ज्या स्थानांमध्ये शिव लिंगाची आराधना अधिक फलदायी होते त्या स्थानांमध्ये पंच भूत स्थळे हि अग्रगण्य मानली जातात.
सृष्टी हि पंच महाभूतांनी बनलेली आहे. पंच महाभूते म्हणजे सृष्टीमधले पांच मूळ घटक - पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. पंच भूत स्थळे म्हणजे ह्या प्रत्येक स्थळामध्ये त्या त्या घटकाच्या रूपात शिव लिंग प्रकट झाले आहे किंवा ह्या प्रत्येक स्थळामधील शिवलिंगामध्ये ते ते घटक निहित आहे.
ह्या पांच स्थळांपैकी चार स्थळे तामिळ नाडूमध्ये आहेत तर एक आंध्रप्रदेश मध्ये आहे. खालील कोष्टकामध्ये ह्या पांच स्थळांची माहिती दिली आहे.
ह्या प्रत्येक स्थळाबद्दल थोडी अधिक माहिती
कांचीपुरम:
येथील शिव लिंग पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री एकांबरेश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री कामाक्षी देवी असे नाव आहे. पुराणांमध्ये अशी कथा आहे कि श्री पार्वती देवीने येथे एका आंब्याच्या झाडाखाली मातीचे (पृथ्वीचे) लिंग तयार करून त्याची पूजा केली. अजून एका स्थलपुराणानुसार पृथ्वी लिंग तामिळनाडूमधल्या थिरुवरुर ह्या जागेत आहे.
थिरुवनैकवळ:
येथील शिव लिंग जल तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री जम्बुकेश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री अखिलांडेश्वरी देवी असे नाव आहे. येथील गाभाऱ्यामध्ये जमिनीखाली एक पाण्याचा झरा आहे. अशी आख्यायिका आहे की श्री पार्वती देवींना त्यांच्या अयोग्य वर्तनातून प्राप्त झालेल्या पापाचे निरसन करण्यासाठी भगवान शिवांनी त्यांना येथे तपश्चर्या करण्याची आज्ञा केली. त्यांच्या आज्ञेनुसार श्री पार्वती देवीं येथे जंबू वनात आल्या. त्यांना एका श्वेत जंबू झाडाखाली कावेरी नदी दिसली आणि त्या पाण्याने त्यांनी शिव लिंग तयार करून तेथे शिव लिंगाची आराधना केली. हे ठिकाण तामिळनाडू मधल्या त्रिची शहराजवळ आहे.
थिरुवन्नमलै:
येथील शिव लिंग अग्नी तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री अरुणाचलेश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री जननप्रसन्नाम्बा देवी असे नाव आहे. पुराणांनुसार भगवान शिव येथे एका अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव ह्यांना ह्या स्तंभाचा उगम आणि अंत मिळाला नाही. श्री विष्णू आणि श्री ब्रह्मदेव ह्यांच्या विनंतीवरून भगवान शिवांनी अग्निस्तंभाच्या रूपातून पर्वत रूपात स्थित झाले. ह्या पर्वतालाच शिव लिंग मानले जाते. येथे भगवान शिव अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले म्हणून ह्या स्थळाला अरुणाचलम असे नाव आहे तर भगवान शिवांना श्री अरुणाचलेश्वरर असे नाव आहे. आणि शिव लिंगाला अग्नी लिंग असे म्हणतात.
श्री काळहस्ती:
येथील शिव लिंग वायू तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री काळहस्तीश्वरर असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री उन्नमलै देवी असे नाव आहे. येथे तीन कट्टर शिवभक्तांनी तपश्चर्या केली. १) कोळी (श्री), २) सर्प (काळ) आणि ३) हत्ती (हस्ती). ह्या तिघांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं की त्यांची नावे येथील वायूलिंगाच्या नावामध्ये निहित होतील. म्हणून येथील शिवलिंगाला श्रीकाळहस्तीश्वरर असे नाव आहे. ह्या क्षेत्राच्या महती दर्शवणाऱ्या बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. हे स्थळ राहू-केतूंचे क्षेत्र समजले जाते कारण येथे पुजार्चना केल्यामुळे राहू, केतू आणि सर्प दोषांचे निवारण होते असा समज आहे.
चिदंबरम:
येथील शिव लिंग आकाश तत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शिवांचे श्री थील्लैनटराज असे नाव आहे तर श्री पार्वती देवींचे श्री शिवकामी देवी असे नाव आहे. शिव पुराणानुसार भगवान शिव ह्या स्थळी असलेल्या थील्लैवनामध्ये श्री मोहिनी रूपात असलेल्या श्री विष्णूंबरोबर विहार करत होते. ह्यामुळे ह्या वनात तपश्चर्या करणाऱ्या ऋषींना त्यांच्या तपश्चर्येमध्ये बाधा होत होती. त्यांनी विविध मायावी विधी करून ह्या दोघांना तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यामध्ये काही यश आले नाही. भगवान शिवांनी त्या ऋषींना आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे कंठाभोवती सर्प आणि चेहऱ्यावर स्मितहास्य अशा रूपात दर्शन दिलं आणि अपस्मार (अंधःकार दर्शवणारा राक्षस) राक्षसाच्या शरीरावर आनंद तांडव नृत्य केलं. म्हणून येथे भगवान शिवांना श्री थील्लैनटराज असं नाव आहे.
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment