हे पाडळ पेथ्र स्थळ कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. कुंभकोणम-पट्टिश्वरम मार्गावर कुंभकोणम पासून १२ किलोमीटर्स वर आहे. पट्टिश्वरम पासून २ किलोमीटर्सवर आहे. शैव संत अप्पर ह्यांनी ह्या मंदिराची तसेच पळैयरै वडथळी शिव मंदिराची पण स्तुती गायली आहे. शैव संत अरुणागिरिनाथर यांनी येथील श्री मुरुगन ह्यांची स्तुती गायली आहे. चोळा साम्राज्याच्या राजांनी हे मंदिर बांधलं. सहाव्या आणि सातव्या शतकामध्ये हे मंदिर जैनांनी बंद करून आपले मठ उभे केले होते. चोळा राजांनी त्यांना विरोध केला. ह्यावरून हे लक्षात येते की मूळ मंदिर १६०० वर्षांपेक्षाही जुनं असावं. हे मोडकळीस आलेलं मंदिर आहे आणि सध्या चोळा राजांनी बांधलेल्या ह्या ऐतिहासिक मंदिराच्या जीर्णोद्धाराचे प्रयत्न चालू आहेत.
प्राचीन काळी हे स्थळ चोळा साम्राज्याच्या राजधानीचा भाग होता. पळैयरै शहराचा आवारा साधारण ८ किलोमीटर्स ३.५ किलोमीटर्स होता. ह्या मध्ये बरीच गावे समाविष्ट आहेत जशी - पट्टिश्वरम, मूळयुर, उदैअलूर, शक्तीमुथ्रम, चोळनमळीगै (राजवाडा), दारासुरम आणि रामनाथन कोविल. पळैयरै हे चार विभागांमध्ये विभागलं होतं. ते चार विभाग असे - वडथळी (वड - उत्तर, थळी - मंदिर), मत्राळी, किळथळी आणि थेनथळी. हे मंदिर किळथळी येथे आहे. ह्या स्थळाच्या उत्तरेला मुडीकोंडण (पळैआरू) नदी आहे तर दक्षिणेला थिरुमलैरायन नदी आहे.
मूलवर: श्री सोमनाथर, श्री सोमेसर, श्री चंद्रमौळीश्वरर
देवी: श्री सोमकमलांबिका
पवित्र तीर्थ: सोमतीर्थ, जटायू तीर्थ, इंद्र तीर्थ, कमला तीर्थ
क्षेत्र वृक्ष: गुजबेरी (आवळा)
पुराणिक नाव: पळयरैनगर, नंदीपुरम, मुडीकोंड चोळापुरम, राजराजापूरम
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार गरुडाला आपल्या आईला बंधनातून मुक्त करण्याची इच्छा होती. ह्यासाठी तो इंद्रदेवांकडून अमृताचा कलश घेऊन परत येत असताना असुरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी असुरांबरोबरच्या युद्धामध्ये अमृताचे तीन थेंब ह्या जागी पडले. त्या तीन थेंबांचं रूपांतर शिव लिंग, श्री अंबिका देवी आणि पवित्र तीर्थामध्ये झालं. गरुडाने येथे पवित्र तीर्थामध्ये स्नान करून शिव पार्वतींची पूजा केली. ह्या तीर्थाचे नाव जटायू तीर्थ असे पडले.
२. स्थळ पुराणानुसार श्री चंद्राने इथे सोमतीर्थ निर्माण करून भगवान शिवांची पूजा केली आणि आपल्या पापांचं क्षालन केलं तसेच रोगांपासून मुक्ती प्राप्त केली. इथे श्री चंद्राने (सोम) भगवान शिव आणि श्री पार्वती देवी ह्यांची पूजा केली म्हणून इथे त्यांना श्री सोमनाथर आणि श्री सोमकमलनायकी असं संबोधलं जातं.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे: भगवान विष्णू, आदिशेष, चंद्र, गरुड
वैशिष्ट्ये:
१. श्री कैलासनाथर ह्यांची मूर्ती खूप सुंदर आणि अद्वितीय आहे.
२. श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री वीरदुर्गा देवी ह्यांच्या मूर्ती खूप सुंदर आहेत.
३. ह्या ठिकाणी प्रत्येक युगात विशिष्ट वृक्षांचे वन होते. कृतयुगात नीम, त्रेतायुगात केळी, द्वापारयुगात कदंब तर कलियुगामध्ये गुजबेरी (आवळा)
४. चोळा राजाची कन्या आणि मदुराईचा राजा कूनपांडियन ह्यांची पत्नी आणि नयनार मंगैयारकरासी हिचे हे जन्मस्थान आहे.
५. चोळा राजा मनीमुडीदेवन ह्यांचे शैव संत अप्पर ह्यांच्याशी नाते होते.
६. अमरनिधीनायनार ह्यांचे जन्मस्थान इथून जवळ असेलेले नल्लुर गाव आहे.
७. चोळा साम्राज्याच्या शेवटच्या काळात ही जागा राजधानी होती.
८. क्षेत्रपुराणानुसार असा समज आहे कि दक्षिणायनामध्ये ह्या शिव मंदिरासमवेत अजून चार शिव मंदिरांचे दर्शन एका दिवसात घेणे हे हितकारी आणि कल्याणकारी मानलं जातं. बाकीची चार शिव मंदिरे अशी - नल्लूर, वलमचूळी, शक्तीमुथ्रम, पट्टिश्वरम, आवूर.
९. हे खूप थोड्या स्थळांपैकी एक आहे जिथे भगवान विष्णू, गरुड आणि आदिशेष ह्यांनी भगवान शिवांची पूजा केली.
मंदिराबद्दल माहिती:
हे पूर्वाभिमुख मंदिर असून ह्याला दोन परिक्रमा आहेत. मुख्य राजगोपुर हे विस्कळीत अवस्थेत आहे. एक नवीन बांधलेलं राजगोपुर तीन स्तरांचं आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. गाभाऱ्यामध्ये अर्थ मंडप, मुख मंडप आहेत. माड कोविल शैलीप्रमाणेच इथे पण गाभारा ६ फूट उंचावर नवीन राजगोपुराच्या बाजूलाच आहे. ह्या मंदिराची दारासुरम, त्रिभुवनम, चिदंबरम आणि थिरुवारुर ह्या मंदिरांशी साम्यता आहे. इथल्या भिंतींवर भरतनाट्यम च्या विविध मुद्रा चित्रित केल्या आहेत. इथले शिवलिंग स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे.
कोष्ठ मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री अर्धनारीश्वरर आणि श्री ब्रह्मदेव.
गाभाऱ्यावर तीन स्तरांचं गोपुर आहे. त्यावर उमामहेश्वरर आणि गजसंहार ह्यांच्या मूर्ती आहेत. अर्थमंडपामध्ये एका दगडात बनवलेली श्री वीरदुर्गा देवींची मूर्ती आहे. इथे एक भगवान शिवांची मूर्ती आहे ज्याचे नाव कदनथीरकूम (कदन म्हणजे कर्ज आणि थीरकूम म्हणजे परत फेडणे). मुख्य मंडपामध्ये मंगैयारकरासी ह्यांची मूर्ती आहे. श्री अंबिका देवींचे देवालय दक्षिणाभिमुख असून गाभाऱ्याच्या उजव्याबाजूला आहे. ह्या देवालयाच्या जवळ श्री नरसिंह ह्यांचे शिल्प आहे. हे देवालय अशा पद्धतीने बनवले आहे जेणेकरून त्याचा आकार रथासारखा आहे. आतल्या परिक्रमेमध्ये श्री गणेश, श्री सुब्रह्मण्य त्यांच्या पत्नींसमवेत, श्री चंडिकेश्वरर आणि नवग्रह ह्यांची देवालये आहेत. ह्याशिवाय श्री भैरव, श्री सूर्य, श्री चंद्र, नालवर आणि सेक्कीळर ह्यांच्या मूर्ती आहेत.
इथे काही शिल्पे आहेत ज्यामध्ये श्री नारायणांसमवेत प्रल्हाद, श्री नृसिंह हिरण्यकशिपूचा आठ हातांनी वध करताना तसेच रावण कैलास पर्वत उचलत आहे अशी चित्रित केलेली शिल्पे आहेत.
प्रार्थना:
१. भाविक जन इथे विवाहातल्या अडचणींवर मात करण्यासाठी, कलेमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी, तसेच व्याधींमुळे झालेल्या क्लेशांचे निवारण करण्यासाठी इथे प्रार्थना करतात.
२. भाविक जन इथे श्री अंबिका देवींची तणाव आणि मृत्यूपासून मुक्ती मिळविण्यासाठी ११ महिने किंवा ११ आठवडे किंवा ११ सोमवार किंवा ११ शनिवार दिवा लावून पूजा करतात.
३. असा समज आहे कि सोमतीर्थामध्ये स्नान केल्याने मानसिक रोगांपासून मुक्ती मिळते.
४. असा समज आहे की जटायू तीर्थामध्ये स्नान केल्याने कुष्ठरोगापासून मुक्ती मिळते.
पूजा:
नियमित दैनंदिन, साप्ताहिक तसेच पाक्षिक पूजा केल्या जातात. तसेच प्रदोष पूजा पण नियमितपणे केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
आडी (जुलै-ऑगस्ट): आडीपुरं
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
पुरत्तासी (ऑगस्ट-सप्टेंबर): नवरात्री
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंद षष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेम्बर): थिरु कार्थिगई, कार्थिगई दीपम
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): थिरुवथीराई
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकरसंक्रांति, पोंगल
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तरं
मंदिराच्या वेळा: सकाळी ७ ते १२, संध्याकाळी ५ ते रात्री ८
पत्ता: श्री सोमेश्वरर मंदिर, पळैयरै वडथळी, ऍट पोस्ट पट्टिश्वरम, तालुका कुंभकोणम, तामिळ नाडू ६१२७०३
दूरध्वनी: ९१-९८९४५६९५४३
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.
No comments:
Post a Comment