हे मंदिर कुंभकोणम मध्ये महामाघम तलावाजवळ आहे. हे मंदिर नव कन्निगा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. चोळा साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळाशी हे मंदिर संबंधित आहे आणि नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार विजयनगर आणि तंजावूर नायक राजांनी केला.
महामाघम उत्सवामध्ये भाग घेणाऱ्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर महामाघम तीर्थाच्या उत्तर काठावर स्थित आहे आणि कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधीपासून अस्तित्वात असावं. काही जाणकारांच्या मते हे मंदिर पाडळ पेथ्र स्थळ आहे. पण श्री सोमेश्वरर मंदिराच्या थेवरं स्तोत्रांमधे ह्या मंदिराचा उल्लेख आढळतो. तसेच शैव संबंधर ह्यांनी गायलेल्या स्तोत्रांमधे पण ह्या मंदिराचा उल्लेख आढळतो.
मूलवर: श्री काशी विश्वनाथर
देवी: श्री विशालाक्षी
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: महामाघम
क्षेत्र पुराण:
१. कुदंथईकरोनम: जेव्हा रावणाने श्री सीतादेवींचं हरण केल्याने त्या प्रभू श्रीरामांपासून दूर गेल्या त्यावेळी प्रभू श्रीरामांना अतिशय दुःख झाले. मूलतः सौम्य स्वभाव असल्याकारणाने शिवभक्त रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी प्रभू श्रीरामांना क्रोध (रुद्ररूप) धारण करणं आवश्यक होतं. ह्यासाठी ते अगस्त्य मुनींकडे गेले. अगस्त्य मुनींनी त्यांना ह्या स्थळी राहून श्री काशी विश्वनाथांची पूजा करण्यास सांगितले. प्रभू श्रीरामांनी अगस्त्य मुनींच्या सल्ल्यानुसार इथे राहून श्री काशी विश्वनाथांची उपासना केली आणि रावणाबरोबरच्या युद्धासाठी आवश्यक ती शक्ती प्राप्त केली. प्रभू श्रीरामांनी पुजीलेलं शिवलिंग प्रकाराच्या ईशान्येला ठेवले आहे आणि त्याचे नाव क्षेत्र-महा-लिंग असे आहे. प्रभू श्रीरामांना इथे उपासना करून आवश्यक शक्ती (अरक्कोनं) प्राप्त झाली म्हणून ह्या स्थळाला कोरोनम असं नाव प्राप्त झालं. त्याआधी ह्या स्थळाला कुदंथई असा नाव होतं. म्हणून ह्या स्थळाचे नाव कुदंथईकरोनम असा झालं.
२. नव-कन्निगा:
एकदा नव-कन्निगा म्हणजेच नऊ पवित्र नद्या म्हणजेच गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती, कावेरी, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा आणि शरयू - कैलासावर गेल्या आणि त्यांनी भगवान शिवांकडे आपली व्यथा प्रकट केली कि त्यांच्यामध्ये स्नान करून लोकांनी जी पाप सोडली आहेत त्या पापांचं क्षालन करण्यास त्या असमर्थ आहेत. भगवान शिवांनी त्यांना कुंभकोणम येथे येऊन ईथल्या तीन तीर्थांमध्ये स्नान करण्यास सांगितले जेणेकरून त्यांनी घेतलेल्या पापांचा भार कमी होईल. नव-कन्निगांनी भगवान शिवांच्या आज्ञेनुसार इथे येऊन पवित्र तीर्थांमध्ये स्नान करून श्री काशीविश्वनाथांची पूजा केली ज्यामुळे त्यांच्यावर असलेला पापांचा भार निघून गेला. नव-कन्निगांनी भगवान शिवांना येथे सर्वसामान्यांसाठी राहण्याची विनंती केली. भगवान शिवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते श्री विशालाक्षी देवींसमवेत इथे येऊन राहिले. मंदिराच्या प्रवेशाजवळ नव-कन्निगांचे देवालय आहे.
ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:
प्रभू श्रीराम, नव-कन्निगा
वैशिष्ट्ये:
१. इथले शिव लिंग स्वयंभू आहे.
२. इथले क्षेत्र लिंग खूप उंच आहे आणि ते नीम वृक्षाच्या खाली आहे. हे दृश्य खूप दुर्मिळ आहे. सहसा श्री विनायक आणि श्री पार्वती देवींच्या मूर्ती नीम वृक्षाखाली आढळतात.
३. इथे श्री दुर्गादेवींची मूर्ती श्री चंडिकेश्वरांच्या समोर आहे. हे खूप दुर्मिळ आणि अलौकिक दृश्य आहे.
४. ह्या ठिकाणी भगवान शिव आणि श्री पार्वतीचे दर्शन घेण्याआधी नव-कन्निगांचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.
मंदिराबद्दल माहिती:
हे मंदिर उत्तराभिमुख असून ह्याला तीन स्तरांचे राजगोपुर आहे. हे मंदिर साधारण २ एकर वर पसरलेलं आहे. इथे २ परिक्रमा आहेत. मंदिराच्या प्रवेशावर सुंदर कमान आहे ज्यावर नव-कन्निगांची शिल्पे कोरली आहेत.
मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ, अर्थ-मंडप आणि महामंडप आहे. ह्या मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत - एक उत्तरेला आहे तर दुसरे पश्चिमेला आहे. पश्चिमेकडल्या राजगोपुराला सात स्तर आहेत.
ध्वजस्तंभ, नंदि आणि बलीपीठ हे त्यांच्या नेहमीच्या स्थानी आहेत. ध्वजस्तंभाच्या पायथ्याशी श्री विनायकांची एक मूर्ती आहे ज्याचे नाव श्री कोडी-मार-विनायक असे आहे. इथले शिव लिंग स्वयंभू आहे आणि चौकोनी पायथ्यावर आहे.
कोष्टामध्ये पुढील मूर्ती आहेत: श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री दुर्गा देवी आणि श्री ब्रह्म.
श्री चंडिकेश्वरांची मूर्ती परिक्रमेमध्ये त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आहे. अर्थमंडपामध्ये शैव संत नालवर ह्यांची मूर्ती आहे. परिक्रमेमध्ये पुढील मूर्ती आहेत - श्री विनायक, श्री भैरव, श्री सूर्य, श्री शनी, श्री चंद्र आणि सप्त मातृका. श्री पार्वती देवींना इथे श्री विशालाक्षी असं संबोधलं जातं. त्यांचे देवालय गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला आहे. मुख मंडपाच्या डाव्या बाजूला श्री नटराज आणि श्री शिवकामी देवी ह्यांची देवालये आहेत. महामंडपाच्या उजव्याबाजूला श्री वल्ली आणि श्री दैवानै ह्यांच्या समवेत श्री सुब्रमण्यम, तसेच श्री गजलक्ष्मी देवींची मूर्ती आहे. महामंडपाच्या डाव्या बाजूला श्री सोमस्कंदर ह्यांचे देवालय आहे तसेच श्री नव-कन्नीगांच्या उत्सव मूर्ती आहेत ज्यांची नावे अशी आहेत - गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती, कावेरी, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा आणि शरयू. श्री नव-कन्नीगांच्या शेजारी शयन-गृह आहे आणि श्री नटराजांची मूर्ती आहे. प्रकाराच्या ईशान्येला नीम वृक्षाच्या खाली प्रभू श्रीरामांनी पुजीलेलं शिव लिंग आहे ज्याला क्षेत्र लिंग म्हणतात. असं म्हणतात कि हे लिंग वेळेनुसार वाढत आहे. परिक्रमेमध्ये पुढील देवालये आणि मूर्ती आहेत - श्री सप्त-मातृका, श्री भैरव, श्री सूर्य, श्री चंद्र, श्री शनीश्वर, श्री ज्येष्ठा देवी आणि श्री आंजनेय.
मंदिराच्या प्रवेशाजवळ नव-कन्नीगांचे देवालय आहे. ह्या मंदिरामध्ये श्री दुर्गादेवींची मूर्ती श्री चंडिकेश्वरर ह्यांच्या समोर आहे. हे खूप दुर्मिळ दृश्य आहे.
प्रार्थना:
१. भाविकांचा असा विश्वास आहे की इथे येऊन श्री काशीविश्वनाथ आणि श्री विशालाक्षीदेवी ह्यांची पूजा केल्याने वंध्यत्वाचे निरसन होऊन अपत्यप्राप्ती होते.
२. असा समज आहे की ज्या मुलींना यौवन प्राप्त झाल्यावर पण गर्भधारणेची क्षमता प्राप्त झालेली नसते त्यांनी इथे येऊन जर सतत ११ शुक्रवारी नव-कन्नीगांची पूजा केल्यास हि समस्या दूर होईल.
३. असा समज आहे की इथे नव-कन्नीगांसमवेत श्री काशीविश्वनाथ आणि श्री विशालाक्षीदेवी ह्यांची पूजा केल्यास विवाहातल्या अडचणी दूर होतात.
पूजा:
१. दैनंदिन पूजा.
२. प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी विशेष पूजा.
३. प्रत्येक प्रदोष दिवशी प्रदोष पूजा.
४. प्रत्येक महिन्यात अमावस्या, पौर्णिमा, चतुर्थी आणि कृत्तिका नक्षत्रावर पूजा.
मंदिरात साजरे होणारे सण:
थै (जानेवारी-फेब्रुवारी): मकर संक्रांति
मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री, १० दिवसांचा महामाघम उत्सव. ९व्या दिवशी रथ यात्रा निघते ज्यामध्ये नव-कन्नीगा भगवान शिवांसमवेत महामाघम तीर्थापर्यंत जातात.
चित्राई (एप्रिल-मे): ब्रह्मोत्सव
आडी (जुलै-ऑगस्ट): आडी पुरम
अवनी (ऑगस्ट-सप्टेंबर): श्री गणेश चतुर्थी
पूरत्तासी (सप्टेंबर-ऑक्टोबर): नवरात्री, बाण उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक, स्कंदषष्ठी
कार्थिगई (नोव्हेंबर-डिसेंबर): कार्थिगई दीपम
मारगळी (डिसेंबर-जानेवारी): थिरुवथीरै, अरुंद दर्शन
पंगुनी (मार्च-एप्रिल): उत्तरा नक्षत्र उत्सव
मंदिराच्या वेळा: सकाळी ६ ते दुपारी १२.३०, दुपारी ४ ते रात्री ८.३०
मंदिराचा पत्ता: श्री काशीविश्वनाथर मंदिर, कुंभकोणम, तंजावूर जिल्हा, तामिळ नाडू ६१२००१
दूरध्वनी: +९१-४३५२४००६५८
No comments:
Post a Comment