या अवतारात विनायकाने धुमदैत्याला ठार मारले. त्याने आपले विशाल मुख उघडून सैन्यासहित धुमदैत्याला गिळून टाकले.
रक्तवर्ण अंगकांतीचा, शुभ्रवस्त्र परिधान केलेला, चतुर्बाहु, त्रिनयन, मस्तकावर किरीट-कुंडले धारण केलेला, दिव्य कांतीचा, कमल, परशु, मोदक, मुक्तामाला, वनमाला हाती धारण केलेला, शुण्डाधारी, एकदंत, शूर्पकर्ण, विशालनेत्र असे त्याचे स्वरूप आहे.
पूर्वी विंध्याचल प्रांतात महीपार्वती नगरात धुमदैत्यराजा राज्य करीत होता. आपल्या पराक्रमाने त्याने सर्व देवांना व राक्षसांना जिंकले होते. तो काळ्या वर्णाचा, दांतही काळे असलेला असा दैत्यराज होता. त्याचा पूर्ण त्रैलोक्यात दरारा होता. त्याच्या राज्याचे आठ प्रधान होते. सर्वच पराक्रमी होते. चार शूर बलवान पुत्र होते व सुंदर अशी पट्टराणी होती. राज्य धनधान्य संपत्तीने समृद्ध होते. हा धूम्रदैत्य शंकराचा भक्त होता. दिवसरात्र हा श्री शंकराच्या आराधनेत मग्न असे.
एकदा तो आपल्या सभामंडपात, आपल्या पुत्रांसमवेत व प्रधानासमवेत बसला असता भृगुऋषी तेथे आले. अचानक भृगुऋषींना आलेले पाहताच दैत्यराजाला आनंद झाला. त्याने भृगुऋषींना आपल्या सिंहासनावर बसवून त्यांचे यथाविधी पूजन केले. भृगुऋषींना समाधान वाटले. त्यांनी आश्रमात जाण्यासाठी निरोप घेतला. तेव्हां राजाने त्यांना विचारले "मी गेल्या जन्मी असे कोणते सत्कर्म केले होते की या जन्मी धनधान्य संपत्तीने समृद्ध असलेल्या नगरावर मी राज्य करतो आहे. मला सुशील पत्नी व शूर आज्ञाधारक असे चार पुत्र आहेत. दैत्य असूनही मला श्री शंकरांचीच भक्ती करावीशी वाटते ते कां?"
भृगुऋषींनी उत्तर दिले "गेल्या जन्मी तूं विकृती नामक राजा होतास. अत्यंत पराक्रमी होतास. तसेच सत्यशील, सद्गुणी, परमेश्वराचा भक्त होतास. तू ऋषींच्या परवानगीने नव्याण्णव यज्ञ केलेस. ते पाहून इंद्राला राग आला व त्याने नारदाला शंभराव्या यज्ञात विघ्न निर्माण करण्यासाठी पाठवले. नारदाने विप्रवेष धारण करून त्याच्याकडे विचित्र दान मागितले व ते न दिल्याने नारदाने त्याला शाप देऊन त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला. राजाला आपला शंभरावा यज्ञ पूर्ण करता आला नाही. नव्याण्णव यज्ञ केल्याच्या प्रभावाने त्याला वैभव प्राप्त झाले. पण नारदाच्या शापाने त्याचा दैत्यकुळात जन्म झाला. अशी पूर्वजन्माची कथा सांगून भृगु ऋषी निघून गेले.
ज्या नगरात धुमदैत्य राज्य करीत होता त्याच नगरात माधव नावाचा श्रीमंत गुणवान ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुमदा होते. ती पतिव्रता होती. त्या दोघांना मुलबाळ नव्हते म्हणून दोघेही दुःखी होते. पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण ते सर्व व्यर्थ ठरले!
माधवास अत्यंत राग आला. अविचाराने तो पत्नीस म्हणाला, तू वंध्या आहेस. तुझे तोंडही बघायची माझी इच्छा नाही. सुमदेला दुःख झाले. तिने घर सोडले व निर्बीड अरण्यात गेली. तेथे फिरणाऱ्या क्रूर पशूंची पर्वा न करता तिने तपश्चर्येला सुरुवात केली व विष्णूचा जप करण्यास सुरुवात केली. बारा वर्षे निराहार राहून रात्रंदिवस जप केल्यावर विष्णूने प्रसन्न होऊन तिला सगुण रूपांत दर्शन दिले. सुमदेने आपले दुःख त्याला सांगितले. विष्णूने "मीच तुझ्या पोटी जन्म घेईन" असे सांगून तो अंतर्धान पावला. सुमदा परत आपल्या नगरात परतली. तपश्चर्येने तेजस्वी झालेली सुमदा पाहून नगरातील लोकांना आश्चर्य वाटले. ते तिची विचारपूस करू लागले. ही वार्ता धुमराजालाही कळली. तो सैन्यासह तेथे आला. दिव्यकांतीची, दाही दिशांना जिचे तेज व्यापले आहे अशा सुमदेला बघून तोही आश्चर्यचकित झाला. त्याने वस्त्रालंकार देऊन तिचा गौरव केला. दिव्य यान पाठवून माधवास आणले. मग दोघांना त्या यानात बसवून त्यांच्या घरी पाठवले.
घरी आल्यावर सुमदेने सर्व वृत्तांत माधवाला कथन केला. श्री विष्णूंनी दिलेले वरदान ऐकून माधवाला फार आनंद झाला. पुढे काही दिवस गेल्यावर सुमदा गर्भवती झाली. दोघांना आनंद झाला. ते आपला सर्व वेळ धर्माचरणात घालवू लागले.
इकडे शरद ऋतू येताच धूम्रदैत्य आपले पुत्र, अमात्य व प्रचंड सैन्य घेऊन विजय प्राप्त करण्यास निघाला. वाटेत आकाशवाणी झाली "सुमदेपोटी जो पुत्र होईल तो धुमाला ठार मारेल." ही आकाशवाणी ऐकून धूम्रदैत्य बेशुद्ध झाला. पुत्रांनी व प्रधानांनी त्याला परत राजवाड्यात आणले.
शुद्धीवर आल्यावर धूम्रदैत्याला आकाशवाणीचे स्मरण झाले. तो भयाने पछाडला व भयभीत झालेल्या दैत्याने मृत्यू टाळण्यासाठी काय करावे यासाठी सभा बोलावली. सभेमध्ये त्याचे आठही प्रधान व चार पुत्र होते.
प्रधानांनी आपापली मते दैत्याला ऐकवली. कुणी म्हणे, मृत्यूचे भय बाळगू नये, कुणी म्हणे सुमदेला न मारता फक्त तिच्या बाळास मारावे. कुणी सांगितले स्वतः विष्णू सुमदेच्या उदरी जन्म घेणार आहे तेव्हां तो पुत्र आधी पहावा, त्याच्याकडे सूक्ष्म दृष्टीने पहावे, त्याच्याशी बोलून बघावे. एका प्रधानाने सांगितले शत्रूला मारणे हे पाप ठरत नाही, तर एका प्रधानाने कपटाने शत्रूचा नाश करावा असे सुचवले. दैत्याच्या मुलांनी सुमदेला तिच्या गर्भासहीत आत्ताच मारावे नाहीतर अनर्थ होईल असेही सांगितले. सर्वांची चांगली वाईट मते ऐकून दैत्यराजाने सभा विसर्जन केली व खेदाने तो उठून गेला.
धुमदैत्याने अखेर सुमदेला गर्भासहीत मारण्याचे ठरवले व विद्रुम नावाच्या आपल्या प्रधानाला मध्यरात्री पाचशे सैनिक घेऊन माधवाच्या घरी धाडले. विद्रुम माधवाच्या घरी आला व त्याने गृहद्वार फोडून घरात प्रवेश केला. त्याच्या सैनिकांनी गाढ सुखनिद्रेत असलेल्या सुमदा व माधवला त्यांच्या मंचकासहीत उचलले व घोर अरण्यात आणले. सुमदेला मारणे त्याला अनुचित वाटले पण राजाची आज्ञा पाळणे भाग होते.
इतक्यात सुमदेला जाग आली. तिने पाहिले हे आपले घर नसून आपण निर्बीड अरण्यात आहोत. तिने घाबरून माधवास उठवले. दोघांनी आपल्या सभोवताली असलेल्या विद्रुमाच्या सैनिकांना व विद्रुमास पाहिले व अरण्यात आणण्याचे कारण विचारले. विद्रुमाने तिला दैत्याने ऐकलेली आकाशवाणी सांगितली व राजाज्ञेने तुला गर्भासहीत मारण्यास मी आलो आहे. सुमदेने, अपराध नसतांना मारणे हे पाप आहे, तेव्हां तूं राजाला सुमदेला मारली असे खोटें सांग. चांगल्या कामाकरता खोटे बोलणे पाप ठरत नाही, असे विद्रुमाला विनवले. शेवटी तू ऐकले नाहीस तर शाप देऊन तुझे तात्काळ भस्म करीन असेही धमकावले. पण विद्रुमाने तिचे ऐकले नाही.
शेवटी हताश होऊन तिने विष्णूचा धावा सुरु केला. तिच्या विष्णुस्मरणाच्या प्रभावाने अनेक अक्राळ विक्राळ हातात शस्त्रे घेतलेले भयंकर वीर निर्माण झाले. त्यांच्या सिंहगर्जनेने आभाळ व्यापले. ते अक्राळ विक्राळ भयंकर सैन्य पाहून विद्रुमाचे सैन्य घाबरून पळू लागले. स्वतः विद्रुमाने घाबरून पलायन केले व तो राजसदनात परत आला.
विद्रुमाचा पराभव झाला हे दैत्यराजाला हेरांकरवी समजले. तो अत्यंत क्रोधीत झाला व मान खाली घालून उभा असलेल्या विद्रुमाला त्याने आपल्या खड्गाने ठार मारले. सन् नावाच्या अमात्याने ते पाहून धुमदैत्यास सांगितले "सुमदे भोवती चोवीस तास सर्व विश्वासू सैनिकांचा पहारा ठेवा व बालक जन्माला आले की लगेच त्याला ठार मारावे. हे ऐकून धुमदैत्याला अतिशय आनंद झाला. तो सन्ला म्हणाला तूंच हे कार्य गुप्तपणे कर. धुमदैत्याच्या आज्ञेवरून सन् अमात्याने अरण्याच्या चारही वाटा रोखल्या. पूर्व - पश्चिम दिशांचे सैन्यासहित तो स्वतः रक्षण करीत होता. दक्षिण उत्तर दिशांना त्याने त्याचे विश्वासू सैनिक ठेवले. ते सर्वजण बालकाचा जन्म होताच त्याला मारण्यासाठी जागृत होते. माधव-सुमदा दुःखमग्न अवस्थेत कंदमुळे भक्षण करून राहत होते.
नऊ मास भरतांच सुमदा प्रसूत झाली व तिने एका तेजस्वी बालकाला जन्म दिला. रक्तासारखी लाल अंगकांती असलेला, मुक्तिमाला धारण केलेला, श्वेत वस्त्र परिधान केलेला, चार बाहू असलेला, हातात कमल, परशु, मोदक, मुक्तामाला ही आयुधे, शुण्डाधारी, एकदंत, कानात कुंडले, डोक्यावर मुकुट, असे हे दैदिप्यमान बालक जन्माला आले. सुमदेला वर मिळाल्याप्रमाणे विष्णुरूपाने तिच्या पोटी विनायक जन्मला. माधव-सुमदेला अत्यंत आनंद झाला. "इहलोकी सुख भोगून अंती मोक्ष पावाल" असे वरदान विनायकाने दोघांना दिले. "आता मी धुमदैत्याला ठार मारतो" असे बालकाचे भाषण ऐकतांच सुमदा शंकित झाली. हे कळतांच विनायक धरणीवर निश्चेष्ट पडला. ते पहाताच सुमदा घाबरली व त्याच्या मुखाकडे पाहू लागली. तो तिने त्याच्या मुखात अष्टवसू, इंद्रादी देव, चौदा भुवने, पर्वत, नद्या पाहिल्या. तिचा संशय निवळला. मोठ्या प्रेमाने तिने देवाला स्तनपान दिले. त्याने तृप्ती न होता बालक मोठ्याने रडू लागले. बालकाचे रुदन ऐकून पहारा ठेवून असलेले सर्व रक्षक धावले व त्यांनी सुमदे भोवती वेढा घातला. पण ते तेजपूर्ण, अलौकिक बालक पहाताच सर्वजण घाबरले व ओरडत, धावत, अडखळत, पडत कसेतरी दैत्यराजाकडे पोहोचले व ही जन्माची वार्ता त्यांनी दैत्यराजाला सांगितली.
प्रथम ती वार्ता ऐकून धुमदैत्य मूर्च्छित झाला. परंतु नंतर सावध होऊन आवेशाने हातात शस्त्रास्त्रे घेऊन सिंहगर्जना करीत निघाला. तो अरण्यात वेगाने पोहोचला. सुमदेच्या बाळाकडे त्याने रागाने पाहिले. पण तो भयकंपितही झाला. त्याने तीक्ष्ण शस्त्र हातात घेऊन अचूक नेम धरला, तोच सुमदेचा बालक गगनापर्यंत वाढला व त्याने आपले विशाल मुख उघडले व धुमदैत्याला, त्याच्या प्रधाना आणि सैन्यासहित गिळून टाकले. धुमदैत्याचा विनायकाने नाश केल्यावर देवादिकांनी स्वर्गातून विनायकावर पुष्पवृष्टी केली. त्याच्या जयजयकाराने दशदिशा दुमदुमल्या. सगळीकडे आनंदीआनंद झाला. ब्राह्मणांनी, ऋषींनी धावत येऊन विनायकाचे पूजन व स्तवन केले. अशातऱ्हेने धूमाचे हनन करून विनायकाने त्रैलोक्याला सुखी केले. धुमाचे हनन केले म्हणून विनायकाचे नांव धूमकेतू पडले. आपले कार्य करून विनायक अंतर्धान पावला.
अशातऱ्हेने विनायकाचा धूमकेतू अवतार संपन्न झाला!

No comments:
Post a Comment