Thursday, September 29, 2011

शारदीय नवरात्रोत्सव



("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिकएम. एह्यांच्या पुस्तकातून)

अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाची पूर्वपीठीका प्रथम जाणून घेऊ. 


देवीची साडेतीन पीठे (गाद्या) आहेत. त्यांचा क्रमच लावावयाचा झाल्याससर्व प्रथम येते ती कोल्हापूरची अंबाबाई अर्थातच श्री महालक्ष्मी. ही देवी सात्विकतेचे द्योतक आहे व कोल्हापूरचे पीठ हे पूर्णपीठ मानले जाते. त्यानंतर राजसपणाचे प्रतिक म्हणजेच तुळजापूरची भवानी. हे दुसरे पूर्ण पीठ होय. माहुरची महामाया रेणुका ही परशुरामाची माता तसेच जमदग्नींची पत्नी असून तिचे स्थान हे तिसरे पूर्ण पीठ आहे. नाशिकची (वणीची) सप्तश्रुंगी जगदंबा अथवा अंबाजोगाईची योगेश्वरी ह्यांना अर्धपीठ समजले जाते. कुलाचाराप्रमाणे ह्या दोन्ही देविंपैकी एका देवीला अर्धपीठ मानणारे लोक आहेत. देशामध्ये इतर ठिकाणी असलेल्या देवी ह्या साडे तीन पिठाच्या देवीचीच रूपे आहेत. नवरात्रामध्ये पूजन केल्या जाणाऱ्या देविंमध्ये त्यामुळेच भिन्नभिन्नता आढळते.


देवी बसते म्हणजे काय?


शुंभ-निशुंभमधु-कैटभचंड-मुंडमहिषासुर आदि असुरांचा संहार करण्यास देवीला घनघोर युद्ध करावे लागले. निरनिराळ्या शक्तींचा प्रयोग केल्यावरच ह्या भयानक राक्षसांचा पाडाव होऊ शकला. त्यामुळे श्री विष्णू आदि देवांना देवीस विश्रांती देणे जरुरीचे आहे असे प्रकर्षाने वाटू लागले. नवखंडांतील शत्रूंचा नाश केल्यावर आलेला शीण घालवण्यासाठी प्रत्येक खंडासाठी एक रात्र अशा एकूण नऊ रात्री देवीनी विश्रांती घ्यावी ह्या हेतूने श्री विष्णुंनी देवीला स्थानापन्न व्हावे असे सांगितले. अशा प्रकारे स्थानापन्न झालेल्या देवीला 'देवी बसलीअसे म्हणतात. संपूर्ण नवरात्रीच्या काळात देवीला स्थानभ्रष्ट करू नयेम्हणजेच तिच्या विश्रांतीला धक्का लावू नयेअसा संकेत आहे.


देवी बसविण्याच्या भिन्न-भिन्न पद्धती 


नवरात्र हा जसा सण आहे तसेच ते व्रतसुद्धा आहे. कुलाचाराप्रमाणेजाती-जमाती प्रमाणेप्रदेशाप्रमाणे वगैरे विभिन्न पद्धती यासंबंधी आचरणात आणल्या जातात. जातीनिहाय उहापोह करणे शक्य नाही पण काही ज्ञाती अवलंबित असलेल्या प्रथा येथे उद्धृत केल्या आहेत.


नवरात्र याचा शब्दश: अर्थ नऊ रात्री असा आहे. म्हणजेच देवी नऊ रात्री बसलेल्या (विश्राम घेत असलेल्या) असावयास हव्यात. हा अर्थ धरल्यास अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसलेली देवी ही दसऱ्याच्या दिवशीच उठवली गेली पाहिजेपरंतु कुलाचाराप्रमाणे काही ज्ञातीत नवमीची पूजा झाल्यावर देवीला उठविले जाते. त्याचप्रमाणे काही कुटुंबामध्ये फक्त कुलस्वामिनीची स्थापना करून तिला नऊ दिवस झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जातात. त्यांच्याकडे घटस्थापना आणि धान्याचे रोह लावण्याची प्रथा नसते. तसेच कुमारिका व सुवासिनी पूजन सुद्धा फक्त देवी बसता-उठता केले जाते. अखंड दीपप्रज्वलन मात्र असतेच असते. अशा मर्यादित स्वरुपात नवरात्र उत्सव काहीजणांकडे केला जातो. 


ज्यांच्याकडे विस्तृत स्वरुपात नवरात्र साजरे केले जाते त्यांची सर्वसाधारण पद्धती अशी आहे की कुलस्वामिनीची स्थापना करून त्याचबरोबर घटस्थापना तसेच घटाभोवती माती पसरून त्यात सप्त धान्ये (सालासह भात, ज्वारीबाजरीगहूकांगजवसचणे) पेरली जातात. कुलस्वामिनीचा टाक तसेच श्रीफळ ठेवलेला घट ह्यांच्यावर झेंडूची फुलेतिळाची फुले अथवा नागवेलीची पाने ह्यांच्या माळा नवरात्रीचे सर्व दिवस बांधल्या जातात. माळाच काएखादे पुष्प का नाहीह्याला तसा शास्त्रीय आधार काही नाही. फक्त टाक लहान असून एक-एक फुल जरी नऊ दिवस वाहिले तरी टाकाचे दर्शन होणार नाही म्हणून माळा बांधण्याची पद्धत अस्तित्वात आली असावी. तसेच ज्या विभागात जी फुले मुबलक त्या फुलांच्या माळा करण्याची पद्धत आली असावी. अखंड दीपप्रज्वलन हे सुद्धा आलेच.


नवरात्रीच्या व्रतामध्ये कुमारी पूजनाचे महत्व विशेष आहे. यथासांग नवरात्र साजरे करणाऱ्या कुटुंबामध्ये नवरात्रीचे सर्व दिवस कुमारिका व सुवासिनींचे पूजन केले जाते. तसेच अष्टमीला नऊ सुवासिनींची ओटी भरून विशेष हळदी कुंकू करण्याची प्रथा आहे. नवरात्रीमध्ये आपण करणार असू त्याचा संकल्प गुरुजींकडून पूजा करताना सोडावा लागतो. नऊ दिवस कुमारिका पूजन केल्यास शास्त्राप्रमाणे पृथ्वीचे राज्य मिळतेतर फक्त देवी बसता-उठता कुमारिकेचे पूजन केल्यास भोग व मोक्षप्राप्ती होते.


श्री देवी महात्म्यात सांगितल्याप्रमाणे एक वर्षाच्या कन्येचे पूजन करू नये. कुमारिका दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतची असावी. दोन वर्षाच्या मुलीची कुमारिका म्हणून पूजा करावीतीन वर्षाच्या कन्येची त्रिमूर्ती म्हणूनचार वर्षाची कल्याणीपाच वर्षाची रोहिणीसहा वर्षाची कालीसात वर्षाची चंडिकाआठ वर्षाची शांभवीनऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा म्हणून पूजा करावी. घरातील कर्त्या माणसांनी उपवास करावेत. नवरात्रीच्या नऊ दिवसात श्री देवी महात्म्याचे वाचन करावे. ते शक्य नसल्यासअष्टमीच्या दिवशी बारावा अध्याय वाचावा अथवा नवार्णव मंत्राचा १०८ वेळा होम करावा.काही ज्ञातीमध्ये कुलदेवतेबरोबरच कुलस्वामींना सुद्धा पुष्पमाला घालण्याची पद्धत आहे. 


काही ज्ञातीमध्ये सप्तमीला घरातील कर्ती स्त्री डाळ-तांदुळाचा जोगवा पाच घरी मागूनतो शिजवून त्याचाच नैवेद्य देवीला दाखवते. देवीला वरण-पुरणाचा नैवेद्य नित्यनेमाने दाखवून चालतोपरंतु शास्त्राप्रमाणे कुमारिकेला दररोज नूतन वस्त्र देऊन तिचा सन्मान करावा व नैवेद्याच्या जेवणात खाली दिल्याप्रमाणे पदार्थ ठेवावेत. शक्य झाल्यास उत्तम फलप्राप्तीसाठी खाली दिलेले दिवस व त्याखाली दिलेल्या वारांची सांगड घालून नैवेद्य तयार करावा. 


नवरात्रीतील दिवस क्रमांक
नैवेद्यातील पदार्थ
अपेक्षित फलप्राप्ती
१ ला
तूप
निरोगीपणा
२ रा
साखर
दीर्घायुष्य
३ रा
दुध
दु:खनाश
४ था
अनारसे
विघ्ननाश
५ वा
केळी
बुद्धीवृद्धी
६ वा
मध
तेजवृद्धी
७ वा
गुळ
शोकनाश
८ वा
नारळाचे पाणी
तापनाश
९ वा
लाह्या
इहलोक सुख


वारांप्रमाणे नैवेद्यातील पदार्थ व त्यामुळे होणारी फलप्राप्ती खालीलप्रमाणे आहे.



वार
पदार्थ
फलप्राप्ती
रविवार
पायस (खीर)
सुखसमृद्धी
सोमवार
गाईचे दुध
प्रगल्भता
मंगळवार
केळी
सुबुद्धी
बुधवार
लोणी
स्वर्गलोक
गुरुवार
खडीसाखर
सुखप्राप्ती
शुक्रवार
सीताफळ
(शीतलता देणारे फळ)
दु:खनाश
शनिवार
हरभऱ्याचा पदार्थ
नेत्रदोष नष्ट 


नवरात्रीचा २ रा दिवस बुधवारी आल्यास दुसरा दिवस म्हणून साखर व बुधवार म्हणून लोणी घ्यावे. ज्या लोकांची देवी शत्रूंचे निर्दालन करून राज्य उपभोगणारी आहेअशा देवींना अष्टमीला बळी लागतो. तसेच अष्टमीलाच घागर फुंकण्याची सुद्धा प्रथा आहे. ह्याच दिवशी काही ज्ञातींमध्ये लग्नापासून पाच वर्षे नवविवाहिता पुत्रप्राप्ती व ऐश्वर्यासाठी खड्यांच्या महालक्ष्मीची सुद्धा पूजा करतात. 

हल्ली जर चार भाऊ वेगवेगळे राहत असतील तर एकाकडेच नवरात्र करतातपरंतु हे अयोग्य असून चारही भावांकडे स्वतंत्र नवरात्र होणे आवश्यक आहे. सार्वजनिक नवरात्र हा प्रकार तर सर्वथा अयोग्य आहे. गुजरात मध्ये असलेल्या ह्या प्रथेचा तेथून महाराष्ट्रात आलेल्या समाजाने चालू केलेल्या ह्या उत्सवास समाज विघातक असे वळण मिळालेले आपणाला दिसेल. ओळीने नऊ रात्री अती कर्कश वाद्यांच्या साथीने गरबा खेळून शांतता भंग करणेकितपत योग्य आहेयाचा संबंधीतांनी विचार करावा. 


पुरवणी 


नवरात्रीत आपण ज्या दुर्गेची आपण पूजा करतो तिची नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी निरनिराळी रूपे असतात. अर्थातच देवीचे पूजन करताना तिची खालील नामरूपे लक्षात ठेवावीत. 


प्रथमेस - शैलपुत्री 
द्वितीयेस - ब्रह्मचारिणी 
तृतीयेस - चंद्रघंटा 
चतुर्थेस - कुष्माण्डा
पंचमीस - स्कंदमाता 
षष्ठीस - कात्यायनी 
सप्तमीस - काळरात्री
अष्टमीस - महागौरी 
नवमीस - सिद्धदात्री 



नवरात्रीतील पंचमीस 'ललिता पंचमीम्हणतात व काही कुटुंबात तेव्हा उपांगललिता हे व्रत केले जाते. हे व्रत पुत्रपौत्र प्राप्तीधनधान्यसमृद्धीकौटुंबिक स्वास्थ्य ह्यासाठी कुटुंबप्रमुखाने करावयाचे आहे. ह्या व्रतासाठी पूर्ण रात्रभर असलेली पंचमी घ्यावी. ह्या व्रतात ललीतादेविला ४८ दुर्वांची एक जुडी ह्याप्रमाणे ४८ जुड्या वहाव्यात. ह्यासाठी पंचमीला ललीतागौरीची स्थापना व दुसरे दिवशी विसर्जन करावे लागते. 


नवरात्रीमध्येच येणाऱ्या सप्तमीस 'सरस्वतीशयन सप्तमीअसे म्हणतात. श्रीदेवी महात्म्यामध्ये सांगितल्या प्रमाणे सप्तमीपासून दशमी पर्यंत पठण-पाठणलेखन ह्या गोष्टी ह्या काळात बंद ठेवाव्यात कारण सरस्वतीने शयन केलेले असते. ह्या संदर्भात हे लक्षात घ्यावे की गुरुकुलात शिकत असलेल्या शिष्यांसाठी हा उपदेश आहे. नित्यनेमाने करावयाच्या वाचन-लेखनाला हरकत नाही.


नवरात्री व्रत हे वास्तविक पहाता नऊ रात्रींचे व्रत आहे पण सध्याच्या वेगवान जगात ९ दिवस यथासांग पूजन करण्यास वेळ मिळणे सुद्धा नव्या पिढीला कठीण आहे. अशा परिस्थितीतशास्त्रानेच सर्व पूजा वगैरे विधी नवमीला करण्याची सोय ठेवली आहे. त्याला 'एकदिवसीय नवरात्रअसे म्हणतात. ह्या एका दिवसातच नऊ दिवस होणारे सर्व कुलाचार पार पाडावे लागतात.

Thursday, September 15, 2011

Art of living


उत्तम पदार्थ दुसर्‍यास द्यावा | शब्द निवडोन बोलावा | सावधपणे करीत जावा | संसार आपुला ||
                                                                                                                            - दासबोध

Good family life is based on good relations and good relations are based on good feelings and good feelings are based on good words. Out of all things that one can offer to other is the word coming out from good feeling. A costliest gift may go unattended or unrecognized if it is not backed up by good feeling whereas even just a word of friendliness receives maximum attention and recognition when it is backed up by good feeling.

The golden rule of behavior also known as theory of reciprocity says - Do not do unto others what one would not like others to do unto oneself. One should not behave or speak with others what one expects others should not behave or speak with oneself. In fact, they say, one should always wish that whatever good possessions one has, same should be possessed by others as well. That is a sign of true well-wisher.

They say that the life can be beautiful if one establishes a practice of speaking words that spread joy and contentment and develops an ability to discriminate between good and bad (विवेक बुद्धी). Both of these can be established by engaging into purification task that helps achieves purification at three levels त्रिकरण शुद्धि.

Shripad Shrivallabh explains the need and importance of this purification task in Shripad Shrivallbh Charitamrut (page 286)

त्रिकरण शुद्धीची आवश्यकता
मानवास दारिद्रयापासून मुक्तता आणि पापकर्मापासुन विमुक्ती हवी असल्यास त्याचे काया, वाचा, मन शुद्ध असावयास हवे. यालाच त्रिकरण शुद्धी असे म्हणतात.  आपल्या मनात जे असेल तेच वाणीतून बाहेर पडावे. मनात दुष्ट भाव आणि वाणीने मधुर बोलणे असा दुटप्पीपणा नसावा. आपल्या वाणी प्रमाणेच आचरण सुद्धा पवित्र असावे. त्रिकरण शुद्धी पावलेला मानव महान पदाला जाऊन पोहोचतो. मनात एक असणे, वाणीतून दुसरेच उच्चारण करणे आणि या दोहोपेक्षा वेगळेच आचरण करणे अशा व्यक्तीस दुरात्मा असे म्हणतात. या कलियुगात जीवन सागर तरून जाण्यास ईश्वराने अनेक मार्ग सांगितले आहेत. यात “नामस्मरण” हे अत्यंत सुलभप्राय साधन आहे. नामस्मरण करणार्‍या साधकाची वाणी मधुर असते. नामस्मरण न करणार्‍याचे मन सुद्धा अशुद्ध असते. नामस्मरणाच्या योगाने पवित्र कर्म करण्याची प्रेरणा मिळते.

Friday, September 2, 2011

गणेश चतुर्थी


("आपले सण - एक सुलभ संकल्पना" - वेदमूर्ती विनायक वासुदेव भातखंडे व विलास मोरेश्वर कर्णिक, एम. ए, ह्यांच्या पुस्तकातून)

संपूर्ण भारतभर, विशेष करून, महाराष्ट्रामध्ये, अत्यंत उत्साहाने साजरे होणाऱ्या ह्या उत्सवाविषयी समाजामध्ये काही समज-गैरसमज आहेत, ते सर्वप्रथम दूर करणे आवश्यक आहे.

केव्हा:
भाद्रपद शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत दीड दिवसाचा, पाच दिवसांचा, गौरी बरोबर विसर्जित होणारा, सात दिवसांचा, एकादशीचा अथवा अनंत चतुर्दशीला विसर्जित होणारा असे विविध दिवस गणपतीचा उत्सव साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे हा उत्सव सप्टेंबर महिन्यात येतो.

परंतु वैदिक शास्त्राप्रमाणे गणपती उत्सव फक्त दीड दिवसाचाच असतो. शास्त्राप्रमाणे गणपतीची पार्थिव मूर्ती म्हणजेच काळ्या चिकणमातीची मूर्ती आकाराने हाताच्या अंगठ्यापासून वितीपर्यंत उंच असावी. मूर्ती मृत्तिकेची असल्यामुळे न भंगता ती फार दिवस टिकणे केवळ अशक्यच आहे. सर्वसाधारणपणे दीड दिवसापर्यंत मूर्ती भंग होण्याची शक्यता नसते आणि म्हणूनच गणेश उत्सव हा दीड दिवसच असायला हवा.

ह्या ठिकाणी हे पण नमूद करणे आवश्यक आहे की, पूर्वी मूर्ती लहान असे. एवढेच नव्हे तर, तिच्यावर फक्त हळद, कुंकू आणि वनस्पतींपासून तयार केलेले रंग ह्यांचाच प्रयोग केला जात असे. परिणामतः ह्या मूर्तीच्या विसर्जनाने प्रदूषण होण्याची शक्यता फारच कमी असे. त्याचप्रमाणे गणपती विसर्जन पाण्यात करणे याला सुद्धा शास्त्राचा आधार नाही.

प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीवर उत्तरपुजेच्या (विसर्जनाच्या) अक्षता टाकल्यावर मूर्तीतील देवत्व नष्ट होऊन ती मूर्ती केवळ मृत्तिका असल्यासारखेच आहे. मातीत माती मिसळून जावी ह्या उद्देशाने विसर्जन शेतात अथवा वाहत्या पाण्यात करावे. विहिरीमध्ये विसर्जन करणे शक्यतो टाळावे कारण त्यामुळे विहिरीचे झरे बंद होण्याचा धोका तर संभवतोच पण त्याचबरोबर मूर्तींना लावलेल्या विचिध केमिकल्सच्या रंगाने पाणी दुषित होते. तीच गोष्ट तलावांच्या बाबतीतपण आहे. शास्त्रीय संकेत बाजूला ठेवल्यास गणपती उत्सवाचे स्वरूप खालीलप्रमाणे असून त्यात सार्वजनिक उत्सवाचा अंतर्भाव नाही.

गणपती कसा व कशाप्रकारे आणावा?
वर उल्लेख केल्याप्रमाणे श्रींची मूर्ती ही वास्तविक पहाता एक वीतेपेक्षा मोठी नसावी. परंतु सध्याच्या काळात ही गोष्ट मान्य करणे जरा कठीणच दिसते. तरीसुद्धा कमीत कमी मूर्ती पोकळ नसावी ही दक्षता घ्यावी कारण पोकळ मूर्तीत प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे गणेश चतुर्थी हा गणेश जन्माचा दिवस आहे म्हणजेच गणेशाची मूर्ती ही बालस्वरूपच असते म्हणून मूर्ती कितीही मोठी असली तरी गणेशाच्या चेहेऱ्यावरचे भाव हे निरागस बालकाचेच असावेत.

मुर्तीकाराकडून मूर्ती घरी आणताना नादमधुर अशा वाद्यांचाच उपयोग करावा. (उदा. झांजा, वीणा, पखवाज वगैरे) कुठल्याही परिस्थितीत कर्कश आवाजांची वाद्ये वाजवू नयेत. श्रींची मूर्ती आणताना तिचा चेहेरा कुणाचीही नजर लागू नये म्हणून वस्त्राने झाकावा. मूर्ती सर्वसाधारणपणे डाव्या सोंडेची असावी. उजव्या सोंडेचा गणपती आणल्यास प्राण प्रतिष्ठेपासून विसर्जनापर्यंत कडक सोवळे पाळायला लागते.

गणपतीची प्राणप्रतिष्ठा शक्यतो सर्वसाधारणपणे पहाटे पाच ते सूर्योदयापूर्वी म्हणजेच अरुणोदय ते सूर्योदयापूर्वी सूर्योदय काळी करावी, असा संकेत असल्याने गणपतीची मूर्ती आदल्यादिवशी आणून ठेवण्याची प्रथा पडत चालली आहे. गुरुजींच्या कार्यबाहुल्यामुळे व त्यांच्या उपलब्धतेची कमतरता असल्यामुळे सुद्धा गणपतीची मूर्ती आदल्यादिवशी आणतात.

पूजा कशी करावी?
गणेशाची प्राणप्रतिष्ठा गुरुजींच्या हस्ते करण्याचा प्रघात आहे, परंतु हे बंधनकारक नसून ज्या व्यक्तींनी गुरुमुखातून संथा घेतली आहे, त्यांनी स्वतः प्राणप्रतिष्ठा करावयास प्रत्यवाय नाही. पुजेची तयारी अशी! (इथे लिहिलेले साहित्य पंचामृती पूजेचे लागते) हळद, कुंकू, गंध, शेंदूर, अबीर, गुलाल, अक्षता, जास्वंद, मंदार अथवा इतर तांबडी फुले, दुर्वा, शमी, केवडा, तुळस (फक्त गणेश चतुर्थीलाच गणपतीला वाहतात) बेल व नानाविध पत्री, श्रीफळ, विड्याची पाने, सुपाऱ्या, जानवी-जोड, गुळ-खोबरं, उदबत्ती, निरांजन, कापूर, स्नानासाठी पंचामृत (दुध, दही, तूप, मध, साखर) अत्तर, गरम पाणी, नैवेद्यासाठी पेढे व उकडीच्या मोदकासह महानैवेद्य.

साहित्याची व्यवस्था केल्यानंतर पुढील कार्य गुरुजी शास्त्राप्रमाणे यजमानांकडून करवून घेतात; पण पूजेला बसण्याआधी यजमानांनी काही दक्षता घेणे आवश्यक आहे. उदा. सोवळे नेसून व खांद्यावर उपरणे अथवा शाल पांघरून, कुंकूम तिलक लावून मगच पूजेसाठी स्थानापन्न व्हावे. त्याआधी घरातील देवांची पूजा झालेली असावी. कुलस्वामिनी व कुलदेवतेस नारळ-विडा ठेवून आई-वडिलांना (हयात अथवा दिवंगत) नमस्कार करून पुजेस आरंभ करावा. ह्यानंतर अर्थातच गुरुजींच्या अधिपत्याखाली पूजन करावे.

आता गणपतीच्या नैवेद्याविषयी विशेष गोष्ट:
सर्वसाधारणपणे बहुतांश लोकांकडे डाव्या सोंडेचा गणपती आणतात व ते योग्यच आहे. जर गणपती डाव्या सोंडेचा असेल तर त्याला सुके खोबरे व गुळ हे प्रिय आहे, हे लक्षात घेऊन त्याचा नैवेद्य दाखवावा. तसेच गुळ - नारळा मिश्रित अथवा खव्याचे तळलेले मोदक ह्याचा पण नैवेद्य दाखवावा. जर गणपती उजव्या सोंडेचा असेल, तर खरवडलेल्या ओल्या नारळाचा किस व गुळ ह्याचा नैवेद्य दाखवावा. तसेच उकडीच्या मोदकांचा सुद्धा नैवेद्य दाखवावा. परंपरेने मात्र सर्वजण दोन्ही प्रकारच्या गणपतींना उकडीच्या मोदकांचाच नैवेद्य दाखवतात.

थोडे विषयांतर करून असे सांगावेसे वाटते की, मनोभावे संकष्टी करणाऱ्या भाविकांनी कदापिही चंद्रोदयापुर्वी उपवास सोडू नये. तसे केल्यास संकष्टी व्रताचे फळ मिळत नाही. संकष्टी ही संकट निवारणासाठी करत असल्यामुळे फलप्राप्तीसाठी उपासकांनी ही काळजी घ्यावी. काही लोक फक्त मंगळवारी येणाऱ्या संकष्टीला म्हणजेच अंगारकी (जी वर्षातून दोन वेळेलाच येते) उपवास करतात. वास्तविक पहाता, उपवास केल्यास सर्वच संकष्टीचा करावा. विनायकी चतुर्थी ही गणपतीचा वरदहस्त कायम असावा म्हणून करतात. आणि म्हणूनच हा संपूर्ण दिवसाचा उपवास आहे.

गणेश चतुर्थी ह्या सणाविषयी माहिती देताना गौरी विषयी सुद्धा माहिती देण्याचा मोह होतो; पण तो कटाक्षाने टाळला आहे. शास्त्राप्रमाणे गौरीच्या उत्सवाचा व गणपती उत्सवाचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. गौरीचा उत्सव हा स्वतंत्र उत्सव असून तो साजरा करण्याच्या प्रथा सुद्धा भिन्न भिन्न आहेत.

गणेश चतुर्थीविषयी लिहिताना, लोकमान्य टिळकांनी आरंभ केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी चार शब्द सांगावेसे वाटतात. गणेश मूर्ती ही प्रायः बाल स्वरूप असल्यामुळे मूर्ती शक्यतो अवाढव्य नसावी. तसेच मूर्तीचे आगमन हे नादमधुर संगीतातच असावे. कर्कश्श वाद्यांचा वापर हा रणांगणात करावयाचा असतो, हे भाविकांनी लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे उत्सवासाठी निधी गोळा करताना बळजबरी करू नये. अलीकडे सजावट व रोषणाई पडदे लांवून झाकली जाते. त्याचा परिणाम म्हणजे दर्शनासाठी लांबच-लांब रांगा लागण्यात होतो. परिणामतः ज्येष्ठ नागरिक तसेच लहान अपत्याला घेऊन येणाऱ्या स्त्रिया श्रींच्या दर्शनापासून वंचित रहातात. तसेच गणेशोत्सव मंडळांनी आलेल्या निधीचा विनियोग गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केल्यास लोकमान्य टिळकांनी चालू केलेल्या गणेश उत्सवाचे सार्थक तर होईलच तसेच विद्येचे दैवत असणारा गणेश सुद्धा आयोजकांवर संतुष्ट होईल.