हे मंदिर थिरुवारुर-कुंभकोणम मार्गावर थिरुवारुरपासून १० किलोमीटर्सवर, कुंभकोणमपासून ३२ किलोमीटर्सवर आणि थिरुकन्नमंगाईपासून २ किलोमीटर्सवर आहे. शैव संत अप्पर, सुंदरर आणि संबंधर ह्यांनी ह्या मंदिराची स्तुती गायली आहे. कावेरी नदीच्या दक्षिण काठावर तर कावेरी नदीची उपनदी असलेल्या वेट्टारु ह्या नदीच्या काठावर हे मंदिर वसले आहे. एके काळी इथे करवीर वृक्षांचे वन होते (मराठीमध्ये लाल कण्हेर). म्हणून ह्या स्थळाला करवीरम असे नाव प्राप्त झाले. मूळ मंदिर ७व्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावे. चोळा राजांनी ह्या मंदिराचे वर्तमान दगडी बांधकाम केले. नायक राजांनी ह्या मंदिराचा विस्तार केला.
मूलवर: श्री ब्रह्मपुरीश्वरर, श्री करवीरेश्वरर, श्री अरली वन नाथर (अरली म्हणजे करवीर पुष्प)
देवी: श्री करवीरनायकी, श्री प्रथ्यकमिन्न अम्माई
पूजा / आगम: शिव आगम
पवित्र तीर्थ: ब्रह्म तीर्थ, अनवरद तीर्थ
क्षेत्र वृक्ष: करवीर वृक्ष
पुराणिक नाव: करवीरम, करैयपुरम
क्षेत्र पुराण:
१. पुराणानुसार भगवान शिवांनी इथे शिव लिंग निर्माण केलं. त्यांनी गौतम ऋषींना ह्या लिंगाची देखभाल करण्याची आज्ञा दिली. गौतम ऋषींनी इथे राहून तपश्चर्या केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना दर्शन दिले आणि गौतम ऋषींना त्यांची इच्छा विचारली. गौतम ऋषी म्हणाले कि ते भगवान शिवांच्या नेहमी सेवेत असतात म्हणून भाविक जनांनी भगवान शिवांसमवेत त्यांची पण आराधना करावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. भगवान शिवांनी त्यांना त्यांची इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला. गौतम ऋषींनी इथे जीव समाधी घेतली. त्यांना ह्या मंदिराच्या आवारातच पुरलं गेलं. असा समज आहे कि गौतम ऋषी इथे क्षेत्र वृक्षाच्या रूपांत म्हणजेच करवीर वृक्षाच्या रूपांत आहेत (करवीर वृक्षाला मराठीमध्ये लाल कण्हेर म्हणतात). मंदिरामध्ये गौतम ऋषींचे स्वतंत्र देवालय पण आहे.
२. स्थळ पुराणानुसार एका गाढवाला भगवान शिवांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने तपश्चर्या केली. त्याला दर्शन झाले नाही म्हणून त्याने समुद्रात बुडून आपल्या आयुष्याचा शेवट करायचं ठरवलं. तो जेव्हा समुद्र किनाऱ्यावर गेला तेव्हा त्याला आकाशवाणी ऐकू आली. जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला भगवान शिवांचं दर्शन झालं. म्हणून ह्या मंदिरात ध्वजस्तंभ नाही तसेच ह्या स्थळापासून नागोर पर्यंतच्या मार्गावर घरे नाहीत. ह्यातुन असा बोध होतो कि भक्ती जर प्रामाणिक असेल तर कुठल्याही योनीतील जीवाला भगवान शिवांचं दर्शन घडू शकतं.
३. स्थळ पुराणानुसार एकदा भगवान शिव करवीर वृक्षाच्या खाली आदि-शिव रूपांत प्रगट झाले.
४. स्थळ पुराणानुसार एकदा भगवान शिव गावामध्ये टेहेळणी करायला गेले होते. त्यावेळी पार्वती देवी अर्धमंडपामध्ये भगवान शिवांची वाट बघत होत्या. म्हणून पार्वती देवी आणि भगवान शिव ह्या दोघांचीही देवालये पूर्वेकडे मुख करून आहेत. देवींचे देवालय भगवान शिवांच्या उजव्याबाजूला आहे.
५. स्थळ पुराणानुसार एकदा विवाहेच्छुक स्वर्गीय स्त्रियांनी पार्वती देवींची आराधना केली. पार्वती देवींनी येथील भगवान शिवांकडे कटाक्ष टाकला आणि त्यांनी त्या स्त्रियांना भगवान शिवांची आराधना करण्याचा सल्ला दिला. त्या स्त्रियांनी भगवान शिवांची आराधना केली आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. म्हणून हे स्थळ विवाहातल्या अडचणी दूर करण्यासाठी परिहार स्थळ आहे.
६. एकदा शैव संत संबंधर इथे रात्री उशिरा आले आणि त्यांनी इथे त्या रात्री मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पवित्र स्तोत्र गायलं. ह्या स्तोत्रामध्ये इथे आराधना केल्याने भक्तांच्या कर्मांचा कसा नाश होतो ह्याचे वर्णन केले आहे. ह्या घटनेला आधारून असा समज आहे की जे इथे रात्री मुक्काम करतात त्यांच्या सर्व पापांचा नाश होतो. असा समज आहे की ह्या ठिकाणी आराधना करणाऱ्यांना कुठलेही शत्रू नसतील.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
गौतम ऋषी, श्री ब्रह्मदेव, श्री पार्वती देवी, स्वर्गीय स्त्रीया, शैव संत संबंधर, अप्पर, शैव संत सुंदरर आणि गाढव.
वैशिष्ट्ये:
१. ह्या ठिकाणी करवीर वृक्ष असल्याने ह्या स्थळाचे नाव थिरुकरवीरपूरम असे आहे.
२. इथे गाढवाने (तामिळ मध्ये करम) आराधना केली म्हणून पण ह्या स्थळाला त्याचे नाव प्राप्त झाले.
३. भगवान शिव आणि पार्वती देवी इथे वधूवरांच्या रूपांत भक्तांवर कृपावर्षाव करतात.
४. दोन्ही देवालयांच्या शिखरांवर बरीच शिल्पे आहेत.
५. मुख्य मंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. इथे राजगोपुर नाही पण इथे एक कमान आहे ज्यावर भगवान शिव आणि पार्वती देवींचे शिल्पे आहे. इथे एक परिक्रमा आहे. इथे ध्वजस्तंभ नाही. गाभाऱ्याच्या प्रवेशावर बलीपीठ आणि नंदी आहेत. इथले शिव लिंग छोटे आहे, उंच आहे आणि स्वयंभू आहे.
कोष्ट मूर्ती: श्री दक्षिणामूर्ती, श्री महाविष्णू, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गा देवी आणि श्री चंडिकेश्वरर.
भगवान शिव आणि पार्वती देवी ह्या दोघांच्याही मूर्ती साधारण ६.५ फूट उंच आहेत. पार्वती देवींचे देवालय भगवान शिवांच्या देवालयाच्या उजव्या दिशेला त्यांच्या बाजूलाच आहे. देवींची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. पार्वती देवी भगवान शिवांच्या उजव्याबाजूला असल्याकारणाने हि वधुवर मुद्रा समजली जाते.
परिक्रमेमध्ये ९ शिव लिंगे आहेत. सप्त मातृका स्वतंत्र देवालयामध्ये आहेत. मुख्य मंडपाचा आकार वटवाघुळाच्या कपाळासारखा आहे.
परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायक, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रमण्य, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री शनीश्वरर, श्री ब्रह्मदेव, नागांच्या मूर्ती आणि गौतम ऋषी. येथील स्थळ विनायकांना राज गणपती असे संबोधले जाते.
प्रार्थना:
१. विवाह ठरण्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी विवाह न झालेल्या स्त्रिया इथे क्षेत्र वृक्षाची आराधना करतात.
२. पूर्व पापांचं क्षालन (पूर्वकर्मविनाश) होण्यासाठी भाविक जन इथे भगवान शिवांची आराधना करतात.
पूजा:
शिव आगमानुसार नियमित पूजा.
इथे दोन विशेष पूजा केल्या जातात.
१. पौंर्णिमेच्या दिवशी विवाहेच्छुक स्त्रिया, ज्यांच्या विवाह ठरायला विलंब होत आहे त्या स्त्रिया, इथे क्षेत्र वृक्षाला पाणी घालतात आणि भगवान शिवांची पूजा करतात. असा समज आहे कि असे केल्याने पुढच्या पौर्णिमेच्या आत त्यांच्या प्रार्थनांना प्रतिसाद मिळतो.
२. स्थळ पुराणांत उल्लेखिल्या प्रमाणे भाविक जन इथे त्यांच्या पूर्व कर्माचा विनाश करण्यासाठी रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान शिवांचे दर्शन घेतात.
तसेच प्रत्येक पौर्णिमेला इथे विशेष पूजा केली जाते. प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा केली जाते.
मंदिरात साजरे होणारे सण:
आवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): गणेश चतुर्थी
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): शिवरात्रि
पंगूनी (मार्च-एप्रिल): पंगूनी उत्तिरं - उत्तरा फाल्गुनी नक्षत्रदिवशी पूजा
मंदिराच्या वेळा: सकाळी ८.३० ते १२, संध्याकाळी ५ ते ८.३०
मंदिराचा पत्ता:
श्री ब्रह्मपुरीश्वरर / श्री करवीरनाथर मंदिर,
थिरकरवीरम / कारियापुरम,
मनक्कल पोस्ट, वडकंडम मार्गे इय्यामपेटै,
तालुका कूडवासल,
जिल्हा थिरुवारुर,
तामिळ नाडू ६१०१०४
मंदिरातले पुजारी: श्री सरवण गुरुक्कल +९१-९७८७८५३४६०
अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):
ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.