच मूर्ती आहे. इथल्या मंडपातल्या स्तंभांवर श्री गणेशांची विविध रूपे, तांडव नृत्य करत असलेले भगवान शिव आणि श्री कालीदेवी ह्यांची शिल्पे आहेत. परिक्रमेमध्ये श्री चंडिकेश्वरर, उत्तंग ऋषी, पुगळ चोळा नायनार, ६३ नायनमार सनातन कुरुवरांसमवेत, श्री कर्पग विनायकर, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री गजलक्ष्मीदेवी, श्री भैरवर, शैवसंत नालवर, उच्छिष्ट गणपती, नाग, श्री थानथोंड्रीश्वरर, भगवान विष्णू, श्री सूर्य, श्री काळभैरवर आणि श्री शनैश्वरर ह्यांच्या मूर्ती आहेत. महामंडपामध्ये श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र देवालय आहे जे उत्तराभिमुख आहे. त्यांनी आपल्या हातामध्ये अंकुश धारण केला आहे. ह्या देवालयाजवळ भगवान महाविष्णू, सूर्य, शनैश्वरर आणि काळभैरवर ह्यांच्या मूर्ती आहेत.
गाभाऱ्याच्या वाटेवरच्या मंडपामध्ये श्री विनायकर, श्री नंदि आणि नवग्रह ह्यांच्या ग्रॅनाइटच्या मूर्ती आहेत. ह्या मंडपाच्या स्तंभांवर येथील स्थळपुराणे चित्रित केली आहेत. १) जेव्हा चोळा राजा वीर आदित्यन ह्याचा हत्ती बेभान झाला त्यावेळी अचानक एक कावळा आला आणि त्याने हत्तीला परत भानावर आणले. ज्या जागेत हे मंदिर आहे त्या जागेला कोळीयुर (तामिळ मध्ये कोळी म्हणजे कावळा) असे नाव आहे. आणि म्हणून इथे भगवान शिवांना श्री कोळीश्वरर असे नाव आहे. ह्या शिवाय ह्या स्तंभांवर अजून पण वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर शिल्पे आहेत ती अशी १) एक शिल्प असे आहे कि ज्यामध्ये एका बाजूने बघितले तर पांच स्त्रिया दिसतात पण दुसऱ्या बाजूने बघितले तर अश्व दिसतो. २) एका शिल्पामध्ये सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन हत्तीचा आकार केला आहे ३) हत्तीवर मन्मद असून त्याच्या हातात धनुष्य बाण आहेत ४) श्री कालीदेवी नृत्य करीत आहे ५) श्री भैरवर, श्री रिषभांधिकर, व्याघ्रपाद ऋषी, पातंजली ऋषी, श्री भिक्षाटनर, श्री त्रिपुरांथकर, श्री ऊर्ध्व तांडवरर आणि भगवान महाविष्णू भगवान शिवांची पूजा करत आहेत.
प्रार्थना:
१. इथे सर्पांचा राजा कर्कोटक आणि पक्ष्यांचा राजा गरुड ह्यांनी भगवान शिवांची पूजा केली म्हणून हे स्थळ सर्व दोषांचे परिहार स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
२. इथे श्री ब्रम्हदेवांनी पूजा केली म्हणून असा समज आहे की इथे पूजा केल्याने व्यवसायामध्ये यशप्राप्ती होते.
३. असा समज आहे कि श्री पंचवर्णेश्वरर ह्यांची आडी महिन्यातील पौणिमेला पूजा करणे खूप हितकारक आहे.
४. असा समज आहे कि इथे श्री मुरुगन ह्यांची पूजा केल्याने शत्रूंवर मात करता येते.
५. असा समज आहे कि इथे पूजा केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते.
६. श्री पंचवर्णेश्वरर ह्यांची पूजा केल्याने सर्व पंचभूत स्थळांची पूजा केल्याचे फळ मिळते असा समज आहे.
पूजा:
१. दररोज सहा पूजा केल्या जातात.
२. प्रत्येक सप्ताहात सोमवारी आणि शुक्रवारी विशेष पूजा केल्या जातात.
३. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
४. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेला, अमावास्येला, कृत्तिका नक्षत्राच्या दिवशी आणि संकटहर चतुर्थीला विशेष पूजा केल्या जातात
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): पौणिमा पूजा
वैकासि (मे-जून): ब्रम्होत्सव
आनी (जून-जुलै): थिरुमंजनं
आडी (जुलै-ऑगस्ट): पौर्णिमा
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): मूळ नक्षत्रावर पूजा
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीराई
थै (जानेवारी-फेब्रुवारी): थैपुसम (पुष्य नक्षत्र)
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरम (उत्तराषाढा नक्षत्र)
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ८.३०
पत्ता: श्री पंचवर्णेश्वरर मंदिर, उरैयूर, जिल्हा त्रिची, तामिळ नाडू ६२०००३
दूरध्वनी: +९१-४३१२७६८५४६, +९१-९४४३९१९०९१, +९१-९७९१८०६४५७
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment