तामिळनाडू राज्यातल्या तिरुचिरापल्ली ह्या जिल्ह्यातल्या थिरुवनैकोविल गावामध्ये हे मंदिर वसलं आहे. हे पंचभूत स्थळांपैकी एक आहे. पंचमहाभूतांपैकी जल तत्वाचे प्रतीक आहे. तसेच हे आथार स्थळांपैकी पण एक आहे ज्यामध्ये हे मंदिर स्वाधिष्ठान चक्राचे प्रतीक आहे. ६३ नायनमारांनी ज्या मंदिरांची स्तुती आपल्या काव्यांमध्ये केली आहे त्या पाडळ पेथ्र स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे.
मुलवर (मुख्य देवता): श्री जंबुकेश्वरर
उत्सव मूर्ती: श्री चंद्रशेखर, श्री सोमस्कंदर
देवी: श्री अखिलांडेश्वरी
क्षेत्र वृक्ष: सफेद जांभूळ
हे मंदिर साधारण १७०० वर्ष जुनं आहे आणि येथील शिवलिंग स्वयंभू आहे. ह्या मंदिरातल्या इतर देवता - भगवान शिवांच्या गाभाऱ्यामागे श्री महासरस्वती देवी (वीणे शिवाय), श्री चंद्र त्यांच्या पत्नी श्री कृत्तिका आणि श्री रोहिणी समवेत, श्री पंचमुखी विनायक, श्री शनिदेव त्यांच्या पत्नी श्री ज्येष्ठादेवींसमवेत.
जंबू तीर्थाच्या काठावर श्री कुबेरांनी पुजलेलं शिव लिंग आहे ज्याला कुबेर लिंग म्हणतात. ह्या लिंगावर जून-जुलै च्या पौर्णिमेला केळी, आंबा, फणस ह्या फळांचा अभिषेक केला जातो. येथील स्थळ पुराणानुसार आडी ह्या तामिळ महिन्यामध्ये श्री पार्वती देवींनी इथे तपश्चर्या केली. श्री पार्वती देवी दिवसाच्या विविध प्रहारांमध्ये विविध रूपांमध्ये आशीर्वाद देतात. सकाळी श्री महालक्ष्मीच्या रूपांत, दुपारी श्री पार्वती देवींच्या रूपांत तर संध्याकाळी श्री सरस्वती देवींच्या रूपांत आशीर्वाद देतात. श्री जम्बुकेश्वरर लिंगाच्या खाली एक पाण्याचा झरा आहे. ह्या झऱ्यातलं पाणी कितीही काढलं तरी ते आपोआप परत भरलं जातं.
क्षेत्र पुराण:
येथील क्षेत्र पुराणानुसार ह्या स्थळाशी अनेक आख्यायिका निगडित आहेत.
एकदा भगवान शिव जेव्हा कैलास पर्वतावर ध्यानस्थ होते, श्री पार्वती देवींच्या मनात विचार आला कि मी इथे समोर असताना भगवान शिवांनी ध्यानस्थ का रहावं? त्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात भगवान शिवांना थोडंसं चिडवलं. पण भगवान शिव ह्यामुळे क्रोधीत झाले आणि त्यांनी श्री पार्वती देवींना ह्या पापाचं क्षालन करण्यासाठी भूलोकावर जन्म घेण्याचा शाप दिला. श्री पार्वती देवींनी भगवान शिवांकडे क्षमायाचना केली. भगवान शिवांनी त्यांना आश्वासन दिलं ते भूलोकावर येऊन त्यांना ज्ञानोपदेश करतील आणि ह्या पापापासून मुक्ती देतील. श्री पार्वती देवी कावेरी नदीच्या काठावर आल्या आणि त्यांना इथे पाण्यामध्ये एक शिव लिंग दिसलं. थिरुवनैकवळ हि ती जागा आहे जिथे त्यांनी पाण्यामध्ये शिव लिंगाची (अप्पू लिंग) स्थापना करून तपश्चर्या केली. भगवान शिव श्री पार्वती देवींचे गुरु झाले आणि त्यांनी श्री पार्वती देवींना ज्ञानोपदेश केला. ह्यातून हाच बोध होतो कि ज्ञान प्राप्तीसाठी गुरु असणं खूप गरजेचं आहे. खरं म्हणलं तर स्वतः आदि पराशक्ती असलेल्या श्री पार्वती देवींना गुरूंची काय आवश्यकता. पण जगाला गुरूंचं महत्व समजविण्यासाठी म्हणून त्यांनी ही लीला केली असावी. ह्या मंदिरामधले शिवाचार्य (म्हणजेच शिव पुजारी) अभिनय करून श्री पार्वती देवी भगवान शिवाची आराधना करत आहेत असं दृश्य सादर करतात.
शिव लिंगाच्या खाली असलेल्या पाण्याच्या झऱ्याला हेम तीर्थ (पाताळ गंगा) असं म्हणतात. ह्या तीर्थातील पाणी लिंगावर अभिषेक करण्यासाठी वापरले जाते. श्री पार्वती देवींनी पण भगवान शिवांची आराधना करण्यासाठी ह्या तीर्थातील पाण्याचा वापर केला असा समज आहे.
ह्या ठिकाणी श्री पार्वती देवींना एक कुमारिका तपश्चर्या करीत आहे आणि आपल्या गुरूंकडून ज्ञान मिळविण्यासाठी वाट बघत आहे अशा रूपात चित्रित केलं आहे.
अजून एका आख्यायिकेनुसार माल्यवान आणि पुष्पदंत नावाचे दोन शिव गण होते. त्यांच्या मध्ये सतत वाद घडायचे. एकदा असाच त्यांच्यामध्ये चाललेला वाद विकोपाला गेलेला असताना माल्यवानाने पुष्पदंताला पुढच्या जन्मी हत्तीचा जन्म प्राप्त होण्याचा शाप दिला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पुष्पदंताने माल्यवानाला पुढच्या जन्मी कोळीचा (कीडा) जन्म प्राप्त होण्याचा शाप दिला. त्या शापांचे परिणाम म्हणून पुढच्या जन्मी ते दोघेही ह्या स्थळी हत्ती आणि कोळ्याच्या रूपात जन्माला आले. मात्र त्यांनी आपली शिवभक्ती कायम ठेवली. हत्ती कावेरी नदीतून पाणी आणून अभिषेक करायचा तर कोळी शिव लिंगाभोवती जाळं विणायचा जेणे करून जम्बुच्या झाडाची वाळलेली पाने शिव लिंगावर पडू नयेत. दर दिवशी हे जाळं बघून हत्तीला वाटायचं की शिव लिंगावर धूळ साठली आहे म्हणून तो त्यावर पाणी ओतून स्वच्छ करायचा तर कोळी परत ते जाळं विणायचा. एके दिवशी हत्तीचं हे वर्तन सहन न होऊन कोळी हत्तीच्या कानात शिरून त्याला चावला ज्यामुळे हत्ती मरण पावला. पण ह्यामध्ये तो कोळी पण मरण पावला. पण त्यांची भक्ती बघून भगवान शिव मात्र त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या दोघांना शापमुक्त केले. इथे हत्तीने भगवान शिवांची भक्ती केली म्हणून ह्या स्थळाला म्हणून ह्या स्थळाला थिरुआनैका (थिरु म्हणजे पवित्र किंवा माननीय, आनै म्हणजे हत्ती आणि का (काडू) म्हणजे वन). कालांतराने ह्याचा अपभ्रंश होऊन त्याचे नाव थिरुवनैकवळ आणि थिरुवनैकोविल असे झाले. पुढच्या जन्मी तो कोळी मनुष्य जन्म पावून एक राजा झाला. आपल्या पूर्वजन्मीच्या हत्तीबद्दल असलेल्या स्पर्धात्मक भावनेमुळे त्याने जी मंदिरे बांधली त्या मंदिरांच्या गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराची उंची इतकी कमी ठेवली कि त्यातून हत्ती आत जाता कामा नये. ह्या प्रवेशद्वारांची उंची ४ फूट आहे तर रुंदी २.५ फूट आहे. शिवाय ह्या मंदिरांचे प्रवेशद्वार पण असे बांधले कि पायऱ्या चढून जायला लागतात ज्यामुळे हत्ती प्रवेश करू शकणार नाही. ह्या मंदिरांच्या शैलीला माडक्कोवील असं म्हणतात.
श्री पार्वती देवींचे इथे श्री अखिलांडेश्वरी असे नाव आहे. भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची देवालये एकमेकांसमोर आहेत. अशा मंदिरांना उपासना स्थळे असं म्हणतात. ह्या मंदिरांमध्ये थिरुकल्याण (भगवान शिव आणि श्री पार्वती देवींचा विवाह सोहळा) साजरा होत नाही कारण इथे श्री पार्वती देवी ह्या भगवान शिवांच्या शिष्या आहेत.
आदि शंकराचार्यांनी श्री अखिलांडेश्वरी देवींच्या समोर श्री प्रसन्न गणपती ह्यांची मूर्ती स्थापन केली आहे. त्याचबरोबर त्यांनी श्री अखिलांडेश्वरी देवींच्या कानात श्री चक्र रुपातले डूल स्थापन केले. ह्यामुळे श्री अखिलांडेश्वरी ह्यांचा क्रोध शांत झाला असा समज आहे. श्री पार्वती देवी आणि श्री प्रसन्न गणपती ह्यांची देवालयांचा आकार ॐ ह्या प्रणव मंत्रासारखा आहे.
इथलं एकपद त्रिमूर्ती (ब्रह्मा, विष्णू आणि शिव) ह्यांचं चित्र चेन्नईजवळील थिरुवोत्तीयुर ह्या गावात असलेल्या त्यागग्रज मंदिरातल्या चित्रासारखंच आहे.
मंदिरामध्ये साजरे होणारे सण:
मासी (फेब्रुवारी - मार्च): महाशिवरात्री उत्सव
पंगूनी (मार्च - एप्रिल): सप्तस्थान उत्सव
वैकासि (मे - जून): शिवरात्रि उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर - नोव्हेंबर): अन्नाभिषेक उत्सव
मारगळी (डिसेंबर - जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीराई) उत्सव
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.