गुरु योग्य असल्यावरी | वायां न जाई सेवा खरी |
कामधेनु असल्या घरीं | कां न इच्छा पुरतील? ||
- अध्याय १३ - श्री गजानन विजय
- अध्याय १३ - श्री गजानन विजय
संत सांगतात की ज्यांना आयुष्यात सर्व सुखं विनासायास (effortless) मिळवायची असतील त्यांनी गुरुसेवेचा सोपा मार्ग अवलंबावा. माता पार्वतीने आपल्या मुलांच्या, म्हणजेच साऱ्या विश्वाच्या, काळजीने जेव्हा भगवान शंकरांना विचारले की कुठल्या अशा सोप्या उपायांनी तिची मुलंमुली सर्व दु:खांपासून मुक्त होऊन, सर्वसुखी होऊन, परमपदाला पोचतील, तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले की गुरुसेवा ह्या एकमेव सोप्या उपायानी सर्व दु:खांची निवृत्ती होऊन न भंगणाऱ्या सुखाची प्राप्ती होते. हा माता पार्वती आणि भगवान शंकरांमधला संवाद गुरुगीता ह्या नावाने प्रसिद्ध आहे.
खऱ्या खऱ्या संतांची | सेवा न जाई वायां साची |
परी निष्ठा मानवाची | जडणे तेथे अशक्य ||
- अध्याय २० -श्री गजानन विजय
परी निष्ठा मानवाची | जडणे तेथे अशक्य ||
- अध्याय २० -श्री गजानन विजय
गुरुसेवा घडल्यावर सर्व सुखांची प्राप्ती होते हे खरं असलं तरी माणसाची गुरुवर निष्ठा जडणं हे खूप आवश्यक आहे. प्रथम गुरुसेवा घडायची म्हणजे गुरु पाहिजे. आणि गुरु प्राप्त होण्यासाठी गुरु प्राप्त होण्याची इच्छा पाहिजे. इच्छा तेथे मार्ग अशी मराठीत म्हण आहे. गुरु प्राप्त होण्याची प्रबळ इच्छा असेल तर गुरु कधीना कधीतरी नक्की प्राप्त होतात. माणसाचा पहिला गुरु म्हणजे माता. माता आपल्या मुलामुलींना पिता ह्या गुरूशी ओळख करून देते. माता आणि पिता ह्यांची सेवा घडली की आपोआपच सेवेची वृत्ती वाढते आणि त्यातूनच गुरुसेवेची इच्छा उत्पन्न झाली की गुरूंची प्राप्ती होते. असं म्हणतात की अशी मनाची अवस्था झाली की गुरूच शिष्याला शोधत येतात.
म्हणे दास सायास त्याचे करावे | जनी जाणता पाय त्याचे धरावे ||
- मनाचे श्लोक
- मनाचे श्लोक
एकदा का गुरु प्राप्त झाले की त्यांचे पाय कधी सोडू नयेत. सर्व सायास हे गुरूंच्या सेवेसाठी करावेत. आता मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे गुरुसेवा कशी करावी. जेव्हा गुरु आपल्या सान्निध्यात असतील तेव्हा गुरूंची सोय पाहणे म्हणजेच गुरुसेवा होय .गुरूंची सोय पाहताना गुरु हे आपल्या बरोबर अजून अनेक जणांची काळजी वाहत आहेत हे लक्षात घेऊन गुरूंना त्यांच्या सर्वांची काळजी वाहण्याच्या कामात मदत करावी. आपल्याबरोबर बाकीच्यांना पण गुरुकृपेचा लाभ व्हावा अशी इच्छा धरावी. अर्थातच हे सर्व करत असताना गुरूंची मर्जी राखावी. गुरुंसमोर कुठलीही गोष्ट, अगदी आपले गुप्त विचार पण, लपून राहू शकत नाही हे जाणून गुरूंशी प्रामाणिकपणा राखावा. आपल्या वर्तनातून आपण आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना आणि आपण ज्यांचं हित चिंतितो त्यांना गुरुसेवेचा बोध द्यावा. शब्दांपेक्षा वर्तन पाहून माणूस जास्त लवकर शिकतो.
गुरु सान्निध्यात नसतील तेव्हा गुरूंनी सांगितलेली कामे काटेकोरपणे करणे ह्यालाच गुरुसेवा म्हणतात. गुरु आपल्या शिष्यांना स्वतः शिष्यांपेक्षा जास्त चांगल्या रीतीने ओळखतात. ते प्रत्येक शिष्याचा स्थायी भाव जाणून त्याप्रमाणे त्याला किंवा तिला योग्य अशी उपासना करायवयास सांगतात. ही उपासना काटेकोरपणे नित्य चालू ठेवणे म्हणजेच गुरुसेवा करणे. मग ती उपासना म्हणजे कुठला अध्याय वाचायला सांगितलेला असो किंवा घरच्या देवाला नैवेद्य दाखविण्यास सांगितलेला असो किंवा घरच्या देवासमोर दिवा लावण्यास सांगितलेला असो किंवा मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला सांगितलेलं असो, गुरूंच्या उपदेशावर कुठलीही शंका न घेता ती उपासना काटेकोरपणे नियमित पणे पार पाडावी.
स्वतःच्या कल्पनेनी केलेली उपासना आणि गुरूंनी उपदेशिलेली उपासना ह्यातला फरक लक्षात घेण्यासारखा आहे. गुरूंनी उपदेशिलेल्या उपासनेत गुरूंचे आशीर्वाद अंतर्भूत असतात. त्यामुळे गुरूंनी उपदेशिलेली उपासना अगदी साधी सरळ सोपी असली -उदाहरणार्थ रोज देवापुढे दिवा लावणे - तरी ती स्वकल्पनेनी केलेल्या उपासने पेक्षा जास्त परिणामकारक असते.ही उपासना करत असताना मनात ही भावना ठेवावी की ही उपासना आपल्या सर्वांगीण विकासासाठी असून, अंती समाधान देणारी आहे. जेवढा विश्वास दृढ तेवढं जास्त समाधान. सुखापेक्षाही समाधान हे जास्त काळ टिकतं आणि सुखापेक्षा अनेक पटींनी जास्त आनंद देतं.
शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी |
- साईबाबांची वचने
- साईबाबांची वचने
आत्तापर्यंत योग्य गुरु प्राप्त होऊन त्यांना शरण गेलेल्या माणसाचं आयुष्य वाया गेल्याचं ऐकिवात नाही. किंबहुना गुरूंना शरण न गेल्यामुळे आयुष्य वाया गेल्याची अनेक उदाहरणं इतिहासात सापडतील. आयुष्य खूप छोटं आहे आणि अनिश्चित आहे. सध्याच्या जगात चांगले गुरु भेटणं हे पण कठीण होत चाललं आहे. त्यामुळे योग्य गुरु प्राप्त झाले असतील तर त्यांच्या आज्ञेत राहून त्यांची सेवा करून आपलं आयुष्य सावरणं हाच सुज्ञपणा होय.
माता धन्य पिता धन्य | ज्ञाती कुल वंश धन्य |
धन्य वसुधा देवी धन्य | धन्य धन्य गुरुभक्ती ||
- गुरुगीता
- गुरुगीता
खरोखर, ज्या स्त्री पुरुषांच्या हातून गुरूंच्या चरणांची सेवा घडते त्यांचे माता पिता धन्य होत. ते आपल्या वंशाला आणि कुळाला धन्यता आणतात. तेवढंच नव्हे तर ते पृथ्विमातेलापण धन्यता आणतात. धन्य धन्य ते गुरुभक्त आणि धन्य त्यांची गुरुभक्ती.