ॐ श्री गुरवे नमः
पुढील आठवड्यामध्ये सुरू होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त काही गणपती विषयी लेख आम्ही प्रकाशित करत आहोत. ह्या लेखांमधील माहिती दक्षिण भारतात प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांमधून निवडली आहे. कांची शंकराचार्यांच्या तमिळ भाषेतील प्रवचनांचे मराठीमध्ये भाषांतर करताना काही चूक झाली असल्यास वाचकांनी क्षमा करावी.
गणपती हे सर्व लोकांचं आराध्य दैवत आहे. केवळ भारतातच नव्हे तर बऱ्याच देशांमध्ये गणपतीची उपासना चालते. कुठलंही कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गणपतीला नमस्कार करूनच कार्याची सुरुवात होते. म्हणूनच गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात. एवढंच काय अगदी त्याच्या आईने (श्री ललिता देवी म्हणजेच पार्वतीने) पण भण्डासुराने देवांना त्रास देण्यासाठी निर्माण केलेल्या मोहनास्त्रातून देवांची सुटका करण्यासाठी विघ्नेश्वराचीच मदत घेतली. ह्यावरून आपल्याला गणपतीचं महत्व लक्षात येतं.
गणपतीची उपासना साधी, सरळ आणि सोपी आहे. मातीने, शेणाने किंवा हळदीने तयार केलेल्या मूर्तीमध्ये गणपतीला आवाहन करून त्याला प्रसन्न करून त्याचा अनुग्रह प्राप्त करता येतो. त्याच्या उपासनेसाठी शास्त्र, नियम ह्यांची काही गरज नाही. भक्तांच्या हाकेसरशी प्रकट होऊन तो सदैव भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. इतर देवांसारखे त्याला सोवळं किंवा अमुक सामग्रीची गरज नाही. त्याला प्रसादाच्या रूपात काहीही दिलं तरी तो समाधानी असतो. त्याच्या दर्शनासाठी अमुक वेळ किंवा अमुक ठिकाण असं काही बंधन नाही. तिन्ही त्रिकाल त्याला हाक मारून त्याचं दर्शन घेता येतं.
गणपतीच्या कथा पण खूप मनोरंजक आणि बोधदायक आहेत. अशीच एक पुराणातील छोटी कथा आपण बघूया.
पुराणांत कुबेर हा धनाचा देव मनाला जातो. बरेच जण धनप्राप्तीसाठी कुबेराची पूजा करतात. अशा कुबेर देवाचं गणपतीने कसं गर्वहरण केलं त्याची ही कथा आहे. धन, सत्ता हे गर्व निर्माण करतात. तसाच कुबेराला पण आपल्या संपत्तीचा गर्व झाला.
एकदा कुबेर शंकर पार्वतींना भेटायला कैलास पर्वतावर गेला. जाताना शिष्टाचारानुसार तो काही फळं घेऊन गेला. शंकर पार्वतीच्या बाजूला गणपती बसला होता. कुबेराने आणलेली फळं बघून तो हसला. त्याने विचार केला कि एवढ्या फळांनी त्याचं काय होणार आणि त्याने क्षणार्धात ती फळं त्याने खाऊन टाकली. कुबेराला काही कळालं नाही कि गणपती का हसतोय. कुबेराने शंकर पार्वतींना आपल्या घरी जेवायला यायचं आमंत्रण दिलं. शंकर पार्वतींनी ओळखलं कि कुबेराला गर्व झाला आहे आणि आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करण्यासाठी म्हणून तो आपल्याला बोलावत आहे. त्यांनी आमंत्रण स्वीकारण्याचा संकोच केला. पण बाजूला बसलेल्या बाल गणपतीने मात्र कुबेराकडे जाण्याचा हट्ट धरला. त्याला तिकडे भरपूर काही खायला मिळणार होते. आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी शंकर पार्वतींनी कुबेराचं आमंत्रण स्वीकारलं आणि दुसऱ्या दिवशी ते गणपती आणि कार्तिकेयासह कुबेराच्या घरी गेले. मार्गामध्ये गणपतीने स्वतःला चिखलाने माखून घेतलं. कुबेराच्या घरी जाताच त्याने सर्व जमिनीवर लोळून सर्व जमीन आणि गालिचे चिखलाने माखून टाकले. कुबेराला हे काही कळेना. त्याने गणपतीला विचारलं "तू असं का केलंस?" गणपती म्हणाला "तुमच्या संपत्तीला दृष्ट लागू नये म्हणून मी हे केलं". गणपतीला खूप भूक लागली होती. त्यामुळे त्याने थेट स्वयंपाकघर गाठलं. आणि तेथे जे काही दिसेल ते त्याने खायला चालू केलं. क्षणार्धात त्याने सर्व अन्न संपवलं अगदी कच्च अन्न, कच्च्या भाज्या पण संपवल्या. पण त्याची भूक काय मिटली नाही. आणि तो अजून खायला मागू लागला. कुबेराला काहीच कळेनासं झालं. त्याने शंकरांना ह्यावर उपाय विचारला. तेव्हा शंकरांनी गणपतीला जवळ बोलावून त्याला मूठभर लाह्या आणि गूळ खायला दिले. तेव्हांकुठे गणपतीची भूक मिटली. शंकर कुबेराला म्हणाले "कुबेरा, तू जे काय दिलंस ते अभिमानाने दिलंस. तूला तुझ्या संपत्तीचा गर्व झाला आहे. तू गणपतीला जर प्रेमाने मूठभर जरी लाह्या आणि गूळ खायला घातले असतेस तर त्याची भूक मिटली असती"
ह्या कथेचा मतितार्थ हाच कि देवाला कुठलीही गोष्ट अर्पण करताना त्यात प्रेमभाव पाहिजे. अभिमानाने आपण अगदी मोठ्यातली मोठी आणि महागातील महाग वस्तू जरी दिली तरी देव प्रसन्न नाही होत.
पुढील आठवड्यामध्ये गणपतीच्या ३२ रूपांची माहिती प्रकाशित करू.
No comments:
Post a Comment