Saturday, May 3, 2025

थिरुचक्रपल्ली येथील श्री चक्रवागीश्वरर मंदिर

हे मंदिर पापनाशम पासून ९ किलोमीटर्स वर, तंजावूर पासून १७ किलोमीटर्स वर, थिरुवैयारु पासून १३ किलोमीटर्स वर तर कुंभकोणम पासून २४ किलोमीटर्स वर आहे. हे मंदिर दाट मुस्लिम लोकवस्ती असलेल्या भागामध्ये आहे. हे मंदिर चक्रपल्ली भागातल्या सप्तस्थान मंदिरांमधलं पहिलं मंदिर आहे. नायनमारांनी स्तुती केलेल्या २७६ पाडळ पेथ्र स्थळांपैकी हे एक स्थळ आहे. हे मंदिर कावेरी नदीच्या दक्षिण काठावर आहे. ह्या मंदिराची स्तुती शैव संत संबंधर ह्यांनी केली आहे. त्यामुळे हे मंदिर सातव्या शतकाच्याही आधी अस्तित्वात असावे.

श्री पार्वती देवींनी सप्त मातृकांसमवेत ज्या सात मंदिरांमध्ये नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी भगवान शिवांची पूजा केली त्या सप्तमंगै स्थळांपैकी पण हे एक स्थळ आहे. इथे श्री पार्वती देवींनी सप्त मातृकांमधल्या श्री ब्राह्मीदेवींसमवेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भगवान शिवांची पूजा केली. त्यांना भगवान शिवांच्या तिसऱ्या नेत्राचे दर्शन झाले. ह्या दर्शनाला शिवनेत्रचक्र दर्शन असे नाव आहे. 

ह्या मंदिरातील शिलालेखांमध्ये चोळा, पांड्या आणि विजयनगर साम्राज्यांच्या राजांनी दिलेल्या देणग्या तसेच त्यांनी केलेल्या कामाची वर्णने आहेत.

मूलवर: श्री चक्रवागीश्वरर
देवी: श्री देवनायकी
क्षेत्र वृक्ष: बिल्व
पवित्र तीर्थ: कावेरी नदी, काक तीर्थ
पौराणिक नाव: चक्रमंगै, अय्यमपेट्टै
शहर: चक्रपल्ली
जिल्हा: तंजावूर (तामिळनाडू)

क्षेत्र पुराण:

१. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी इथे भगवान शिवांची उपासना करून सुदर्शन चक्र प्राप्त केलं. म्हणून ह्या स्थळाला चक्रपल्ली असे नाव प्राप्त झाले.

२. पुराणांनुसार श्री पार्वती देवींनी इथे चक्रवाक पक्ष्याच्या रूपामध्ये भगवान शिवांची पूजा केली. म्हणून ह्या स्थळाला चक्रपल्ली असे नाव प्राप्त झाले.

ह्या ठिकाणी ज्यांनी उपासना केली त्यांची नावे:

सप्त मातृका, देव, श्री इंद्रदेव आणि त्यांचा पुत्र जयंत, नादशर्मा आणि अनविद्या.

वैशिष्ट्ये:

१. ह्या मंदिरात ध्वजस्तंभ नाही.

२. श्री ब्रह्मदेवांची मूर्ती खूप सुंदर आहे.

३. श्री दक्षिणामूर्तींची मूर्ती अद्वितीय आहे.

४. इथल्या शिलालेखांमध्ये असा उल्लेख आहे की ह्या स्थळाला एके काळी चतुर्वेद मंगलम असे नाव होते.

मंदिराबद्दल माहिती:

मंदिरामध्ये गाभारा, अंतराळ आणि अर्थमंडप आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार जरी मोठे असले तरी मंदिर छोटे आहे. मंदिराच्या प्रवेशावर कमान आहे. ह्या कमानीवर वृषभारूढ भगवान शिव आणि श्री पार्वती देवी तसेच श्री मुरुगन आणि श्री विनायकर ह्यांची स्टुक्कोची चित्रे आहेत. हे मंदिर जमिनीच्या पातळीपेक्षा तीन फूट खाली आहे. बलीपीठ आणि नंदि प्रवेशानंतर लगेच आहेत आणि ते गाभाऱ्याकडे मुख करून आहेत. मुख मंडपाच्या प्रवेशावर पण एक कमान आहे.

इथले शिव लिंग स्वयंभू असून ते उंच, आकर्षक आणि भव्य आहे. गाभारा पश्चिमेकडे आहे.

कोष्टामधल्या मूर्ती:  श्री विनायकर, श्री दक्षिणामूर्ती, श्री लिंगोद्भवर, श्री ब्रह्मदेव, श्री दुर्गा देवी.

महामंडपामध्ये बाणलिंग तसेच श्री सूर्य, श्री चंद्र, श्री भैरव आणि चार श्रेष्ठ शैव संत नालवर ह्यांच्या मूर्ती आहेत.

प्रकारामध्ये पुढील मूर्ती आणि देवालये आहेत: श्री विनायकर, वल्ली आणि दैवानै समवेत श्री सुब्रह्मण्य, श्री चंडिकेश्वरर, श्री पार्वती देवी आणि भगवान विष्णू. तसेच इथे काही सध्या विस्कळीत अवस्थेत असलेल्या मूर्ती पण आहेत. इथे भगवान विष्णूंना भगवान शिवांची उपासना करून सुदर्शन चक्राची प्राप्ती झाली म्हणून ह्या स्थळाला चक्रपल्ली असे नाव आहे.

श्री ब्राह्मीदेवींच्या हातांमध्ये अक्षमाला आणि कमंडलू आहेत. 

मंदिराच्या प्रवेशानंतर लगेचच श्री अंबिका देवींचे दक्षिणाभिमुख देवालय आहे. त्यांच्या देवालयामध्ये गाभारा, अर्थ मंडप आणि मुखमंडप आहे. श्री अंबिका देवींच्या मूर्तीमध्ये त्यांचे एक पाऊल थोडे पुढे आहे. हे जणू काही दर्शवत आहे कि त्या कुठे जायला निघाल्या आहेत. 

श्री दक्षिणामूर्तींच्या मूर्तीवर पांच फणे असलेला सर्प आहे जो त्यांचे रक्षण करत आहे. 

प्रार्थना:

भाविक जन इथे समृद्धी आणि संपत्तीप्राप्तीसाठी, विवाहातल्या अडचणी दूर होण्यासाठी तसेच शिक्षणात प्राविण्य प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करतात.

पूजा:

दैनंदिन पूजा तसेच नियमित प्रदोष पूजा केल्या जातात.

मंदिरात साजरे होणारे सण:

मासी (फेब्रुवारी-मार्च): महाशिवरात्री
पंगूनी (मार्च-एप्रिल): उत्तरा नक्षत्रावर पंगूनी उत्तिरं उत्सव, सप्तस्थान उत्सव
वैकासि (मे-जून): शिवरात्रि उत्सव
ऎप्पासी (ऑक्टोबर-नोव्हेंबर): अन्नाभिषेक
मारगळी (डिसेम्बर-जानेवारी): अरुद्रदर्शन (थिरुवथीरै)

मंदिराच्या वेळा: सकाळी ८ ते ९, संध्याकाळी ५ ते ७

पत्ता: श्री चक्रवागीश्वरर मंदिर, ऍट पोस्ट थिरुचक्रपल्ली, अय्यमपेट्टै, जिल्हा तंजावूर, तामिळनाडू ६१४२११

दूरध्वनी: +९१-९७९१४८२१०२, +९१-८०५६८५३४८५

सूचना: मंदिरात पूजेला जाण्याआधी पुजाऱ्याला ४३७४४३१०११८ ह्या नंबरवर संपर्क साधून आगाऊ सूचना द्यावी.

अस्वीकरण आणि शिष्टाचार (Disclaimer and courtesy):

ह्या लेखांमधली माहिती संकलित करताना विविध आचार्यांचे उपन्यास, दक्षिण भारतातील काही नियतकालिके, तसेच इंटरनेट वरील विविध ब्लॉग्स आणि वेबसाईट्स ह्यांचा आधार घेतला आहे. आपल्याला ह्या लेखांमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्हाला जरूर कळवा.

No comments:

Post a Comment