अमावस्या म्हणजे काय? जेव्हा सूर्य आणि चन्द्र हे एकत्र येतात त्या तिथीला अमावस्या असं म्हणतात. जन्मकुंडलीमध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहांच्या स्थानाला फार महत्व आहे. कुंडलीवरून ज्योतिष फळ सांगताना ह्या ग्रहांच्या स्थानांना खूप महत्व दिलं जातं. सूर्य हा पितृकारक किंवा आत्मकारक समजला जातो तर चंद्र ग्रह मातृकारक किंवा मनोकारक समजला जातो.
अमावास्येला तिलांजली देऊन पितरांना प्रसन्न करणे हा हिंदू शास्त्राप्रमाणे एक संस्कार आहे. गृहस्थाश्रमातल्या माणसाला देव, ऋषी, बुध आणि पितृ ह्यांचे संस्कार सांगितले आहेत. गृहस्थाने ह्या चार विषयींची म्हणजेच देव, ऋषी, कुलदैवत, जिवलग कुटुंब/ नातलग आणि पितरांबद्दलची कर्तव्ये काटेकोरपणे पार पाडावीत. ह्या कर्तव्यांमध्ये पितृ कर्तव्य हे सर्वात महत्वाचे आहे. एक वेळ देवाच्या उपासनेमध्ये कमी जास्त झालं तरी ठीक आहे. पण पितरांसाठीच्या कर्तव्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नये. पितरांसाठीची श्राद्ध कर्म केल्या मुळे पितंरं प्रसन्न होतात आणि ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात ज्यामुळे वंशजांचं आयुष्य सुरळीत होण्यास मदत होते. श्राद्ध कर्मांमध्ये जेव्हा खंड पडतो तेव्हा पितृदोष निर्माण होतो आणि पितृदोषामुळे वंशजांना खूप कष्ट सहन करावयास लागतात. पितृदोषाची काही ठळक लक्षणं म्हणजे विवाह ठरण्यामध्ये विलंब होणे, वैवाहिक जीवन विस्कळीत होऊन कुटुंबामध्ये सतत कलह असणे, नोकरी किंवा व्यवसायामध्ये सतत अडचणी येऊन वृद्धी न होणे, अपत्यप्राप्ती न होणे. ह्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असेल तर आपल्याला पितृदोष आहे असं समजावं. ह्या दोषांचा परिहार होण्यासाठी पितृपूजा करावी.
पितृपूजांमधली सर्वात सोपी पूजा म्हणजे अमावास्येला पितरांना तिलांजली देणे म्हणजेच तीळ आणि पाणी वापरून तर्पण करणे. ह्या पूजेला आपल्याला फार खर्च करायला लागत नाही.
सर्व अमावास्यांमध्ये तीन अमावस्या महत्वाच्या आहेत. दक्षिणायन सुरु होण्याआधीची अमावस्या, उत्तरायण सुरू होण्याआधीची अमावस्या आणि ह्या दोघांमधली म्हणजेच महालय अमावस्या. आणि ह्या तीन अमावास्यांमध्ये महालय अमावास्येचं महत्व सर्वात जास्त आहे. ह्या दिवशीची पितृपूजा कधीही विसरू नये.
पितृपूजा कोणी करावी, कशी करावी, काही नियम आणि बंधनं
ज्यांचे माता पिता दिवंगत झाले अशा स्त्री पुरुषांनी पितृपूजा करावी. पुरुषांनी अमावास्येला तीळ आणि पाणी वापरून पितरांना तर्पण करणे (तिलांजली) ही सर्वात सोपी आणि परिणामकारक पूजा आहे. ज्या स्त्रियांना मूल नाहीये आणि ज्यांचे माता पिता दिवंगत झाले आहेत त्यांनी अमावास्येला दिवसभरात व्रत करावं (सूर्यास्तापर्यंत उपवास करावा), एक पान वाढून बाहेर कावळ्यासाठी ठेवावं किंवा आपल्या पेक्षा वयस्कर जे असतील त्यांना जेवण घालावं, देवळात दान द्यावं आणि व्रताच्या शेवटी घरातल्या देवासमोर किंवा देवळात दिवा लावावा.
दर अमावास्येला कावळा किंवा गायीला घास देणे अशी पण पितृपूजेची पद्धत आहे.
पितृपूजा आपल्या घरातली देवपूजा करण्याआधी करावी. पितृपूजा करण्याआधी गंगा आणि यमुना नद्यांचं स्मरण करावं. आपल्या पित्याच्या बाजूच्या तीन पिढ्या आणि मातेच्या बाजूच्या तीन पिढ्या ह्यांची नावांची यादी जवळ ठेवावी. संकल्पासाठी आपल्या गोत्राची नोंद करावी. आपलं गोत्र माहित नसल्यास नात्यांचा उच्चार करावा. तर्पण केल्यानंतर घरी किंवा देवळात जाऊन दिवा लावावा. तर्पण केलेलं पाणी जवळपास असलेल्या पाण्यामध्ये विसर्जन करावं आणि ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी.
हि पूजा आपण कुठेही करू शकतो. म्हणजे आपल्या घरी पण करू शकतो. शक्य असल्यास हि पूजा नदी काठी, समुद्राकाठी, किंवा रामेश्वरम, काशी, गया, इलाहाबाद, थिरुवेंगाडू ह्या पवित्र ठिकाणी करावी. पण ते जमत नसल्यास हि पूजा घरी केली तरी पण चालते.
No comments:
Post a Comment