हे मंदिर त्रिची शहरामध्ये (ह्या शहराचे नाव थिरुचिरापल्ली असे आहे) वसले आहे. प्राचीन काळी इथे थिरिसिरन नावाच्या राक्षसाने भगवान शिवांची उपासना केली म्हणून ह्या स्थळाचे नाव थिरिसिरापुरम असे होते. ह्या स्थळाचे नाव थिरीशिखरपूरम असे पण होते कारण इथल्या रॉकफोर्ट टेकडीवरची तीन शिखरे भगवान शिव, श्री पार्वतीदेवी आणि श्री गणेश ह्यांनी व्यापली होती. रॉकफोर्ट टेकडी हि काही हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असावी. प्राचीन काळी ह्या स्थळाला सिरापल्ली, रिषभचरम आणि दक्षिण कैलास अशी पण नावे होती. असा समज आहे की हे मंदिर पल्लव राजांनी तिसऱ्या शतकामध्ये बांधलं. कालांतराने जैन संतांनी ते ताब्यात घेतलं. राजा महेंद्र वर्मन हा पूर्वी जैन धर्माचे अनुसरण करत होता. कालांतराने त्याने हिंदू धर्म पत्करला. त्याने प्रचलित मंदिर पाडून तेथे शिव मंदिर बांधले. थिरुचिरापल्ली हा चोळा साम्राज्याचा भाग होता. म्हणून चोळा राजांनी बरीच मंदिरे आणि किल्ले बांधले, त्यातले रॉकफोर्ट मंदिर हे मध्यवर्ती आहे. ह्या टेकडीमध्ये बऱ्याच गुहा आहेत ज्या जैन संतांनी बांधल्या असा समज आहे. वर्तमान मंदिराची पुनर्निमिती मदुराई नायक आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी केली. इथे बरेच शिलालेख आहेत ज्यामध्ये विविध राजांनी दिलेल्या देणग्यांची वर्णने आहेत. प्रमुख मंदिर पल्लव राजांनी आठव्या शतकात बांधले असा समज आहे. मदुराई नायक आणि विजापूर सुलतान तसेच कर्नाटकातले शासक आणि मराठा सैन्यामधल्या घनघोर युद्धांचा हा किल्ला साक्षीदार आहे.
शैव संतांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर वसले आहे. शैव संत संबंधर, अप्पर, माणिकवाचगर, अय्यादिगल काडवरकोण नायनार आणि वल्लाळर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. शैव संत अरुणागिरिनाथर ह्यांनी येथील श्री मुरुगन ह्यांच्या स्तुत्यर्थ स्तोत्रे रचली आहेत.
मुलवर: श्री थायूमानवर, श्री मातृभूतेश्वरर, श्री थायूमानस्वामी, श्री शेवंथीनाथर
देवी: श्री सुगंध कुंडलांबिका, श्री मात्तुवरकुळली
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थे: ब्रम्ह तीर्थ, कावेरी नदी
पौराणिक नाव: सिरापूरम, मलईकोट्टै
वर्तमान नाव: त्रिची
क्षेत्र पुराण:
१. पूर्वी प्रकाशित केलेल्या एका लेखामध्ये वायू आणि आदिशेष ह्यांच्यातील द्वंद्वाबद्दल उल्लेख केला होता. ह्या द्वंद्वामध्ये मेरू पर्वतावरील बरीच छोटी शिखरे आणि खडक दूर फेकले गेले. त्यातला एक छोटा शिखराचा तुकडा ह्या जागी पडला आणि तो पुढे टेकडी बनला. ह्या टेकडीच्या शिखरावर बसून तीन शिरे असलेल्या थिरीसिरन ह्या राक्षसाने भगवान शिवांवर ध्यान लावून तपश्चर्या केली. बराच काळ लोटला (१००० वर्षांपेक्षा जास्त) पण भगवान शिवांचे दर्शन झाले नाही. म्हणून त्याने आपली दोन शिरे छेदली आणि एका अग्नी कुंडामध्ये भगवान शिवांना ती अर्पण केली. जेव्हां त्याने तिसरं शिर छेदायला सुरुवात केली तेव्हां भगवान शिवांनी त्याला दर्शन दिलं आणि त्याच्यावर कृपा केली आणि छेदलेली दोन शिरे पण पूर्ववत जोडली. थिरीसिरन इथेच राहिला. म्हणून भगवान शिवांचे इथे श्री थिरिसिरनाथर असे नाव आहे. आणि स्थळाला थिरिसिरमलई असे नाव पडले. जे कालांतराने थिरुचिरापल्ली असे झाले.
२. एक चोळा राजा इथे राज्य करीत होता आणि वोरैयुर हि त्याची राजधानी होती. सरम मुनी नावाचे ऋषी भगवान शिवांची पूजा करत होते. ह्या पूजेमध्ये ते आपल्या घरातील शेवंतीची फुले पूजेमध्ये अर्पण करायचे. एकदा एका व्यापाऱ्याने हि फुले पाहिली आणि तो त्या फुलांकडे आकर्षित झाला आणि त्याने ती फुले चोरली. त्याने ती राजाला दिली. राजा पण त्या फुलांच्या सौंदर्याने आणि सुगंधाने आकर्षित झाला. त्याने त्या व्यापाऱ्याला हि फुले रोज पुरवावयास सांगितले. व्यापारी रोज हि फुले चोरी करायचा आणि ती राजाला पुरवायचा. ह्या फुलांच्या अभावी सरम मुनींच्या पूजेमध्ये व्यत्यय येऊ लागला. त्यांनी राजाकडे तक्रार केली. पण राजाने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. तेव्हा सरम मुनींनी भगवान शिवांकडे तक्रार केली. भगवान शिवांनी सरम मुनींना न्याय देण्यासाठी राजाच्या दरबाराकडे क्रोधीत दृष्टीने पाहिलं. त्यामुले दरबाराच्या आसपासच्या भागात धूळ आणि चिखलाचे वादळ उमटले. राजाला आपली चूक लक्षात आली आणि त्याने भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. म्हणून ह्या ठिकाणी जे कोणी चूक किंवा गुन्हा करतात त्यांना भगवान शिव शिक्षा देतात असा समज आहे. भगवान शिवांची येथे शेवंतीच्या फुलांनी पूजा केली गेली म्हणून इथे भगवान शिवांना श्री शेवंतीनाथर असं नाव पडलं. मूळ मंदिर हे पूर्वाभिमुख होतं. पण भगवान शिव राजाला शिक्षा देण्यासाठी पश्चिमेकडे वळले म्हणून गाभाऱ्याचे मुख्य प्रवेशद्वार पण पश्चिमेकडे वळले. पण ध्वजस्तंभ त्याच जागी राहिला. म्हणून ध्वजस्तंभ मंदिराच्या पाठीमागे आहे.
३. अजून एक आख्यायिका धनकांतन नावाचा व्यापारी आणि त्याची पत्नी रत्नावती ह्यांबद्दल आहे. रत्नावती निष्ठावान शिवभक्त होती. जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा तिने आपल्या आईला मदतीसाठी बोलावले. जेव्हा तिची आई कावेरी नदीच्या काठावर पोचली तेव्हा कावेरी नदीला पूर आला होता. त्यामुळे तिची आई वेळेत पोचू शकली नाही. दरम्यान रत्नावतीला प्रसूती वेदना चालू झाल्या. तिची आई आली नसल्याने तिने भगवान शिवांना प्रार्थना केली. भगवान शिव तिच्या आईचे रूप घेऊन आले आणि त्यांनी रत्नावतीबरोबर थांबून तिची प्रसूती करवली. आठवड्याभराने जेव्हां नदीचा पूर सरला तेव्हा रत्नावतीची आई तिच्या घरी आली. रत्नावती आणि तिची आई दोघीही भगवान शिवांना तिच्या आईच्या रूपात पाहून आश्चर्यचकित झाल्या. भगवान शिवांनी मूळ रूपात येऊन त्यांना दर्शन दिले. भगवान शिव इथे रत्नावतीच्या आईच्या रूपात आले म्हणून त्यांचे नाव श्री थायूमानवर असे पडले. तामिळ मध्ये थायुम् म्हणजे आई आणि आनवर म्हणजे ते बनले.
४. उच्ची पिळ्ळैयार: ह्या स्थळ पुराणाचा रामायणाशी संबंध आहे. जेव्हां विभीषण अयोध्येवरून परत श्री लंकेला निघाला त्यावेळी प्रभू श्रीरामांनी विभीषणाला एक रंगनाथांची मूर्ती दिली ज्या मूर्तीची पूजा स्वतः प्रभू श्रीराम करत होते. पण प्रभू श्रीरामांनी एक अट घातली कि श्री लंकेपर्यंत पोचेपर्यंत हि मूर्ती जमिनीवर ठेवायची नाही. जेव्हां विभीषण श्री लंकेच्या वाटेत ह्या ठिकाणी आला त्यावेळी त्याला श्री शेवंतीनाथर म्हणजेच भगवान शिवांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. त्याने तिथे एका लहान मुलाला पाहिले आणि त्याच्या हातात मूर्ती देऊन पवित्र तीर्थामध्ये स्नान करण्यास गेला. हा लहान मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात श्री विनायकच होते. विभीषण परत येण्याआधी श्री विनायकांनी ती मूर्ती जमिनीवर ठेवली. विभीषणाला क्रोध येऊन त्याने त्या लहान मुलाचा पाठलाग केला. तो लहान मुलगा टेकडीच्या शिखरापर्यंत गेला. जेव्हा विभीषण तेथे पोचला तेव्हां श्री विनायकर आपल्या मूळ रूपात आले. इथे शिखरावर श्री विनायकांनी दर्शन दिले म्हणून त्यांना उच्ची विनायकर असे नाव पडले. (तामिळ उच्ची म्हणजे शिखर)
५. इथे विजयरघुनाथचोक्कर नावाचा राजा राज्य करीत होता. त्याचा केडलियअप्पर नावाचा मंत्री होता जो राजाच्या खात्यांची देखभाल करत होता. केडलियअप्पर भगवान शिवांचा निष्ठावान भक्त होता. भगवान शिवांच्या कृपेने त्याला एक पुत्र झाला ज्याचे नाव त्याने थायूमानवर असे नाव ठेवले. थायूमानवर खूप हुशार होता आणि तो उच्चशिक्षित झाला. राजाने थायूमानवरला पण आपल्या सेवेत घेतले. थायूमानवरने भगवान शिवांची मनोभावे भक्ती केली. भगवान शिवांनी त्याच्यावर कृपा केली आणि श्री दक्षिणामूर्तींच्या रूपात त्याला उपदेश दिला.
मंदिरात ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
अगस्त्य मुनी, अर्जुन, हनुमान, रत्नावती, प्रभू श्रीराम, सप्त मातृका, सप्त ऋषी, सरम मुनी, थिरीसिरन राक्षस, केडलियअप्पर, पिळ्ळैयार, श्री ब्रम्हदेव, जटायू, मौन गुरु.
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग खूप विशाल आहे.
२. पंगूनी महिन्यामध्ये तीन दिवस सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात.
३. ह्या क्षेत्राला दक्षिण कैलास असे म्हणले जाते.
४. नवग्रह संनिधीमध्ये सर्व ग्रह सुर्याभिमुख आहेत.
५. ध्वजस्तंभ भगवान शिवांच्या देवालयाच्या मागे आहे. हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे.
६. भगवान शिवांच्या देवालयाचे प्रवेश द्वार आधी पूर्वाभिमुख होते. आता ते देवालयाच्या मागे आहे. असा समज आहे कि भगवान शिव जेव्हा राजाला शिक्षा देण्यासाठी वळले तेव्हां मंदिर पश्चिमेकडे वळले पण ध्वजस्तंभ मात्र जिथे होता तिथेच राहिला.
७. श्री दक्षिणामूर्तीं दर्भासनावर बसलेले आहेत. त्यांच्यासमोर सहसा चार शिष्य असतात पण इथे आठ शिष्य आहेत.
८. श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णुदूर्गा ह्यांच्या मूर्ती लाकडाच्या आहेत.
९. इथे बरेच मंडप आहेत ज्यांमध्ये सुंदर आणि आकर्षक शिल्पे आहेत.
१०. ह्या टेकडीला एका विशिष्ट दिशेकडून पाहिले तर हि टेकडी नंदि (भगवान शिवाचे वाहन), सिंह (देवीचे वाहन) आणि श्री विनायकांची विस्तारित सोंड अशा दृश्याचा भास होतो.
११. भगवान शिवांचे देवालय दोन स्तरांचे आहे.
१२. ब्रम्हतीर्थाच्या काठावर एका मंडपात श्री नंदि देवांची भव्य मूर्ती आहे.
१३. इथे दगडी दीपस्तंभ आहे जो ३५ फूट उंच आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर त्रिची शहरातल्या रॉकफोर्ट संकुलामध्ये बांधले आहे. ह्या मंदिरात तीन देवालये आहेत, त्यातील दोन श्री विनायकांची आणि एक भगवान शिवांचे आहे जिथे त्यांचे नाव श्री थायूमानवर असे आहे. श्री विनायकांचे एक विशाल देवालय टेकडीच्या शिखरावर आहे. ह्याचे नाव श्री उच्ची पिळ्ळैयार कोविल असे आहे. टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या श्री विनायकांच्या देवालयाचे नाव माणिक्क विनायकर असे आहे. भगवान शिव आणि श्री पार्वतीदेवी ह्यांचे देवालय ह्या दोन देवालयांच्या मध्ये आहे आणि ते सर्वात विशाल आहे. रॉकफोर्ट संकुल २७३ फूट उंच टेकडीवर आहे. शिखरावर जाण्यासाठी ४१७ पायऱ्या आहेत. जेव्हां ह्या टेकडीला एका विशिष्ट दिशेने पाहिल्यास तेथे नंदि, सिंह आणि श्री गणेशांची सोंड अश्या दृश्याचा भास होतो. २५८व्या पायरीच्या जवळ धर्मपुरी आधिनम, १०० स्तंभांचा एक मंडप आणि पल्लव साम्राज्याच्या काळी खडकामध्ये बांधलेल्या गुहा आहेत. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराच्या प्रवेशाजवळ श्री विनायकर, ज्यांना श्री कंबथथडी विनायकर असं म्हणतात, आणि श्री मुरुगन (श्री षण्मुख) ह्यांच्या मूर्ती आहेत. प्रवेशाच्या जवळ बलीपीठ, ध्वजस्तंभ आणि नंदि आहेत. इथे दोन परिक्रमा आहेत. एकाचे नाव आहे मेलवीदी (पश्चिमेकडला रस्ता) आणि दुसऱ्याचे नाव किळवीदी (पूर्वेकडचा रस्ता) असे आहे. शिव लिंग स्वयंभू असून ४ फूट उंच आहे आणि पश्चिमाभिमुख आहे.
कोष्टामध्ये श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रम्हदेव, श्री सूर्य, श्री सोमस्कंद, श्री नटराज आणि श्री दुर्गादेवी.
श्री दक्षिणामूर्ती दर्भासनावर बसले आहेत आणि त्यांच्या पायाशी आठ शिष्य बसले आहेत - पतंजली ऋषी, व्याघ्रपाद ऋषी, चार सनकादि मुनी, शिव योग मुनी आणि थिरूमुलर. ही पूर्ण टेकडीच श्री नंदि देवांचे रूप मानल्यामुळे इथे ब्रह्म तीर्थाच्या काठावर एका मंडपामध्ये नंदिंची भव्य मूर्ती आहे. ह्या मूर्तीला प्रदोष नंदि म्हणून पूजतात. इथे एक ३५ फूट उंच दीपस्तंभ आहे. १०० स्तंभ असलेल्या मंडपामध्ये सुंदर चित्रे तसेच शिल्पे आहेत. भगवान शिवांची ६४ मुखे ज्यांना शिव मूर्तम म्हणतात ते या मंडपात आहेत. त्यामध्ये भगवान शिवांची एक मूर्ती ज्याला गांगल मूर्ती म्हणतात ती आहे. मंदिराच्या मध्यवर्ती भगवान शिवांचे देवालय आहे आणि एक स्तर खाली श्री पार्वतीदेवींचे देवालय आहे. भगवान शिवाचे देवालय दोन स्तरांचे आहे आणि त्याला एक वर आणि एक खाली अशा दोन परिक्रमा आहेत. पंगूनी महिन्यामध्ये तीन दिवस सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात. ध्वजस्तंभ गाभाऱ्याच्या मागे आहे. असा समज आहे की पूर्वी हे देवालय पूर्वाभिमुख होते. पूजेच्या समयी गाभाऱ्याच्या मागून (पूर्वेकडून) थेवरं मधली स्तोत्रे गायली जातात तसेच संगीत वाद्ये पण वाजवली जातात. श्री अंबिकादेवींचे स्वतंत्र देवालय आहे. एक स्तर खाली श्री विनायकर, नवग्रह आणि श्री वीरभद्रर ह्यांची देवालये आहेत. नवग्रह संनिधीमध्ये श्री सूर्य त्यांच्या पत्नींसमवेत म्हणजेच श्री उषा आणि श्री प्रतीउषा ह्यांच्या समवेत आहेत. बाकी सगळे ग्रह हे सूर्याकडे मुख करून आहेत. श्री मुरुगन ह्यांना इथे श्री मुथुकुमार स्वामी असे संबोधले जाते. श्री अय्यनार हे श्री अंबिकादेवींच्या देवालयाजवळ एका खड्ड्यामध्ये आहेत. भगवान शिवांच्या देवालयाच्या परिक्रमेमध्ये अगस्त्य मुनी, श्री इंद्रदेव, जटायू, अत्रि ऋषी, धूमकेतू, थिरीसिरन, अर्जुन, प्रभू श्रीराम, श्री आंजनेय, विभीषण, नाग कन्नीका, सरम मुनी, मौन गुरु स्वामी आणि रत्नावती ह्यांच्या मूर्ती आणि देवालये आहेत. आतल्या परिक्रमेमध्ये ६३ नायनमार त्यांच्या उत्सव मूर्तींसमवेत, श्री शेवंती विनायकर, श्री वल्ली आणि श्री दैवानै समवेत श्री मुथुकुमारस्वामी, श्री काळभैरवर, श्री चंडिकेश्वरर, श्री ज्वरहरेश्वरर (त्यांना तीन शिरे, तीन हात आणि तीन पाय आहेत), श्री महालक्ष्मी बसलेल्या मुद्रेमध्ये, श्री मीनाक्षी सुंदरेश्वरर, श्री सहस्र लिंगेश्वरर, सप्त मातृका, श्री सट्टाईनाथर ह्यांच्या मूर्ती आणि देवालये आहेत तसेच धार लिंग आहे. श्री अंबिकादेवींच्या परिक्रमेमध्ये अरुल शक्तींच्या मूर्ती आहेत. श्री महालक्ष्मी ह्यांची मूर्ती उभ्या मुद्रेमध्ये आहे आणि हि मूर्ती लाकडाची आहे. श्री दुर्गादेवी एका स्वतंत्र देवालयातून कृपावर्षाव करतात आणि त्यांची मूर्ती पण लाकडाची आहे. श्री अंबिकादेवींच्या देवालयामध्ये सरम मुनींची मूर्ती आहे. ह्या मूर्ती मध्ये ते आठ भुजा असलेल्या श्री विष्णुदूर्गादेवींची पूजा करत आहेत असं चित्रित केलं आहे. इथे एक शिव गणांची मूर्ती आहे ह्याचे नाव चंगू (शंख) स्वामी असे आहे. हि मूर्ती बलीपीठ आणि ध्वजस्तंभ ह्यांच्या मध्ये आहे. ते शंखनाद करत आहेत असं चित्रित केलं आहे. त्यांना पण शंखनाथर असे पुजले जाते.
इथे काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या इथल्या स्थापत्याची आणि शिल्पकलेची अलौकिकता दर्शवतात. त्या गोष्टी अशा - लटकणारी दगडी साखळी, सिंहाच्या मुखातला दगडी चेंडू, लटकलेल्या कमळामधून अमृत पिणारे पोपट, स्तंभांवरची शिल्पे, २५ शिव मूर्तम आणि श्री थायूमानवर ह्यांची केली जाणारी विशेष पूजा.
ह्या मंदिरामध्ये सात मंडप आहेत - १००० स्तंभांचा मंडप, वाहन मंडप, मीनाक्षी सुंदरेश्वरर मंडप, १०० स्तंभांचा मंडप, सहस्र लिंग मंडप, चित्र मंडप, मणी मंडप आणि १६ स्तंभांचे मंडप.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे सुरक्षित प्रसूती साठी प्रार्थना करतात.
२. ज्यांची आई दिवंगत झाली आहे ते इथे भगवान शिवांची पूजा करतात ह्या भावनेने की भगवान शिव त्यांचे आईसारखं रक्षण करतील.
३. भाविक जन श्री सुगंध कुंडलांबिका देवीची सुरक्षित प्रसूतीसाठी पूजा करतात. ह्या साठी ज्यांच्या घरात गर्भवती स्त्री आहे त्या घरातील एक व्यक्ती इथे येऊन श्री पार्वती देवींना (म्हणजेच श्री सुगंध कुंडलांबिका) २१ मोदक आणि २१ गोड अप्पम अर्पण करतात. आणि हळद, कुंकुम आणि विड्याच्या पानांनी अर्चना करतात.
४. भाविक जन इथे श्री महालक्ष्मी देवींची धन आणि समृद्धीप्राप्तीसाठी पूजा करतात. तिला दूध, मध आणि केशर ह्यांचं मिश्रण अर्पण करतात आणि तिच्या समोर तुपाचा दिवा लावतात.
५. राहू काळामध्ये इथे भाविक जन मांगल्य दोषाचे निवारण करण्यासाठी श्री विष्णुदूर्गा ह्यांची पूजा करतात. तिला लाल कण्हेर फुलांचा हार अर्पण करतात तसेच नैवेद्य म्हणून खीर अर्पण करतात.
पूजा:
१. दररोज सकाळी ५.३० ते रात्री १० पर्यंत सहा पूजा केल्या जातात.
२. प्रत्येक सप्ताहामध्ये सोमवारी आणि शुक्रवारी विशेष पूजा केल्या जातात.
३. प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष पूजा केल्या जातात.
४. प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे काही महत्वाचे सण:
चित्राई (एप्रिल-मे): १५ दिवसांचा ब्रम्होत्सव आणि चैत्र पौर्णिमा
पंगूनी (मार्च-एप्रिल): फ्लोट उत्सव, जेव्हा सूर्याची किरणे शिव लिंगावर पडतात तेव्हां सूर्य पूजा केली जाते.
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): थिरुकार्थिगई
थै (जानेवारी-फेब्रुवारी): पोंगल, मकर संक्रांति, विशाखा नक्षत्रावर श्री थायूमानवर गुरु पूजा, पंच मूर्तींची मिरवणूक
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२, दुपारी ४ ते रात्री ८.३०
पत्ता: श्री थायूमान स्वामी मंदिर, मलईकोट्टै (रॉकफोर्ट), त्रिची, तामिळनाडू ६२०००२
दूरध्वनी: +९१-४३१२७०४६२१, +९१-४३१२७१०४८४,+९१-४३१२७००९७१
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.